Wednesday, December 26, 2007

शिवरायांचे आठवावे रूप

कर्मयोगातला (नोकरी) पंचम अध्याय (पाचवा जॉब) सुरू झाल्यापासून ब्रेक असा काय तो घेतलाच नव्हता. २५ ला मंगळवार..२४ ला एक दिवस रजा घेऊन ४ दिवस भटकंतीचा विचार मनात आला. आपल्या कोकणातला गुहागर-दापोली भाग अजून बघितला नव्हता. तिकडे जायचं ठरलं. कोकण म्हणल्यावर प्रचंड सुंदर ट्रिप हे सांगणे नकोच!
गुहागर जवळ दिड तासाच्या अंतरावर डेरवण नावाचे गाव आहे. तिथे शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग भिंतीवर मूर्तीरुपात (चांगला आणि योग्य शब्द सुचवा) उभे केले आहेत. अतिश्य देखणं काम आहे. परिसर प्रचंड स्वच्छ आणि प्रवेश विनामूल्य आहे. इतर कुठे असे काहि असेल तर रु.२० तिकिट नक्की! तिथले सगळे काम मी माझ्या कॅमेरामध्ये टिपले आहे.

१. शिवबाचा जन्म


२. दादोजींचे धडे


३. राज्याभिषेक


४. अफझलखानाचा वध५. शाईस्तेखानाची बोटे कापली
६. जिजाईचा आशीर्वाद


७. न्यायनिवाडा८. प्रजेचा आशीर्वाद९. रामदास स्वामींचा आशीर्वाद१०. धार्मिक कार्य


११. बाजीप्रभूंचा शेवट१२. असे सैनिकहे सगळे पुतळे इतके जिवंत वाटतात. फार सुरेख बारकावे घेतले आहेत. नऊवारी साडी नेसलेली बाई वाकल्यावर कशी दिसते, मावळे घोड्यावर बसल्यावर त्यांचे पाय कसे असतात (हा फोटो नाहीये इथे) वगैरे. महाराजांचा चेहरा पण सगळीकडे अगदी एकसारखा आहे. मला सगळ्यात जास्त आवडला तो शिवराज्याभिषेकाचा प्रसंग. जवळ जवळ ३० जण आहेत यात...आणि सुबकता तोंडात बोटं घालायला लावणारी!!

असं काम करणं हा एक भाग आहे आणि केलेलं जपणं, परिसर देखणा ठेवणं हा दुसरा भाग आहे. या प्रकल्पासाठी ज्यांचा ज्यांचा सहभाग होता आणि आहे त्या सगळ्यांना माझा सलाम! ऐसा राजा पुन्हा होणे नाही...नि अशा राजाचा जीवनपट अशा रूपात उभा करणे यासारखा दुसरा स्तुत्य उपक्रम नाही.

Monday, December 03, 2007

नको तो गाण्याचा कार्यक्रम!

गाणं हा माझा जिव्हाळ्याचा विषय! मग ते कुठलंही गाणं असो....नवीन, जुनी अशा बंदिस्त आवडी नाहीत.... जे कानाला आवडेल, ज्याचे शब्द स्पष्ट ऐकू येतात असं कुठलही गाणं मला आवडतं. स्वत: गाणं शिकलेले असल्याने काहि काही गोष्टी (बहुतेक) जास्त कळतात (असं मला वाटतं) आणि मग ऐकताना साधं वाटणारं गाणं, विशेष काहि समजल्याने जास्त आनंद देऊन जाते.
पण हल्ली या गाण्याच्या stage shows ने अगदी उत आणला आहे. "अमुक-तमुक" कि "सुनहरी यादें", "अमुक-तमुक" ना "श्रद्धांजली"... वगैरे साच्यातले कार्यक्रम अगदी नकोसे झाले आहेत. जुनी गाणी आणि गायक-वाद्यवृंद नवीन! मग त्या जुन्या गाण्याच्या गीतकार, संगीतकाराची वारेमाप स्तुती करणारे निवेदन! "क्या बात है" टाईप च्या त्याच त्या प्रतिक्रिया...अगदी शक्यच असेल तर "त्यां"च्या बरोबर त्या काळी काम केलेल्या लोकांच्या काही आठवणी, "ते" महान कसे होते वगैरे वगैरे!!! जुनी गाणी अलौकिक सुंदर आहेत, जुने गीतकार, संगीतकाराची अत्यंत प्रतिभाशाली होते...एकदम मान्य!! याविषयी माझं दुमत नाहीच आहे. पण किती वेळा तेच ते ऐकायचं? नवीन गायक आहात ना? मग नवीन गाणी म्हणा ना... लाखो लोकांनी हजारो वेळा ऐकलेलं लठ्ठ तिकिट देउन परत यांच्या तोंडून काय ऐकावं? बरं आजकाल music systems इतक्या सुंदर आहेत कि original track मिळवा आणि गाण्याचा आनंद घ्या!! गाण्यातला छोट्यातला छोटा आवाज स्पष्ट ऐकू येतो! नवीन लोकांनी नवीन काही करून प्रसिद्धी मिळवावी यासारखा आनंद नाही. Live performance ची मजा काही और च असते. पण शक्यतो तेव्हा जेव्हा मूळ गायक तो स्वतः देत असतो.
बरं, जुनेच गायचे तर मग ठरविक चार लोकांभोवतीच का फ़िरतात हे लोक? मराठीत बाबूजी, गदिमा, खळे, हृदयनाथ (क्वचितच) तर हिंदित आर.डी, कि.कु. वगैरे! बाबूजी तर जिवंत असताना जितके प्रसिद्ध होते तितकेच किंबहुना जास्तच प्रसिद्धी त्यांना नि त्यांच्या गाण्यांना मरणोत्तर मिळाली. परत एकदा, त्यांच्या प्रतिभेबद्दल मला अजिबात शंका घ्यायची नाही, पण तेच ते ऐकून कंटाळा येतो!! "सा रे ग म प" च्या पहिल्या पर्वात "खळें"च्या गाण्याचा एक भाग झाला. त्या संपूर्ण भागात स्पर्धक हा जणू गौण भाग होते. संपूर्ण कार्यक्रम "खळे गौरव" होता! देवकी पंडीत ला तर "खळे" म्हणलं कि किल्लीच बसते. कमीतकमी ५-६ वाक्य बोलल्याशिवाय बाई काही थांबत नाही.
बरं, जुनी गाणी म्हणताय ना....मग लता ची तार सप्तकातली गाणी म्हणा, मन्ना डे ची जमताहेत का बघा. तर नाही... एक जण कोणी "तेरे मेरे बीच में", "लग जा गले", "लागा चुनरी में दाग" म्हणायचं धाडस करत नाही. नवीन लोकांना जमणार नाही असं मला challenge नाही करायचं आहे, पण ते का करत नाहीत हे जाणून घ्यायचं आहे!
जुन्या चांगल्या गोष्टी जपल्याच पाहिजेत, त्या नवीन पिढीपर्यंत पोचल्या पाहिजेत, हे खरं आहे. पण त्याच बरोबर, नवीन निर्मिती देखील व्हायला हवी. कुठल्याही सुसंस्क्रुत, अभिरूचीपूर्ण समाजाचे ते लक्षण आहे. जुन्या गोष्टी वारसा आहे, तो जपायचा, पुढे न्यायचा. पण तोच उगाळत बसायचा का?
मला तर या "जुन्या" गाण्यांच्या कार्यक्रमाचा मनस्वी कंटाळा आला आहे. "अति झालं नि हसू आलं" असं झालंय बहुतेक. गाणी ऐकायला प्रचंड आवडणारी मी म्हणूनच हल्ली अशा कार्यक्रमाला जायचं टाळते. वाटतं नकोच तो गाण्याचा कार्यक्रम!

Tuesday, November 20, 2007

भाजीत गोम आणि साप

खरंतर मला हे लिहायला खूप उशीर झाला आहे. नंदन ने सुरू केलेल्या "जे जे उत्तम ते" प्रकल्पात विद्या ने मला टॅग केलं पन तेव्हा काहि ना काही कारणाने लिहिणं जमलं नाही. आता लिहित आहे.

--------------------------------------------------------
"माझी जन्मठेप" या पुस्तकातून हा उतारा घेतला आहे. या पुस्तकातला असा एखादा उतारा निवडणं अवघड आहे. सगळच्या सगळं पुस्तक, शब्दनशब्द हेलावून टाकणारा, उर्जा, स्फूर्ती देणारा आहे.
अंदमान जेल मधल्या प्राथमिक हाल अपेष्टांचे हा उतारा प्रतिनीधी आहे असे म्हणायला हरकत नाही.

---------------------------------------------------------
भाजीत गोम आणि साप

अंदमान मध्ये एक भयंकार जातीची गोम आहे हे आम्ही मागे सांगितलेच आहे. त्या गोमीची लांबी दिड फूट असून विष जाज्वल्य असते. सकाळी बंदिवानांची एक टोळी बंदिगृहाकरिता भाजी आणण्यासाठी धाडण्यात येई. रानात आणि मार्गात ओसाड जागेत त्या देशात अळू यथेच्छ उगवते. त्यातच काही पालेभाज्याही उगवतात. ती टोळी हातात मोठेमोठे विळे घेऊन ही बेटेच्या बेटे सरसहा कापीत जाई व त्या कापलेल्या पाल्याचे ढीगचे ढीग रचून मग ते गाडीत भरून बंदिगृहात धाडण्यात येत.तेच मोठ्मोठ्या जुड्या करून दोन चार विळीवर घाव मारून त्या भाजीच्या प्रचंड डेगेत टाकण्यात येत आणि उबाळले जात. बंदिवानांची भाजी शिजवण्याचा बहुधा हा प्रकार असे. अशा चालढकलीत इतका निष्काळजीपणा केला जाई कि केव्हा केव्हा या भाजीच्या पाल्याच्या ढिगात मोठाल्या गोमी आणि सर्पहि त्या डेगेत शिजले जात! अर्धी-कच्ची ती भाजी तेव्हा वाढण्यात येई तेव्हा तेही सपासप वाढले जात. खाताना भाजीतले पान म्हणून उचलावे तो गोम हाती येई! परंतु अंदमानातील ही सापाची आणि गोमीची भाजी हा जरी एक आश्चर्यकारक मेवा होताच त्याहून आश्चर्यकारक मेवा म्हटला म्हणजे त्या प्रकारच्या भाजीत बारीसाहेबांच्या श्ब्दाचा आणि समर्थनाचा जो मसाला पडे तो! आम्ही एकट्यानेच नव्हे तर आणखीहि बऱ्याच राजबंद्यांनी ह्या गोमी भाजीतून काढून दाखविल्या आहेत. आणि लगेच बारीसाहेबापर्यंत जाऊ नये म्हणून प्रतिवाधी केले आहेत. परंतु त्या निर्ढावलेल्या अधिकाऱ्याने हसून उत्तरे द्यावी "ऒ! इट टेस्टस वेरी वेल!" सुपरीटेंडंट पर्यंत कागाळ्या केल्या तरी तेही होस हो करून निघून जात! निरूपायाने गोम किंवा सापाचा तुकडा फेकून देऊन बंदीवानांनी ती भाजी तशीच खावी. नाहितर खावे कशाशी? आणि खाल्ले नाहीतर कामात थोडीच सूट मिळणार! ते काबाडकष्टी काम करावे कशाचे बळावर? हा पेच बारीस माहित असेल म्हणून तो कोणीही अधिकारी तिकडे फारसे लक्ष देत नसत. केव्हा केव्हा माझ्या आणि माझ्या इतर राजबंदिंच्या प्रतिवादाचा परिणाम होऊन बारीस थोडाफार ठपका मिळत असे. अशा वेळेपैकीच एका वेळेस ह्या गोमीच्या प्रकारावरून बारी मला शांतविण्यासाठी गोंजारीत म्हणाले होते "अहो सावरकर! ह्या बदमाष लोकांचा विचार सोडून द्या. तुमची समाजातील उच्च प्रतीची स्थिती मला माहित आहे. हे पहा मी तुम्हाला एकट्याला पाहिजे तर भाजी करवून देतो. पण तुम्ही ह्या सर्व बंदिवानांसमक्ष अन्नाबिनातील न्यूने उघडकिस आणू नका. ती गुरे आहेत!पाहता पाह्ता ते माझ्या डोक्यावर चढतील. आजवर अशा शेकडो गोमी ह्या लोकांनी गुप्चूप फेकून देऊन भाजी खाल्लेली आहे. पण त्यातला कोणी मेलेला नाही!"
एकूण अशी विषारी भाजी खाऊन बंदिवान मेले; कि मग ती सुधारण्याची योन्य वेळ येईल अशी बारीसाहेबांची समजून होती

Friday, November 09, 2007

मॅच

हितगुज दिवाळी अंक २००७ साठी मी हि कथा पाठवली होती. ती इथे प्रकशित झाली आहे - मॅच

मॅच
"पव्या, बोल हेड की टेल?"

माझा चुलतभाऊ मंदार सोफ्यावर रेलून बसत चिडवण्याच्या सुरात म्हणाला. मंदार माझा नात्याने चुलतभाऊ, पण तसा मित्रच.... केवळ दहा महिन्यांनी लहान. त्यामुळे लहानपणापासून एकत्रच उंडारलो होतो.... अगदी चड्डी न घालता येण्याच्या वयापासून, सेडान कार मध्ये कोणाला फिरवावं या आणि अशा सगळ्या मित्र मैत्रिणी आम्ही शेअर केलेल्या. त्यात पठ्ठयाला चुकून एक सुंदर मुलगी पटली होती आणि तिला ’अक्कल’ जरा कमी असल्याने ती मंद्याशी लग्नाला तयार झाली होती. अशी देवाची कृपा माझ्यावर कधी होते हे बघण्यात कॉलेजची सहा नि नोकरीतली चार वर्षे गेली आणि मग अस्मादिकांनी 'अरेंज्ड मॅरेज' करण्याची मनाची तयारी केली. तर आजचा हा माझा चौथा कांदापोहे कार्यक्रम!! दर वेळी कार्यक्रम झाल्यावर माझी ’खेचायला’ येणारा मंद्या आज आधीच येऊन माझी ’खेचत’ बसला होता.

"काय हेड की टेल? तू ये एकदा..मग कळेल"
"वैतागतो काय यार? बरं..सांग दिल कि दिमाग??"मंद्याची टकळी चालूच होती.
"दोन्ही"
"टॉस केल्यावर एकच काहीतरी मिळतं"
"गधड्या, ही काय मॅच आहे...टॉस करायला???"
"मग काय आहे?? सांग दिल की दिमाग?"
"जाऊन आल्यावर सांगतोssss..." असं म्हणत मी गाडी चालू केली. सोबत आई बाबा होतेच. मंद्याचं शेवटचं वाक्य आठवून मला जाम हसू येत होतं ...

"लग्न म्हणजे मॅच नाहीतर काय आहे?" या मॅच मधले प्रमुख खेळाडू दोन...मी- पव्या उर्फ प्रवीण आणि ती (ठरली की नाव सांगतोच) !!! तर एक खेळाडू दुसर्‍या खेळाडूला भेटायला चालला आहे. आजचा प्राथमिक सिलेक्शनचा राऊंड. इकडून सिलेक्टर्स मी आणि आई..तर तिकडून ती आणि तिची आई. दोन्हीकडचे बाबा न्यूट्रल!!! बरोबर आहे... अध्यक्ष असाच हवा!

मी तसा बर्‍यापैकी अनुभवी खेळाडू म्हटलं तरी हरकत नाही. दोन वेळा भोपळे आणि तीन वेळा मॅच कॅन्सल!!! पण माझा टीम मधला सहभाग, अस्तित्व महत्त्वाचं... काय?? दोन वेळा भोपळे म्हणजे मी एकदा इंजिनीयरिंगच्या दुसर्‍या वर्षाला असताना एकीला आडूनआडून प्रपोज केलं होतं. अपयशी झालो. आणि त्यानंतर पहिल्या नोकरीत एक आवडू लागली हे ज्या क्षणी कळलं त्याच्या पुढच्याच आठवड्यात तिने साखरपुड्याचे पेढे हातावर ठेवले!! पुढे तीन वेळा मॅच कॅन्सल म्हणजे ’लग्नासाठी’ मुली बघायला लागलो तेव्हा प्राथमिक फेरीनंतर ’पिच रिपोर्ट’, ’ढगाळ हवामान’ वगैरे कारणं देऊन मी ती कॅन्सल केलेली. आजची ’ती’ कितपत अनुभवी आहे माहीत नाही.

दोन खेळाडू भेटले....गप्पा, चहा वगैरे झालं. दोन्ही खेळाडूंनी ’होम पिच’ (त्यांची बाग) वर पाय मोकळे केले. एकमेकांची ’स्टाईल’ जाणून घेतली. ती ’स्टाईल’ आपल्या ’स्टाईल’ शी कितपत जुळते वगैरे काही कंपॅटॅबिलिटी टेस्ट झाल्या. मी तिचा एकूण टीमस्पिरीट आजमावला. माझ्या (घरच्या) टीम मध्ये कशी वाटेल वगैरे. शेवटी ’होम पिच’ वरच्या बॅडलाईटमुळे (तिन्हीसांज) खेळाडू परतले. आणि परत गाडी सुरू करून घरी!

मला यावेळी का कोणास ठाऊक, पण ही मॅच होऊनच जाऊ देत असं वाटलं. ’पिच रिपोर्ट’, ’ढगाळ हवामान’, ’बॅड लाईट’ अशा काहीही सबबी आठवल्या नाहीत. (विनाशकाले विपरीत बुद्धी ते हेच वाटतं). उतावीळ मंद्याचा रात्री फोन आलाच...
"काय रे कशी आहे?"
"चांगली आहे..."
"बस क्या!! मुझे शेंडी?? काकू सांगत होती की तू एकदम गाणं वगैरे गुणगुणत आहेस म्हणून"
"काहीही........ आणि बाय द वे, तिला दिल, दिमाग दोन्ही आहे"
"ओह हो.....पण पहिल्या भेटीत तू दिमागवाल्या गोष्टी करत होतास? हरी ओंम!!! पव्या....म्हणून तुला मुलगी पटली नाही बघ" हा मंद्याचा आगऊपणा.
"ही पटणार गड्या...बघ.."
'सुंदरा मनामध्ये भरली' अशी काहीशी माझी अवस्था. आई-बाबांना पण ती पसंत. चला...इकडे सिलेक्शन टीम आणि अध्यक्ष यांचा होकार आला. फोनवर बोलणं झालं नि तिकडून पण अपेक्षित होकार आला. अशा रितीने दोन खेळाडूंची टीम तयार झाली. तिचं नाव ’दिशा’. (माझी दशा नाही केली म्हणजे मिळवलं)

आता मॅच साठी महत्त्वाची म्हणजे खेळाडूंची मानसिक एकात्मता आणि तयारी. त्यासाठी वारंवार भेटणे चालू झाले. अधून मधून मग तिचे नातेवाईक, कधी माझेपण आमची तयारी (??) बघायला म्हणून भेटत असत. वर परत ’हे दिवस एंजॉय करा, नंतर आहेच’ हे असलं कोचसारखं सूचना करणं होतंच!

बाकी आमचं ट्युनिंग चांगलं जमत होतं. सुरूवातीची एकदम अबोल, लाजरी दिशा हळूहळू खुलत चालली होती. मॅचचा आनंद घेण्याच्या दृष्टीने हे फारच महत्त्वाचं होतं. माझ्या काहीकाही स्ट्रॅटेजीजवर ती जाम लाजायची. आणि तसं झालं की मी पार पाघळायचो. तिला मी पहिलं गिफ्ट दिलं तेव्हाचा तिचा चेहरा.....अगदी कपिल देवने १९८३ मध्ये वर्ल्डकप जिंकल्यावर जसा होता तस्साच!!! ती खूप हळवी आहे....एकदा मी तिला विचारलं की माझ्यात असं काय बघितलंस आणि हो म्हणालीस? तर ती म्हणे "पहिल्याच दिवशी भेटलो...तेव्हा बागेत चालताना तू एकदाही मला सोडून पुढे गेला नाहीस. मी चहाचा घोट घेईपर्यंत तू थांबला होतास. जाताना माझ्याकडे बघून, हसून बाय केलास. तुझा हा केअरिंग स्वभाव आवडला." विचारलेल्या सराव प्रश्नाला दिशाने जबरी षटकार लगावून दिला होता. आणि त्या षटकारातला जणू मी बॉल आहे असं मला हवेत तरंगायला झालं होतं.

असं सगळं चालू असतानाच सिलेक्टर्सपासून प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांच्या मनात आमचा एक सराव सामना व्हावा असं ठरलं आणि आम्ही साखरपुड्याच्या तयारीला लागलो. सराव सामना त्यामुळे प्रेक्षक १०० वगैरेच..... शिवाय दिवसभराची मॅच चार तासात उरकली. सराव सामन्यात बराच गोंधळ लक्षात आला होता..जसं फोटोग्राफर दुसरा बघायला हवा.... हॉल जरा जास्त हवेशीर असावा. तिचा आणि माझ्या कपड्यांचा रंग साधारण साजेसा असावा (हे अर्थात तिकडचं म्हणणं). साखरपुड्याला तिची साडी मेंदी कलरची नि माझा शर्ट आकाशी...... म्हणजे जमीन-आसमानाचा फ़रक झाला होता. तर हे सगळं टाळायचं होतं. आता इतकं सगळं चालूच होतं तर एक-दोन वेळा मी पण संधी साधून ’तोंडओळख’ करून घेतली.

या मॅच मध्ये एक्स्ट्रा प्लेयर नसल्याने (आम्हाला नको पण होते!!!) फिटनेस महत्वाचा होता. म्हणून मग केळवणावर बंधने! मॅच मध्ये तिच्या दिसण्याला ’अति’ महत्त्व म्हणून मग एक महिना आधीपासून ब्यूटीपार्लर वगैरे. माझं काहीच नाही.....मी फक्त एक नवीन शेव्हींगकीट आणलं. साला आमच्याकडे बघतोच कोण! (मनातल्या मनात ’भोपळा' वाल्या दोघी डोकावून गेल्या). मॅचचा दिवस जवळ आला तशी धडधड वाढली..

ही पहिली नि शेवटची मॅच!!! हीच इनिंग कायम जपायची. आयला...मला कमिटमेंट फोबिया होतोय का??? छे छे!!! आय ऍम ऑलरेडी कमिटेड. मग कसलं टेन्शन??? तर....तेच तेव्हढं सांगता येत नाही बघा. तुम्हालाही अनुभव असेलच. जवळ जवळ ६००-७०० प्रेक्षक नक्की झाले. गुरूजीच्या नावाखाली अंपायर ठरला. मॅचच्या दिवशीचा मेनू ठरला. आणि तो दिवस आला.

गेले दोन दिवस मी आणि तिने एकमेकांना भेटलो नव्हतो. त्यामुळे एकत्र ज्यांना खेळायचं आहे त्यांनाच मनाचा अंदाज घेता येत नव्हता. एव्हाना मंद्याच्या लग्नाला दोन महिने झाले होते...त्यामुळे तो आपली काही खास मतं, ’टिप्पण्ण्या' देत होता. बहिणाबाईंचे काही फुकट सल्ले चालू होते....असा उभा रहा, तसा हास वगैरे. मला ऐन डिसेंबर मध्ये घाम फुटतो की काय असं झालं होतं. मॅच सुरू व्हायची वेळ अगदी दहा मिनिटांवर आली.

ग्राऊंडवर आधी मी उतरलो. सासूबाईंनी माझं अगदी औक्षण वगैरे करून स्वागत केलं... मी मनात म्हटलं ’अहो तुमच्या मुलीशी संसार हा काय युद्धाइतका भयंकर असणार आहे का?’ पण त्याक्षणी काहीही न बोलता सगळं करायचं असा मंद्याचा एक सल्ला आठवला. दोनच मिनिटात दिशा आली. आपुन खल्लास!!! ती ज ब री दिसत होती. म्हणजे कॉलेज मध्ये असताना मी आणि मंद्याने अनेक वेळा टप्पे टाकण्याचा प्रयत्न केलेल्या त्या ’शीतल’ पेक्षा उच्च दिसत होती. हे मंद्याला सांगायला म्हणून मागे वळलो तर तो कोपर्‍यात हातात डीजीकॅम नाचवत त्याच्या बायको शेजारी उभा होता. मनात आलं, आता इथून पुढे दिशा बद्दलचे असे सगळे हळवे, नाजूक क्षण फक्त माझे आहेत. ते मी अगदी मंद्याबरोबर पण शेअर नाही करणार. गुदगुल्या झाल्या.

मॅचच्या आधी जसे दोन्ही देशांचे राष्ट्रगीत असते त्याच धरतीवर इकडे गुरूजींनी दोन, मग तिच्या आत्याने एक, माझ्या मावशीने एक वगैरे मंगलाष्टके म्हणली (गायली म्हणणं चुकीचंच ठरेल). दर तीस सेकंदांनी अंगावर येणार्‍या अक्षता मानेवर अडकून टोचू लागल्या होत्या.... आणि अंतरपाट खाली आला. दिशाने मला हार घातला नि मी तिला..... अंपायरने 'मॅच सुरू करा'' असा इशारा दिला नि आमच्या मॅचचा पहिला बॉल पडला!

आम्ही दोघेही एकमेकांना ’मॅच’ असल्यामुळेच ही ’मॅच’ सुरू होऊ शकली. आमची ही मॅच ऊन, वारा, पाऊस या सगळ्यात अशीच चालू राहू दे, सिलेक्टर्सपासून प्रेक्षकांपर्यंत आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद, पाठींबा मिळू दे. जमेल आणि शक्य असेल तेव्हा चौकार, षटकार मारायला मिळू देत. दोघांचीही इनिंग रंगतदार, बहारदार व्हावी. कर्तव्य नीट पार पाडून देवाने आम्हाला आऊट करावं....आणि मागे राहिलेल्याला ताकदीनं उभं राहायचं बळ त्याने द्यावं.

तर मंडळी....मॅच आता सुरू झालेली आहे... जेवण करून जायचं. आणि मॅच संपेपर्यंत अशीच साथ द्यायची. कसं आहे... प्रेक्षकांशिवाय काही मजाच नाही ना कशाची!!!

Friday, November 02, 2007

आठवणीतली दिवाळी...

"झाली का दिवाळीची खरेदी?" मी चॅट वर एका मैत्रीणीला विचारत होते.
"नाही अगं अजून. पिल्लूची झाली." ती
"तुझी कधी?? काय घेणार आहेस?" परत मी
"अगं, बहुतेक काहिच नाही... काय घेणार? सगळं भरपूर आहे :)"
"डोकं, अक्कल कुठे मिळतंय का बघ. तेच कमी आहे तुझ्यात " माझा आगाऊपणा.
"हाहाहा....." जणू तिची याला पूर्ण मान्यता आहे.

सध्या ऑफिस, घर सगळीकडे एकच विषय आहे...दिवाळी!!! रस्त्यावरून जाता-येता दिवाळी मूड अगदी जाणवतो. रंगीबेरंगी आकाशकंदिल, पणत्या, लाईट्च्या माळा....सगळा गजबजाट! सगळी दुकाने लख्ख सजवलेली.... लोकांची खरेदीसाठी गर्दी. गेले कित्येक वर्ष, किंबहुना प्रत्येकच वर्षी हे अनुभवलंय. या आनंदोत्सवाला गणेशोत्सवाने सुरूवात होते आणि दिवाळीला उधाण येते. ’दसरा-दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ हे अगदी खरंय :)

पण गणपती, दिवाळी...खरं तर कुठल्याही सणाची जास्त मजा असते ती वयाच्या १५-१६ वर्षापर्यंत!!! पूर्ण निष्काळजी जीवन.... परिस्थितीची कमी जाणीव यामुळेच कदाचित निर्भेळ आनंद घेता येतो त्या वयात. कोणाशी तुलना करावी इतकं मोठं ना विश्व असतं ना तेवढा (अति) शहाणपणा असतो. अगदी ’विचार करण” म्हणजे सुद्धा ’स्वप्न बघण’ असतं तेव्हा!!! मला तर अजूनहि माझ्या त्या वयापर्यंतचीच दिवाळी जास्त आवडते.... दिवाळी म्हणलं कि मस्त ३ आठवडे सुट्टी, उन्हाळा नसल्याने अगदी भर दुपारी देखील बाहेर उंडारण्याची आईकडून मिळणारी मोकळीक, सहकुटुंब एकत्र कपडे खरेदी, बाबांनी आणलेले खूप सारे फटाके, आईने केलेले मस्त फ़राळाचे पदार्थ...वा!!!! नुसती ऐश, दंगा-मस्ती!!

सहामाही/ वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले कि मला आनंद व्हायचा. का? तर अभ्यास झालाय आणि कधी एकदा पेपर लिहिन म्हणून नाही तर त्यानंतर मोठी सुट्टी आणि त्यात करायच्या गंमतीच्या विचारानी :) मग परीक्षा सुरू झाली जस जसा एक एक पेपर होईल तसतसं मी आई-बाबांना दिवाळीत काय करायचं हे विचारून आणि सांगून वेडं करायचे. सुट्टीतला अगदी ठरलेला कार्यक्रम म्हणजे सकाळी ८-८.३० नंतर उठणे! सुट्टीत मी दूध पिणार नाही, मला चहाच हवा असा मग आईकडे हट्ट :) बाबांना बोनस मिळायचा आणि मग आमची मस्त कपडे खरेदी व्हायची. पण हे बोनस प्रकरण मला फ़ार नंतर कळलं.... माझी आई मला कपडे कधी घ्यायचे ते इतकं बेमालूमपणे समजावून सांगायची कि माझी अगदी खात्री असायची आई म्हणते तेव्हाच बाजारात छान छान कपडे येतात आणि तेव्हाच खरेदी करायची असते. मग ’तो’ खरेदीचा दिवस यायचा...सकाळी लवकर आवरून-जेवून आम्ही खरेदीला बाहेर पडायचो. आई बाबांचे एक ठरलेलं असायचं कि आधी आम्हा भावंडांची खरेदी....मग जे राहिल आणि त्यात जे शक्य असेल ते स्वत:साठी. (त्यांचा हा त्याग कळायला तर मला बरीच वर्ष जावी लागली) खरेदी झाली कि कुठल्यातरी मस्त हॉटेलमध्ये जाऊन तुडुंब पोटोबा व्हायचा. त्यावेळी, म्हणजे अगदी १७-१८ वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये जाणं हि चैन होती. कित्येक वर्ष मी न चुकता मसाला डोसाच खायचे! पंजाबी, पाव-भाजी वगैरे माहितच नव्ह्तं तेव्हा. डोसा, आईस्क्रिम वगैरे खाऊन पोटाने आणि मनाने तृप्तीची ढेकर देत आम्ही घरी यायचो. बाहेर खाल्लं म्हणून घरी काहिच करायचं नाही अशी सवय तेव्हाच्या आयांना नव्हती. (आता माझी पिढी जेव्हा आई झालीये तेव्हा आम्ही घरी खायला सुद्धा बाहेरचे पदार्थे आणतो!) कितीहि पोट भरलेलं असलं तरी थोडा दहिभात खाऊनच मी कित्येकदा झोपलेली आहे. त्याशिवाय सुटका नसायची. तेव्हा त्रास वाटणार्या या आग्रहात किती प्रेम, माया होती हे आज कळतं. काल केलेली कपडे खरेदी आज परत सकाळी, दुपारी काढून बघायची हि सवय तर मला अजूनहि आहे.

आई ची फराळाची तयारी चालू व्हायची..... त्यात मग मी आणि दादा जमेल तितकी लुडबूड करायचो. नुकती भाजलेली गरम गरम भाजणी खाणे हा एकदम चकली खाण्याइतका आवडता प्रकार. रव्याचा गरम लाडू म्हणजे आहा!!!! दिवाळीत माझं अगदी ठरलेलं काम म्हणजे रांगोळी रंग आणणे, ते नीट काढुन ठेवणे आणि रांगोळी साठी एक चौकोन भर काव (गेरू) लावून ठेवणे. एकदा प्रचंड उत्साहाने रांगोळीसाठी एका पेपर ला उदबत्तीने भोकं पाडून ठेवली होती. वाट्लं कि त्याने रांगोळीचे ठिपके नीट एका अंतरावर येतील. पण त्या भोकाटून रांगोळी खाली आलीच नाही :) जाम पोपट!!!! वेळ तर वाया गेलाच शिवाय आईची चिडचिड झाली :(

दिवाळीत मोठ्या माणसांचा अजिबात हस्तक्षेप नसलेला कार्यक्रम म्हणजे किल्ला करणे! एखाद्या सकाळी दादा जाऊन कुठुन तरी माती घेऊन यायचा. मग त्यातले खडे वेगळे काढून टाकायचे. थोडी माती चाळून घ्यायची. गुहा तयार करायला एक डबा, विहिर/ तळं करायला एक हिंगाचा गोल डबा, सिंहासनाची जागा प्लेन होण्यासाठी एक फ़रशीचा तुकडा, ३-४ विटा वगैरे साहित्य आधीपासून च जमवलेलं असायचं. मला आवडायचं ते किल्ल्याच्या पायर्या करायला. गोल गोल फ़िरवत त्या पायर्या वरपर्यंत न्यायच्या.... मग २ बुरूज, भाजीवाली, गवळण यांची जागा...सगळं एकदम ठरलेलं. अगदी जमलंच तर एखादं शेत वगैरे पण! (आता जिम वगैरे पण ठेवावी लागेल :)) सगळं झालं कि मग चाळ्लेल्या मातीने एक फिनिशिंग टच द्यायचा....हळीव पेरायचे कि झालं. मग त्यावर खेळणी मांडायची, पणती लावायची. हरखून जायला व्हायचं. दिवसभर मातीत खेळायला मिळायचं. इतक्या हौसेने केलेला किल्ला नंतर मात्र बॉंब लावून ऊडवून द्यायचा.... आणि वर कोणाचा किल्ला एका बॉंबमध्ये उडाला, कोंणाला २ लागले याचे चर्चा. लहानपण देगा देवा........

बाबांनी कितीहि फटाके आणले तरी सगळ्यात आधी काय तर त्याची सम विभागणी. अगदी लवंगीच्या माळा, पानपट्टी सगळे मोजून वेगळे काढून ठेवायचो. नरक चतुर्दशीला पहिला फटाका कोणाचा याची मित्र मैत्रीणीत स्पर्धा असायची. दादा कधी कधी हातात लवंगी उडवायचा.....ती उडेपर्यंत मी नुसती ओरडत असायचे. दादा मात्र आपण फ़ार शूर असल्याचा आव आणायचा. मन्सोक्त फटाके उडवून झाले कि मग फ़ुसके फटाके शोधायचे आणि दारू करायची :) फटाक्यांचे packing चे प्लास्टिक गोळा करायचा आणि ते जाळून ’शेंबूड शेंबूड’ असा गलका करायचा. प्रचंड धूराची वायर, नागगोळी.....सही असायचं सगळं. आता कितीहि फटाके आणा, ती मजा येतच नाही. ’गेले ते दिन गेले......’

आता दिवाळी म्हणजे चार दिवस वेगळं खायला काय करायचं वगैरे प्लॅन्स असतात. लहानपणी खाण्यात लक्षच नसायचं. आई खेळातून खेचून आणून खायला लावायची. आता तितकं खेळायचं म्हणलं तरी जीवावर येईल.

आता सगळं समीकरणच बदललं. सगळ्यात आधी तर वेळ नाही. आणि आजकाल सगळंच नेहमी मिळतं, आर्थिक परिस्थीती बदलली. जीवनशैली बदलली. सगळीकडेच पैसे जास्त झाले..... मग खरेदी मनात येईल तेव्हा, हॉटेल तर कधीही. माझ्या मैत्रिणीसारखा "काय घेऊ? सगळं आहे" असं असणारे लोक वाढले आहेत. फराळाचं आकर्षण पण संपलं. मुलांना खेळायला जागा नाही, आई कडे वेळ नाही....मग ते जातात ट्रेक ला, शिबिराला वगैरे. दिवाळी येते नि जाते..... पण अजूनहि मनात रेंगाळते आणि अनुभवावीशी वाट्ते ती दहावी-बारावी च्या आधीची दिवाळी!!

Tuesday, October 30, 2007

वचन

हि कथा साधारण वर्षापूर्वी मायबोलीवर टाकली होती. आज इथे देत आहे
****

रविवार ची सकाळ.. आरामात पॅटिस खात पेपर वाचत होते. इतक्यात फोन ची रिंग वाजली...
"हॅलो"
"स्नेहल, निरंजन बोलतोय.. आज संध्याकाळी काय करत आहेस? मी तुझ्या area मध्ये एक बंगला बघायला येतोय. काहि करत नसशील तर तू हि ये. इतक्या वर्षांनी मला त्या भागात फ़िरायला तुझी मदत लागेल च"
"अजून तरी कहि ठरलं नाहीये माझं. ये संध्याकाळी.. जाऊ आपण"
" gr8 , चल.. मग भेटू ५.३० ला"
" ok , नक्कि "
निरंजन हा माझा कॉलेज मधला मित्र.. माझ्यापेक्षा २ वर्षाने मोठा.. पण कॉलेज चा कट्टा आणि gathering
यामुले एका वर्गात असल्यासारखी मैत्री आमची. इथे १ वर्ष job करून US ला गेला... ते आता एकदम ८
वर्षांनी आला.... दरम्यान येत होता देशात.. पण त्याचे आई बाबा दोघेही नाशिक ला.. त्यामुळे पुण्यात आलाच
नाही... आता "स्वेच्छेने स्वदेश" म्हणल्यावर पुण्यात आला. आणि आता मनासारखं घर शोधतोय..
संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निर्‍या आला... सोबत निधी (त्याची बायको) आणि प्रणव (दिड वर्षाचा मुलगा).
त्याच्या आवडिची मिसळ तुडूंब खाउन आम्ही तो बंगला बघायला निघालो.
"तुला या जागेबद्दल कळलं कसं रे?"
"अग एका estate agent कडून"
"मग तो नाही आला?"
"म्हणाला कि तुम्ही बघून या आधी.. त्या मालकांच्या बर्‍याच अटी आहेत.. ते सगळं मान्य असेल तर पुढच्या वेळी मी येईन.."
" oic .. को. ब्रा. आहे वाटत मालक" मी निर्‍याला टोमणा मारला. तो "साने" आहे.
"मालक पुणेरी आहे म्हटल्यावर त्याची जात गौण आहे स्नेहल." निर्‍याचे प्रत्युत्तर..
एक दोन डावी उजवी वळणे घेत अम्ही plot no. 502 च्या बंगल्याजवळ पोचलो.
बंगला देखणा, टुमदार.. पण बरेच दिवस कोणी रहात नसल्यासारखा दिसत होता. आम्हाला बघून एक सधारण सत्तरीचे ग्रुहस्थ पुढे आले.
"साने का?"
"हो. गनलांकडून आलोय" (गनला हा estate agent )
"या.. त्यांचा फोन आल होता"

बंगल्यात सुंदर बाग, थोडी हिरवळ होती... निधी चे डोळे तिला जागा आवडल्याच सांगते होते.
मालकांनी प्रणव ला उचलून कडेवर घेतलं आणि आम्हाला आत नेलं.
प्रशस्त हॉल, स्वयंपाकघर, देवघरासाठी थोडी वेगळी जागा आणि १ study , १ बेडरूम अशी खालची रचना होती. तर वर दोन हल्लीच्या मानाने बर्‍याच मोठ्या बेडरूम्स, ३०० sq. feet चं टेरेस होतं.
निर्‍या आणि निधी ला पाहताक्षणी बंगला अवडला. कोणालाहि आवडण्यासारखीच जागा होती.
देव्हार्यात एक गणपतीचा फोटो, study मध्ये १ छोटं शोकेस होतं.. वर एका बेडरूम मध्ये छान लाकडी double bed होता.
"घरी सामान म्हणल तर इतकेच. बाकि सगळे आम्ही जुन्या घरी नेलं"
आम्ही सगले फ़क्त स्मित हसलो.
काकांनी खाली बसायला चटई घातली... आणि थर्मास मधला चहा ते plastic च्या पेल्यात ओतू लागले.
"अहो हे सगळं कशाला"
"मला आवडतं म्हणून. थोडा जास्त च गोड असतो चहा आमचा.. चालेल ना?"
" no problem काका" इति निर्‍या.

"जागा छान आहे तुमची" निधी ने सुरूवात केली. "आणि area पण छान आहे."
"ह्म्म.. " मालकांचा फ़क्त हुंकार.
"आम्हाला आवडली आहे जागा.. पण गनला म्हणत होते कि तुमच्या काही अटी आहेत. त्या कळल्या तर बरं होईल" निर्‍या.
"अटी म्हणण्यापेक्षा आपण त्याला इच्छा म्हणूया. आणि जो माणूस त्या पूर्ण करेल.. त्यालाच मी ही जागा विकेन"
"...." आम्ही सगळे blank .

"असं आहे साने, हा बंगला मि १९९८ साली बांधला... त्यावेळची किंमत आणि आताची बघाल तर जमीन आसमानाचा फरक आहे"
"हो ते आहेच.. किंमतीच्या बाबतीत तुमच्या काय अपेक्षा?"
"तर.. अस फ़रक असूनहि मि हि जागा मूळ किंमतीच्या 30% जास्त घेऊन विकणार आहे.. पण"...
"पण... काहि गोष्टी माझ्या ईछेनुसार होणार असतील तर"
"बोला.." निर्‍या काहिसा वैतागून म्हणाला
"आपण बागेपासून सुरूवात करू. या बागेतली हिरवळ तशीच राहिली पहिजे. बागेत तुळस हवीच.
study मधले शोकस आणि वरचा बेड हे वापरलं नाही तरी मोडीत जणार नाही. तुम्ही इथे कायम तुमच्या आई-वडिलांसोबत रहाल. परदेशी स्थायिक होणार नाही. आणि या बंगल्याचं नाव वचन ठेवाल."
काकांनी एक दमात सगळ्या अटी (इच्छा) सांगितल्या.

"बाग आणि आई बाबांबद्दल ठीक आहे... पण हे नाव आणि परदेशा बद्दल ची अट..." निधी चा प्रश्न.
"सांगतो... मी हि जागा १९७८ साली घेतली. माझा मुलगा, अजित,पाचवीत होता. त्याच्या दहावी नंतर इकडे घर बांधून ययचा विचार होता. पण मला तेंव्हा पैशाची अडचण होती म्हणून जमले नाही. मग तो IIT साठी बाहेर पडला... नंतर MS केलं.. तिकडेच job ही मिळाला.... त्याची बौद्धिक प्रगती होत होती. आणि आम्ही त्यात सुखी होतो. मी आणि माझी बायको दोघेही निवृत्त झालो. हतात एक रकमी बराच पैसा आला. म्हणून मग हा बंगला बांधला. याच बंगल्यात योग्य वेळी त्याचे त्यच्या मनातल्या मुलीशी लग्न करून दिले. घरात लक्ष्मी आली. (लक्ष्मी सून) आमची कर्तव्य आता पार पडली होती. लग्न झल्यावर 3-4 वर्षानी अजित इकडे येणार म्हणला होता. आम्ही त्याच आनंदात होतो. वर्षाआड तो येत होता.. दोनदा आम्ही तिकडे जाउन आलो. पण आता मन थकत चललं होतं. अजित ने आपल्यबरोबर असावं अस वाटायचं. त्याच्याकडे विषय कढला कि नेहमीच टाळाटाळ.. त्याला मुलगी झाली.. म्हनल आता तरी ये. तुमच्या मनाप्रमाणे झाली ना ती US citizen .. मग आता अम्हाला खेळू दे तिच्या बरोबर... परत काहिबाहि उत्तर दिली. नाही म्हणायला.. नातीच्या दुसर्‍या वाढदिवसाला अजित इथे महिनाभर राहून गेला. तेंव्हा त्याच्यासाठी खास तो वरचा बेड करून घेतला.
वाटल.म कि आता एक महिना येतोय तर इथे कयमचा येण्याचा विचर असेल अजित चा." काकांच्या डोळ्यात पाणी...
"पण अजित इथे येउन २ आठवडे झाले आणि एक दिवस त्याने सांगितलं..."
"आई, बाबा मी इथे परत याव असं तुम्हाला वाटतंय मल माहित आहे. पण.. पण मला इथे फरसा scope नाही. शिवाय रुची (अजित ची मुलगी) ला तिथे जितक्या सुविधा मिळतील त्या इथे मिळणार नाहीत. म्हणून आम्ही असा
विचार केलाय कि US मध्येच settle व्हायचं. आणि वर्षातून एकदा येऊ च कि. शिवाय फोन, e-mails आहेतच."
"किती सहज परस्पर ठरवून मोकळा झाला अजित. या सगळ्यात आमचा विचार कुठेच नव्हता. आयुष्याच्या संध्याकाळी फोन वर बोलून का मन रमणार आहे आमचं? आणि हा म्हणतो याला इथे स्कोप नाही? आम्ही अस विचार केला असता तर? याच्या दहवीच्या वेली मला promotion वर आगरतळ्याला बदली मिळत होती. चांगला गलेलठ्ठ पगार मिळणार होता... स्विकरली असती बदली तर हा बंगला तेव्हाच बांधता आला असता. पण याच्या शिक्षणाचा विचार केला आणि बदली नाकारली. याच्या IIT 3rd year laa मला पहिला attack आला.. पण त्याच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून हिने एकटीने सगळे सहन केलं. आम्हला त्याला खूप शिकवायचं होतं..खूप मोठं झालेल.म बघायचं होतं. पण शिकता शिकता तो स्वार्थी कधी झाला कळलंच नाही." काकांच्या डोळ्यातून दोन मोती ओघळले.
"तुम्ही मुलं खूप शिकता पण शिकल्यावर कसं विसरता रे आई बापाला? त्यांच्या कष्टाचे चीज तुम्ही मिळवलेल्या पैशात नसून उतारवयात त्यांना दिलेल्या आनंदात जास्त असते. आता मझ्यापेक्षा आमचा गवळी नशीबवान वाटतो मला... त्याचा मुलगा सधा M.Com आहे.. पण इथे चांगल्या bank मध्ये नोकरिला आहे... छान लग्न करून आई बाबांसोबत राहतो आहे. पिकल्या पानाला याहून वेगळं सुख काय हवं असतं? आणि आम्ही फार मागतोय का रे? तुमच्या आयुष्याची पहिली १० वर्ष तुमचे हट्ट पुरवले, पुढची १२-१३ वर्षे तुम्हाला मनासारखे शिकू दिले... नंतर नोकरी, लग्न सगळं तुमच्या मनासारख करू दिलं... ३४-३५ वर्ष आयुष्य गेल्यावर जर आई बापाने तुमच्याकडून ४-५ वर्ष सोबत मागितली तर ते चुकलं?? इतकं नाही करू शकत तुम्ही?? कधी कधी वाटतं मुलाला इतकं शिकवलं हेच चुकलं."

"म्हणून मझी अट आहे पोरी आहे परदेशी स्थायिक न होण्याची. आणि तुम्ही मला दिलेलं हे वचन असेल याची
आठवण सतत रहावी म्हणून बंगल्याचं नाव ही वचन ठेवायचं आहे."
"पण मग काका तुम्ही का नाही रहत इथे?" मी
"नाही रहावत इथे. हे घर बांधताना अजित बरोबर राहिल अशी स्वप्न बघितली होती. ते काही आता शक्य नाही. दोघांना इतकी मोठी जागा करायची काय? इतके दिवस विकायचं पण मन होत नव्हतं पण मग विचार केला कि आम्ही गेल्यावर तर काय उपयोग या वास्तूचा? म्हणून मग बंगला विकून ते पैसे इथल्या अंधशाळेला द्यायचे ठरवले आहेत. म्हातरपणी काय करू ५० लाख घेऊन?"

चहाची रिकामे पेले टाकायला काका उठले. आम्ही तिघेही एकदम शांत. निर्‍या परत आला आहे पण परत जायचं
च नाही असं त्याने काही ठरवलं नसावं. काकांच्या बोलण्याने तो अंतर्मुख झाला असावा. काका परत आले.

"साने, नीट विचार करा. या जागेचा नाही, मी काय म्हणतोय त्याचा. "
"काका, मी २ दिवसात काय ते कळवतो तुम्हाला" निर्‍या म्हणला... आणि आम्ही निघालो.

Monday, October 22, 2007

भूतकाळाचे भूत...

गेले कित्येक दिवस काय होतंय ते कळत नाहीये. emotional downtime चालू आहे बहुतेक. मन सतत भूतकाळात जातं आणि तिथून त्याचा पाय निघत नाही. खरंतर आजवरच्या भूतकाळात इतकं रममाण होण्यासारखं काहिच नाही...आणि जे थोडंफार होतं, ते तर आता कायमचं गमावून बसले आहे (जसे कि बालपण). मग का सतत जुने दिवस आठवत असतील?? कि खास असं काही का घडलं नाही याचाच मागोवा घेतेय मी?? मन वर्तमान काळात १० मिनिटे आणि भूतकाळात २० मिनिटे अशा प्रमाणात आहे.
काहि जुन्या दिवसांच्या आठवणीने उगाचच गहिवर येतो.... सगळं आपण किती सहजतेने निसटून दिलं असं वाटतं. पण खरंच, निसटून चाललंय हे तेव्हा कळतंच नव्हतं. आणि आता ते इतकं लांब आहे कि तिथपर्यंत ना माझा हात पोचतो ना हाक!!! आणि समजा ते सगळं मला परत आणता आलं तरी मी स्वत: आता कुठे पूर्वीची तशी आहे??? तेव्हा ज्या गोष्टी जशा बघितल्या, अनुभवल्या तसं आत्ता जमेलच मला असं कुठे मी खात्रीने सांगू शकते?
काहि आठवणी इतक्या गोड आहेत कि आता तसं काहि घडत नाही याचं वाईट वाटतं. मोठी होत गेले नि निरगसत्त्व हरपलं. निर्व्याज आनंद देणाऱ्या गोष्टी कमी झाल्या. आता कधी कधी तर आनंद ’मानावा’ लागतोय...होण्याचे क्षण आहेत आजहि...पण संख्या नक्कीच कमी.
विचार करता करता दिवस निघून जातो. झोप येईपर्यंत विचार..... त्यामुळे झोप पण उशीरा!!! मग स्वप्न पण भूत-वर्तमान चे fusion वाटावे असे काहितरी. मग पुन्हा दुसरा दिवस. त्यात आता कालच्या अजून एका दिवसाची भर...आज तर ’काल’ पण भूतकाळ झालेला....

Wednesday, September 26, 2007

जल्लोष!!!

"ए स्नेहल, चलो अभि..." अंकुश
"हा, ये एक मेल डालके आती हू. तब तक अपना cricinfo है ना!!! " मी

मेल करून निघायला ५:२५ होऊन गेले.... वरती गेले तर canteen full. बाप रे!!! पटकन चहाचा कप उचलून मी एक बरी जागा शोधली. अंकुशपण दाबेली घेऊन आला. त्याच्यामागोमाग चेतना...त्रिकुट जमलं :) (आमच्याकडे जोश नावाची एक टिम आहे...जी आम्हाला दर शुक्रवारी एक सिनेमा आणि काहि महत्त्वाच्या मॅचेस दाखवते)

"अरे आज सेहवाग नही है" अंकुश
"हा..injured ना" मी
"युसुफ पठाण को लिया है. साले का नसीब देखो...debut match क्या भारी मिला उसे" अंकुश
"युसुफ पठाण कौन??" चेतना ने अक्कल पाजळली.
"अरे ढक्कन, इरफान का भाई. अब इरफान कौन मत पुछो" वैतागून अंकुश
"इरफान का भाई batsman कैसे??" परत चेतना
"क्युं...तेरी बेहेन कहा IT मै है?" अंकुश
"अरे ये सब किधर जा रहे है??" मी
"national anthem....यार मे क्यु २ लडकियों के साथ match देखने आया हू?" परत वैतागून अंकुश

इकडे match साठी जमलेल्या २००-३०० लोकांनी टाळ्या वाजवायला सुरूवात केली... राष्ट्रगीत सुरू झाले. सगळे एका क्षणात उभे राहिले. झाल्यावर "भारत माता कि जय!!!" चा जोरदार नारा. काहि लोक अजूनहि येतच होते.

गंभीर आणि युसुफ पठाण आले. इकडे टाळ्यांचा नुसता कडकडाट. निम्म्या लोकांना मॅच दिसतच नाही....मग मागचे लोक खुर्चीवर उभे वगैरे....
गंभीर पहिल्या बॉल साठी तयार...इकडे परत टाळ्या.... बॉल आला..... हलका पुश...आणि एक रन साठी पळायला सुरूवात. युसुफ पठाण जेमतेम पोचतो तोवर एकाने बेल्स उडवलेल्या..
"ओह्ह्ह्ह्ह्ह्ह" एक सामुहिक प्रतिकिया

आता रिप्ले चालू..... सगळ्यांना कळलं युसुफ पठाण आऊट नाही... परत टाळ्या!!! आता बसलेले लोक पण उभे राहू लागलेले.... अधून मधून शिट्ट्या वगैरे.... वातावरण मस्त तयार झालेलं. आमच्याइथे हे असं होतं तर तिकडे जोहान्सबर्ग ला काय असेल??? मग एक ४, मध्ये मध्ये सिंगल्स..... इकडे बॉल बॅटला लागला कि लगेच टाळ्या!!! असाच एक शॉट मारताना युसुफ पठाण चुकला....आणि आऊट झाला. त्याचा score १५...

"क्या है, १५ पे आऊट?" चेतना
"अबे, तू जब fresher थी, १५ lines का code भी लिखा था क्या पेहले दिन?" अंकुश
"ए, चुप रहो यार....पेहले ६ ओव्हर मे विकेट नही जाना चाहिये था" मी
"उथप्पा आया देख" अंकुश

परत जोरदार टाळ्या.....मॅच पुढे चालू....आता माझं लक्ष सारखं घड्याळाकडे. ६:१५ ला मला परत जायचं होतं. माझ्यापुढे इतके लोक उभे होते कि मला उभं राहूनदेखील umpire च्या टोपीशिवाय काहि दिसत नव्हतं. काय घडतंय हे बघायच्या नादातच कळलं...उथप्पा आऊट!!!! तेव्हा ६.१० झाले होते. मी माझ्या desk वर यायला निघाले.
desk वर येऊन बघितलं तर मीटींग अजून सुरू झाली नव्हती....लगेच cricinfo.com उघडलं... युवराज येऊन ५-७ मिनिटे झाली होती आणि त्याने अजून एकहि ६ मारली नव्हती...श्या....माझी मनातच चिडचिड. गंभीर मात्र चांगला खॆळत होता!!!

माझी मीटिंग चालू झाली.....अर्थात ग्राहक bowling करत होता आणि मी batting चा प्रयत्न. माझा कधी गंभीर होत होता, कधी युवराज!!! खेळ सगळा!!! :) मधून मधून वर कॅंटिन्मधल्या लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तेव्हडच जरा समाधान... माझं सोडा पण निदाम आपल्या cricketers ना तरी बॅटिंग जमत(??) होती तर...
मीटिंग संपली नि cricinfo वर टिचकी मारली.....आपली बॅटिंग झाली होती.....१५७/५ :(( score बघून मी निराश झाले....निदान १८० तरी हवे होते. pitch report चांगला होत!!! एकतर पाचवा bowler नाही...... जाऊ द्या झालं.

’ते’ batting साठी आले. वरून commom India अशी जोरदार आरोळी....पुढच्या २ च मिनिटात प्रचंड टाळ्या........बघते तर पहिली विकेट गेली होती......वा!!!! मला खरं तर वर जाऊन मॅच बघायची होती पण...माझ्या मीटिंगधल्या खेळाने काहि कामे माझ्या पदरात टाकली होती. ती करत बसणे भाग होते. काम सुरू केलं.... वरून काहि जोरात आवाज आला तरच स्कोर बघणं चालू होतं. इतक्यात अंकुश आला.... त्याने काहि ऑंखों देखा हाल संगितला...मी मनात चरफडत काम करत बसले होते. समाधान ते एक कि अंकुश पण काम करत बसला होता :)

सगळं झालं..ग्राहकाला शेवटची मेल केली....८:३३ झाले होते....माझी बस ८:४५ ला असते....आता वर जाऊन मॅच बघणं अशक्य होतं. मॅच मध्येहि प्रचंड tense situation होती...कधीहि काहिहि होऊ शकत होतं....त्यांनी एकाच ओव्हर मध्ये ३ सिक्स, १ फ़ोर असं काहि धुतलं होतं...... पण ८ विकेट पण गेल्या होत्या. बाप रे!!! ८:३८ झाले..... शेवटचे काहि बॉल बाकि आहेत.... काय करू? मॅच कि बस?? मॅच कि बस??? मॅच कि बस???? ...बस च....कारण नंतर २ तास थांबावं लागेल.

"ए अंकुश, मै जाती हू. मुझे फोन करना...ओके" मी

लिफ्टने खाली आले तो च वरून प्रचंड आवाज....माझा लगेच अंकुश ला फोन.
"क्या हुआ?"
"कुछ नही...वाईड गया."
"तो...इतना हंगामा????"
इतक्यात वरून मोठा आवाज, शिट्ट्या......
"अरे..शायद विकेट गयी" अंकुश
"शायद क्या देख के बता ना....."
"अरे....नेट पे आने मे टाईम लगता है ना!!!"

माझ्या समोरचा security guard टोपी उडवून नाचत होता. नववी विकेट गेली. मला मॅच सोडून आल्याचा पश्चाताप होत होता. बाहेर आले तर समोरच्या दुकानात TV बघणाऱ्यांची ही गर्दी!!! माझ्यासारखे मॅच सोडून आलेले फोनवरून कोणाकोणाशी बोलत होते..... सगळीकडेच एक तणाव.

अशीच फोनवर बोलत असलेली एक मुलगी ओरडली.."आऊट!!!!"..."क्या? सिक्स???? ओह नो!!!!!!!!!!!!!!!!!!!"
मला काहिच सुचत नव्हतं......धडधड धडधड धडधड!!!!

"आऊट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Yes................." परत मगाशीचीच मुलगी ओरडली.
समोरच्या दुकानातली लोकं पण नाचायला लागली......मागून वर आकाशात एक मोठा शोभेचा फटाका!!!

आपण जिंकलो!!!! T 20 चा पहिला world cup.... पाकिस्तानला हरवून आपण मिळवला!!!

बस आली....सगळे तेच बोलत होते.....चारी बाजूंनी फटाक्याचे आवाज. रस्ता मात्र एकदम मोकळा.....निम्म्या वेळात माझी बस SSPMS पर्यंत आली होती.... JM road वर तर काहि गणेश मंडळे ढोल ताशा च्या नादात नाचत होते. सगळीकडे नुसता उत्साह, आनंद!!! बघावा तो माणूस खुशीत दिसत होता. कर्वे रोड ला आले.....आता रस्त्यावर गर्दी होऊ लागली होती. काहि अति उत्साही (?) तरुण बाइकचा ताफा, झेंडे घेऊन रस्त्यावर ओरडत चालले होते.

एव्हाना गणपती बाप्पाने पण इतर देवांपर्यंत भारताची कामगिरी पोचवली असेल. कुठल्या देवाने धोनीशी संपर्क पण साधला असेल.

इकडे लगेच राज्यसरकारने आगरकर आणि रोहित शर्मा ला प्रत्येकि १० लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं.....अजून कितीतरी कोटीचं बक्षिस संघाला ..... (कारगिल मध्ये आपल्या जवानांनी कामगिरी केली ती याहून कमी होती जणू!!!)

आपण जिंकलो....... मलापण आनंदच झाला.....मीही (मनातल्या मनात) नाचलेच!!! पण, पण ....... केवळ T 20 ला प्रसिध्दी मिळावी म्हणून किंवा मार्च २००७ मध्ये आपण लवकर बाहेर पडल्याने झालेलं नुकसान भरून काढावं असा business angle ठेवून.....काहि युक्त्य प्रयुक्यांनी भारत फ़ायनल पर्यंत पोचला असेल आणि आपण जिंकलो असू तर.....तर कसला जल्लोष??

Friday, September 14, 2007

अवघी गजबजली पुनवडी...आले रे आले रे गणपती आले....

लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आज या शहराच्या सामुहिक उर्जेचं केंद्रस्थान बनला आहे. मंडळ कार्यकर्ते खूप आधीपसून च या कामासाठी झटत असतात...पण माझ्यासारख्या लोकांना गणेशोत्सवाची चाहूल लागायला लागते ती राखीपौर्णिमेनंतर.... जिथे जिथे म्हणून आधी राखीचे स्टॉल होते तिथे तिथे शिवाय इतर अनेक ठिकाणी गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्ती दिसू लागतात.... हजारो, लाखो!!!! मग बाजारात दिसू लागतं गणपती आरासाच्या वस्तू. झुरमुळ्या, चंदेरी-सोनेरी बॉल्स, थर्माकॉल ची मखर-मंदिर. गेल्या ५-६ वर्षात यात भर पडली त्या गणपतीसाठी सोन्या-चांदिच्या दागिन्यांची. मुकुटापासून मोदकापर्यंत सगळं चांदीचं.... यामुळे भक्तांचा काय अनुभव ते माहित नाही पण तमाम सराफ लोकांची मात्र ’चांदी’ झाली आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांइतकेच गणेशोत्सवासाठी मेहनत घेणारे म्हणजे शाळेतील मुले.... मला इथे मराठी शाळेतील मुलं असं आवर्जून सांगावंस वाटतंय. निरनिराळ्या पथकाकरता ही १२-१५ वयोगटातील मुले महिना-दिड महिना सराव करतात. सगळी मेहनत बाप्पा ला या वर्षी करता निरोप देताना असा काहि दणका उडवून देण्यासाठी कि बाप्पाने पुढच्या वर्षी जास्त लवकर यावे.
१०-११ दिवस असे धामधुमीत जातात कि बघणार्याला वाटावं...हि सगळी सामान्य माणसं वर्षभर खातात तरी काय नि हि सगळी सकारात्मक उर्जा, शक्ती आणतात कुठून? पण हे सगळं आम्हाला परंपरेने दिलं आहे....असं नाहि झालं तर आश्चर्य आहे, असंच होतं यात काहिच नाहि.
१०-११ दिवस बाप्पा येतील.... आपल्यामध्ये असतील. परत त्यांचे त्यांनाहि व्याप आहेतच!!! मग पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत आपण त्यांना वाजत-गाजत निरोप देउ. २ दिवस जरा मरगळ जाणवते..... मग चालू होते नवरात्राची धामधूम... पूर्वी घरोघरी होणारा भोंडला हा प्रकार आता सार्वजनिक मंडळात (च) होतो. जोडीला गर्बा, दांडिया आहेच. साडे तीन मुहूर्तापैकि दसरा येतो.... बाजारात प्रचंड उलाढाल होते. सगळेच जण काहिनाकाही खरेदी करतात. सरस्वतीपूजन होते.
द्सरा झाला कि लक्ष्मी रोड कपडे खरेदी साठी फुलून जातो. अगदी गरीबातला गरीब देखील काहितरी नवीन कपडा घेतोच. घरोघरी फराळ, फटाके.... लक्ष्मी पूजन!!! परंपरा बघा कशी, आधी गणपती पूजन, मग शक्ती पूजन, मग सरस्वती पूजन आणि नंतर लक्ष्मी पूजन. संपूर्ण शहर विद्युत रोषणाई ने लखलखीत होऊन जाते. संपूर्ण वर्षाची पुणेकरांची ’जान’, ’जिगर’ दिसतं ते याच काळात!!!
सगळे होता होईता २-३ महिने जातात.... इतके दिवस सजलेलं शहर अचानक थंडिमुळे शाल ओढून बसणार. पण हे २ महिने पुणे मस्त असतं. गजबजलेलं, धामधूमीचं.....

बोला रे...
गणपती बाप्पा मोरया!!!!

Wednesday, September 12, 2007

जगी सर्व सुखी असा कोण आहे?

सकाळी ऑफिसला जायला निघाले आणि वाटेत असतानाच माझ्या आधीच्या कंपनीतल्या एकाचा फोन आला..
"स्नेहल, सॉरी काल बॅटरी संपली म्हणून परत फोन नाही केला....."
"हो का? बरं, काय म्हणतोय प्रोजेक्ट? offshore ला पण घेऊन आलास का ते काम?"
"अगं, घेऊन तर आलोय, पण म्हणावं तसं कामच नाही. आता मॅनेजर म्हणतोय कि बेंगळूरला जा"
"वा!! मग??"
"मग काय?? बायको सोडेल मला.... लग्न झाल्यापसून स्थिरत्व नाही. आधी बेंगळूर मग ऑस्ट्रेलिया..आता जरा पुण्यात घेतलेल्या घरात राहिन म्हणतो तर परत बेंगळूर!!!"
"पण मग पडा कि बाहेर....काय पण ते फ़ेविकॉल वाल्या खुर्ची वर बसल्यासारखं चिकटून बसला आहेस"
"हो ना... तेच तर! तुझ्या कंपनी मध्ये असेल काहि तर सांग ना!!"
"अरे, सध्या तरी नाहिये काहि. पण सध्या ’त्या’ कंपनी मध्ये आहे. मला ऑफर आहे, पण पैसे, काम कशात काहि फरक नाही म्हणून नाहि जात आहे मी. तू बघ."
"हो, बघतो ना. इथे बसून काहि भलं होईल असं वाटत नाहीये. तुझं बरं झालं, वेळेत बाहेर पडलीस"
"बस का.... तुला ना लेका, हवं होतं तेव्हा onsite पाठवलं ते विसरलास का?"
"पण काय उपयोग? बायको नाही रमली ना तिकडे. मग काय??"
"हम्म्म, बरं मी सांगते कुठे काहि आहे असं कळलं तर "
"please यार. चल मग नंतर बोलूयात ३-४ दिवसांनी. आता जरा मॅनेजरला बेंगळूरला जात नाही अशी मेल मारतो."
"ओके. बाय"

-------------------------------------------------------------
ऑफिस मध्ये आले. पाचच मिनिटात एक मैत्रिण बोलायला आली. काहि कारणाने ती गेले २ आठवडे ऑफिसला आली नव्हती.
"हाय स्नेहल"
"हाय!! मी पाहिलं तुला...मॅनेजरच्या केबिन मध्ये"
"अग हो ना. कसा आहे ग तो" प्रचंड वैतागून ती सांगत होती.
"का? काय झालं?"
"मी म्हणाले रिलीज हवाय प्रोजेक्ट मधून.... तर सरळ नाही म्हणतो. मला म्हणे तुला हवी ती flexibility देतो.... उशीरा ये, लवकर जा...अगदीच जमत नसेल तर एखाद दिवस सुट्टी घे. पण रिलीज नाही."
"हम्म्म्म्म"
"असं कसं म्हणू शकतो हा? माझी कंडिशन त्याला सांगूनहि असा का वागतो हा? म्हणजे मी इतके दिवस चांगलं काम केलं हे चुकलंच का?"
"chill madam!!! किती चिडचिड करते आहेस? आपण जरा दुसरं काहि सुचतंय का बघू ना!! तू घरी पण बोल"
"अगं पण....मला नाहिच जमणार आहे इतक्या लांब यायला आता. आणि आहे ना गावात ऑफिस..मग?"
"हो हो....चल आता जेवायला जाऊ. तू जरा icecream वगैरे खा :) थंड होशील :))"

-------------------------------------------------------------

"हॅलो स्नेहल, xxxx बोलतोय."
"येस xxxx"
"ते आपलं मेट्रिक्स शीट आहे ना... त्यात जरा चेंजेस करायचे आहेत"
"म्हणजे परत manipulation??"
"नाही नाही....आधीचं manipulation काढून टाकायचं. realistic data ठेवायचा. so delete that manipualed row, and send it across"
"ok. But was there any utilization issue raised"
"we will discuss it later. For now, change it and send, ok?"
"yes"

मी काहिशी चिडून excel sheet modify करायला घेते. मागच्या आठवड्यात जेव्हा मी xxxx ला म्हणाले होते कि इतकं manipulation नको... तर मला म्हणे "we should show it at least near to 95% though not 100%"
आणि म्हणून मी तेव्हा modify केलं... आज आता ते काढा... इकडे ग्राहकाने पण काम देऊन ठेवलंय, ते पण करा :(( भगवान उठा ले रे बाबा. मेरे को नहिं.....

-------------------------------------------------------------

"ए स्नेहल, बिझी आहेस का?"
"का रे?"
"५ मिनिटं काम होतं जरा"
"बोल ना.."
"ते खराडी कुठे आलं?"
"इथून ५-६ कि.मी असेल. याच रोड ने सरळ पुढे जायचं आणि सोलापूर हायवे साठीच्या वळणाला उजवी कडे वळायचं. पण तुला का जायचंय तिकडे?"
"एका कंपनीत उद्या HR round आहे"
"पाटिल, किती offer घेणार आणि कितींना लटकवणार आहात? पुरे कि आता... तुझं ठरलं आहे म्हणालास ना? मग???"
"हो गं, पण जाऊन बघावं म्हणतो.... देत असतील जास्त पैसे तर बघू"
"काय हे!!!"

-------------------------------------------------------------

काल एकाच दिवसात घडलेल्या या घटना.... सगळयांनाच काहि ना काहि अजून हवंय.... अजून चांगलं!!! आहे त्यात कोणीच समाधानी नाही, सुखी नाही. प्रत्येकालाच वाटतंय कि मला जे मिळतंय ते कमी आहे वगैरे.... म्हणून मग चालू आहे रेस.... धावपळ!!!

हे प्रसंग खरं तर प्रातिनिधीक आहेत.... आपल्या प्रत्येकाच्या भोवती, भोवती कशाला...प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार फरकाने असंच काहि घडत असतं. आपण सुख वस्तूत शोधायला जातो....जे चांगलं आहे ते मला मिळायलाच हवं असं काहिसं सगळ्यांनाच वाटतंय. त्या नादापायी सुख निसटून जातंय... व.पु. म्हणतात ना "सुख हे फुलपाखराप्रमाणे असतं. मागे धावलात तर उडून जातं, शांत बसलात तर अलगद हातावर येऊन बसतं"
आम्हाला हे कळतं...पण मग आजूबाजूचे धावताना बघितले कि आम्हाला पण पळावंस वाटतं.... आणि मग आम्ही पळतंच राहतो. खरंच..जगी सर्व सुखी असा कोण आहे???

Monday, August 27, 2007

खवय्ये पुणेकर!!!!

पुणेकर म्हणलं कि अ-पुणेकराच्या मनात अनेक विशेषणं घोळू लागतात.... जसे कि पेठी पुणेकर, शुद्ध भाषा बोलणारा पुणेकर, "पाणी देऊ का?" असं विचारणारा पुणेकर, स्पष्टवक्ता पुणेकर वगैरे वगैरे(असो...माझ्याच शहराबद्दल मी किती लिहू?) यात खरं किती आणि काय हे जाऊ दे. पु.ल. नी पुणेकर, मुंबईकर आणि नाग्पूरकर लिहिलं च आहे.
मी तर अतिशय अभिमानाने सांगते कि मी पक्कि पुणेकर आहे. कित्येक जण विचारतात "म्हणजे नक्कि काय?" यावर मी म्हणते..
"१. मला लोकांना अमक्या दिवशी अमक्या वेळी आमच्या घरी याच असं म्हणता येत नाही. कधीहि या असंच मी म्हणते.
२. जागोजागी दुकानं असून सुद्धा लक्ष्मीरोड वर जाऊन आल्यशिवाय मला खरेदि केल्यासारखं वाटत नाही.
३. गणपती हा मला दिवाळीपेक्षा मोठा सण वाटतो.
४. दुपारी दुकाने बंद असण्यात मला काहि गैर वाटत नाही. दुकानदारांना पण वामकुक्षीची गरज असते म्हणलं!!!
५. कुठलंहि बिल मी शेवटच्या तारखेच्या आधीच १-२ दिवस भरते.
६. बाहेर जायचं म्हणलं कि दुचाकिशिवाय पर्याय नाही असं माझं ठाम मत असतं
७. मुलीनी गाडीवर स्कार्फ ने आपला चेहरा झाकणं अत्यंत गरजेचं आहे हे मला मान्य आहे.
८. मला खायला प्रचंड आवडतं"

प्रसंगी यात अजून २-३ मुद्दे येत असतील पण इतके तर नक्किच :) यात शेवटचा खायचा मुद्दा जास्त कोणी लक्षात घे नाही. त्यावर कोणी बोलत पण नाही. पण खरं तर पुण्यासारखे खवय्ये लोक महाराष्ट्रात नाहीत!!! त्यातहि बाहेरची खवय्येगिरि!!!
मुंबईमध्ये लोक गरज म्हणून बाहेर खातात...इथे आम्ही ठरवून, खास थांबून बाहेर खातो :) म्हणूनच गेले कित्येक वर्ष इथे लोक ठराविक च पदार्थ विकून सुध्दा टिकून आहेत. दूधवाले चितळे सर्रास मिठाईवाले झाले. इतर कुठल्या शहरात हे इतक्या पटकन आणि सहज झालं नसतं. पुण्यात केवळ अमुक एक गोष्ट खाण्यासाठी दुकानांसमोर रांग लागलेली दिसते.
चितळे ची बाकरवडी, आंबाबर्फी हे तर प्रसिद्धच आहे पण जनसेवा चे मसाला दूध, बेडेकर ची मिसळ, बुधानी चे वेफर्स, पुष्करणीची भेळ, आप्पाची खिचडी, संतोष बेकरी चे पॅटिस, क्रिमरोल, गणेश ची दाबेली, सुजाता ची मस्तानी, दवेंचा ढोकळा, वाडेश्वरची इडली, वैशाली ची SPDP, कल्पना ची पाणिपुरी, कयानीचा केक, ममता चे सामोसे (कॅफे नाज चे पण...पण आता ते पाडलं:()......लिहिता लिहिता तोंडाला पाणी सुटलंय. किती नावं लिहू?? माझ्या काकाचं तर लस्सीचं पण एक खास दुकान ठरलं आहे. वर दिलेल्या सगळ्यांची आपली अशी एक खासियत आहे आणि त्यांनी ती जपली आहे...खवय्ये पुणेकरांनी ती उचलून धरली आहे.
सगळ्यात जास्त महाराष्ट्रियन डायनिंग हॉल पुण्यात असावेत.... पोळी भाजी पासून उकडीच्या मोदकापर्यंत इथे सगळं मिळणारी "खास" ठिकाणं आहेत. पण याचा अर्थ लोक घरी खात नाहेत का? तर असं अजिबात नाही..... घरी खाऊन पिऊन निघून देखील ठराविक ठिकाणी पुणेकराला खास काहि खायचा मोह होतोच....आणि पुणेकर जिभेचे चोचले पूर्ण करतोच!!!

Thursday, August 16, 2007

स्वातंत्र्यदिन

काल १५ ऑगस्ट २००७.... मी काहि वेगळं सांगायला नकोच १५ ऑगस्ट बद्दल. आपण सगळ्यांनीच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देश, स्वातंत्र्य, सैनिक, हुतात्मे, प्रगती, क्रांती, वाटचाल वगैरे बद्दल पुष्कळ ऐकलं असणार. :) कदाचित ऐकून सोडून दिलं असणार.
काल आणि आज हि मी अनेकदा हे एक ऐकलं.... भारताचा ६० वा स्वातंत्र्यदिन!!! मला कळत नाही ६० वा कसा? ६१ वा ना? मी शाळेत शिकले तेव्हा तरी आपण १९४७ साली स्वातंत्र्य मिळवलं (हो, मिळालं या क्रियापदाचा मला राग आहे. मिळत काहिच नाही...मिळवावं लागतं) मग १५ ऑगस्ट १९४७ हा झाला पहिला स्वातंत्र्यदिन!!! मग २००७ साली ६१ व ना?
स्वातंत्र्य मिळ्वून ६० वर्षे झाली...एकदम मान्य. पण स्वातंत्र्यदिन म्हणाल तर तो ६१ वा हो!!! पटतंय का?
काल बड्याबड्या लोकांनी भाषणं केली....आज रस्त्यात मोठे मोठे बॅनर बघितले....सगळे आपले ६० वा स्वातंत्र्यदिन म्हणत बसले आहेत. स्वातंत्र्यदिनाला इतर काहि नाही तर निदान जे बोलतो आहोत ते कितपत बरोबर आहे ते तरी बघा लोक हो!!!

Friday, August 10, 2007

खरेदिचं वेडं वेड

रात्रीचे ८.३० वाजले होते.... ग्राहक काकांशी गप्पा मारून खाट्खाट मशिन बंद केलं नि बससाठी पळत सुटले. बस आली.... पटकन मिळेल ती जागा बघून बसले. बस मध्ये नेहमीप्रमाणे रेडिऒ मिर्ची ठणाणत होतं. मला एकतर मिर्ची वाल्यांची ती धेडगुजरी मराठी (कि हिंदि) भाषा ऐकायला जाम आवडत नाही त्यात रात्री काम करून दमल्यावर तर नाहीच नाही. पण इवल्याशा बस मध्ये ४ स्पीकर असताना मला दुसरा चॉईस नसतो.

"अरे सुनो, आज सबके लिये समोसे और मिठाई लेके आना"
"क्यों साब, कोई लॉटरी लगी क्या?"
"अरे जब एक और बिग बजार खुला है तो समझो लॉटरी हि लगी है"

रेडियो वर एक जाहिरात चालू आहे.....
हे सध्या आपल्याकडे नवीनच....मॉल संस्कृती!!! काहि हजार स्के. फ़ूट जागेत टोलेजंग इमारत..... शहरीजीवनात लागणारं आवश्यक अनावश्यक सगळं यांच्याकडे उपलब्ध. आणि कमी किंमतीत असा यांचा दावा! मग हे लोक वेगवेगळ्या आकर्षक योजना सुरू करतात...अगदि काहिहि..... यांचे सभासद कार्ड घ्या. मग प्रत्येक खरेदिवर काहि गुण मिळवा...आणि मग कधीतरी त्यावर काहितरी मिळवा. किंवा रु. ५०० च्या खरेदिवर रु. २५ ची फळे मोफत!! आणि हे सगळं लोकांपर्यंत पोचावं म्हणून सतत माध्यमांद्वारे जाहिरातींचा मारा! वर्षातून अनेक वेळा हे लोक सेल लावतात.....कधी काहि % सूट तर कधी २ वर १ मोफत तर कधी अजून काहि. माझ्या लहानपणी सेल वर्षातून एकदाच लागायचे आणि म्हणून दुकानांबाहेर तेव्हा रांग लागायची...पण आता दर महिन्याला कुठे ना कुठे सेल असतोच तरीहि गर्दी आटत नाहिये. कमाल आहे.
मुळातच आम्ही जास्त चंगळवादी झालो आहोत. गरजेपेक्षा पैसा जास्त, जबाबदाऱ्या कमी...आम्हाला मिळालं नाही ते तुम्हाला मिळतंय तर उपभोग घ्या अशा उदार विचारांची आई बाबांची पिढी. एकूणच काय "कोई रोकने टोकने वाला नहिं" अशी परिस्थिती!! पूर्वी आम्ही फक्त गुढीपाडवा, गौरी-गणपती, दसरा-दिवाळी अशा वेळी खरेदी करायचो....आता यात भर पडली ती अनेक "डे" ची...आज काय friendship day, उद्या boss day, मग कधीतरी fathers day, mothers day, in-laws day. मग परत त्या त्या दिवशी त्या त्या व्यक्ती साठी काहि भेट!!! खरेदिला अजून वाव :)
आक्षेप खरेदिला नाहिये....अवास्तव खरेदिला आहे. काय घेताय त्याची खरंच गरज आहे का?, आपण ते वापरणार आहोत का? आणि त्यापलिकडे जाऊन देतोय ती किंमत योग्य आहे का? याचा विचार करा.... माझ्या निरिक्षणानुसार आजकाल उच्च मध्यमवर्गीय माणूस साधारणपणे २५% वेळा अनावश्यक खरेदी करतो. विचार न करता...मला वाट्लं, आवडलं आणि शक्य होतं म्हणून घेतलं....या प्रकारात ती खरेदि मोडते.
आणि मग याची सवय लागते. झिंग चढते. आज मी रु १५०० चं घड्याळ वापरते, खरं तर रु. ४००० चं आवडलं आहे. मग मी अजून आटापिटा करेन...आणि स्वत:ला रु. ४००० सहज उडवण्याच्या जागी नेऊन ठेवेन. मग त्यासाठी काहिहि.... १२ तास काम करेन...रोज ३० कि.मी इतक्या लांब ऒफिसला जाईन. मग या सगळ्यापायी मी खाजगी आयुष्यातलं काय गमावतेय ते बेहत्तर. सगळं का??? तर मला "lifestyle" हवी. म्हणजे काय तर मी स्वत:च्या गरजा अवाढव्य वाढवून ठेवायच्या.... २ BHK मध्ये राहू शकत असताना ३ BHK घ्यायचा (घरात माणसं ३ च का असेनात!!!)...मग ते महागड्या वस्तूंनी सजवायचं.... खरेदी संपत नाहीये, पैसा पुरत नाहीये...वेळ उरत नाहीये. सगळंच निसटून चाललंय.
एका घरात दोन TV...कशासाठी?? अरे एकत्र बसून गप्पा मारा ना!!! आणि साध्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमासाठी का तुम्हाला तडजोड करता येत नाही?? सगळे दागिने असताना परत आवडला म्हणून अजून एक नेकलेस!!! भले आम्ही साड्या वर्षातून १० च दिवस नेसू पण पैठणी मात्र माझ्याकडे २ हव्यात.... ३ वर्षाचा मूल....एका जागी १० मिनिट बसत नसेल पण त्याला किनई आम्ही स्वतंत्र study table घेणार.... खरेदी चक्र फिरत राहतंय...अनावश्यक. साधी राहणी काळाआड चालली आहे.
बाजारपेठेने अशी काहि जादू केली आहे कि बाजात आमच्यासाठी कि आम्ही बाजारासाठी? कळेनासं होतंय.... कदाचित कळतंय पण आजूबाजूचे चार लोक करतात म्हणून मी..... पूर्ण समाजालाच खरेदिचं वेड लागलंय!!!

Monday, July 23, 2007

अनिल कपूर

"इतक्यात कुठला सिनेमा बघितलास?" माझा एक मित्र मला चॅट वर विचारत होता.
"अरे, मी कमीच बघते. त्यातहि शाहरुख, रानी किंवा प्रीती नसलेले बघायचे म्हणजे चॉईस कमीच ना!!!" मी
"hmmm...." तो नुसताच हंबरला (आणि त्याने हे वाचलं तर मला मारणार आहे ;))
"पण चिनी कम बघितला..आणि आवडला मला. तब्बू आणि इलाय राजा साठी बघितला." मी
"वा!!! मला पण आवडला. तब्बू मस्त च आहे. मला आवडते" इति मित्र.
मग आमचं चॅट एकमेकांच्या आवडत्या actors/ actress वर गेलं. मग कोण छान दिसतं, कुठला सिनेमा छान वगैरे....

"ए, तुला जर chance मिळाला तर कोणाला भेटायला आवडेल?" अचानक मध्येच त्याचा प्रश्न.
"अनिल कपूर!!!!" माझं उत्स्फूर्त उत्तर.
"काय????" तो जरासा चमकलाच..... मग मी त्याला पटवून दिलं कि अनिल कपूर (AK) कसा versatile आहे वगैरे.....

अनिल कपूर.....एक नाव आणि रंग सोडला तर हिंदी चित्रपट्सृष्टीतल्या दिग्गज कपूर लोकांशी दूरान्वयेहि संबंध नाही. पदार्पण साधारण मिथुन, गोविंदा या लोकांच्या काळातलं..... तो एक काळ असा होता कि चांगला सिनेमा दुर्मिळ झाला होता.... ना चांगली कथा, ना गाणी.... नाच देखील भयानक!!! अशा वेळी AK आला.... "वो सात दिन" सारखे हट के सिनेमांमधून. आपल्या गावातून मोठा कलाकार होण्यासाठी बाहेर पडलेला तरूण लाजवाब आहे. चेहऱ्यावरची निरागसता, मनाचा सच्चेपणा सगळं छान जमलंय. मी हा सिनेमा खूप नंतर बघितला...(साहजिक आहे...सिनेमा आला तेव्हा मला मराठी जेमतेम कळायचं...हिंदि काय कप्पाळ कळणार?). पण जेव्हा बघितला तेव्हा AK जबरी आवडला.
AK ने एक से एक सुंदर आणि त्याहून महत्तवाचं म्हणजे variety movies केले.....तुम्ही म्हणाल ते तर आमिर ने पण केले. पण फ़रक आहे. आमिर ने variety इथे industry मध्ये settle झाल्यावर दिली....AK ने अगदी सुरूवातीपासून केलं. त्याचा कर्मा, मशाल, साहेब, मेरी जंग वगैरे आठवा..... कुठेच तो गुलफाम चेहऱ्याचा, हिरोईन च्या ओढणीशी खेळणारा नाही आहे. कर्मा मधला रोल तसा लहान...पण लक्षात राहतोच. साहेब मधला बहिणीच्या लग्नासाठी किडनी विकणारा भाऊ मन हेलावून सोडतो. मेरी जंग.....यातल्या performance बद्दल मी काय लिहू??? गिरिश कर्नाड, नूतन सारखे मोठे कलावंत....त्यांचा मुलगा AK... वडिलांचा खून होतो...त्या धक्क्याने आई वेडी होते....त्या सगळ्यातून स्वत:ला आणि लहान बहिणीला AK सावरतो...आई ला धक्क्यातून बाहेर काढतो. कथा अपेक्षित धाटणीची...पण AK rocks!!! त्याच्या ईश्वर पण असाच हट के सिनेमा...पण यातला कुठलाच सिनेमा सुपर डुपर हिट ठरला नाही. ते यश AK ला मि. इंडिया ने दिलं.
मला अजूनहि आठवतंय तो सिनेमा आला तेव्हा जवळ जवळ माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींनी तो थिएटर मध्ये जाऊन बघितला होता. जुन्या ब्रह्मचारी ची कथा घेऊन बोनी कपूर ने हा सिनेमा काढला.... एका अद्भुत घड्याळाने AK व्हिलन लोकांचा धुव्वा उडवतो... १५-२० अनाथ मुलांना जीवापाड प्रेम देतो.....आत्ता जी पिढी २५-३२/३३ मध्ये आहे..त्या सगळ्यांना हा सिनेमा तेव्हा जबरी आवडला असणार. कित्येक आठवडे या सिनेमाने यश चाखलं.....आणि हे यश पूर्ण बोनी आणि अनिल चं आहे.
इथून पुढे AK चमकू लागला..... तेजाब, राम लखन, बेटा, खेल वगैरे माधुरी बरोबर च सिनेमे.... सगळेच चांगले आहेत असं नाहिये..पण तो चमकत होता हे मात्र मान्य करायलाच हवं.
लम्हे पण एक सुंदर सिनेमा!!! (फक्त त्याने मिशी काढायला नको होती) याच दम्यान त्याचा आवडलेला आणि लक्षात राहिलेला सिनेमा म्हणजे परिंदा... परत एकदा माधुरी! खूप दिवसांनी भेटणाऱ्या मित्राचा खून प्रत्यक्ष डोळ्याने बघितला.....खून ज्याने केला त्याच्याकडे भाऊ काम करतो.....ज्याचा खून झाला तो परम मित्र आणि त्याची बहिण प्रेयसी...... AK चा पूर्ण emotional performance!!! (यातला नानाचा अण्णा पण मस्त!!!)
मध्ये बराच काळ AK गायब होता..... इकडे शाहरुख, अक्षय टाईप नवीन लोक येत होते. AK त्यावेळी होमवर्क करत असावा.
आणि मग तो परत आला.....१९४२...., नायक, विरासत, पुकार, ताल, कलकत्ता मेल, murder असे वेगळे सिनेमा घेऊन. नायक जरा जास्त च फिल्मी आहे पण AK साहजिकच भाव खाऊन जातो. विरासत.....मला अजून असा माणूस भेटला नाहिये ज्याला हा सिनेमा अजिबात आवडला नाहिये. Virasat is a same old but well described and well potrayed story!!! US return अनिल आणि वडिल गेल्यावर त्यांची गादी चालवणारा अनिल....दोन्हि आवडतात. ठाकूर झालेला अनिल अप्रतिम दिसतो. तब्बु वर प्रेम करणारा अनिल हळवा वाटतो.....all in all....विरासत मध्ये AK ची ताकद पुन्हा एकदा दिसून येते. ताल मधला practical अनिल भावुक अक्षयपेक्षा जास्त जवळचा वाटतो. या सिनेमातले त्याचे संवाद आणि संवाद्फेक दोन्हि नेहमीपेक्षा वेगळी आहे. सिनेमाच्या शेवटी मला वाटलं होतं कि, ऎश्वर्या का याला सोडून अक्षय कडे जातेय?
बिवी नं. १, No entry मध्येहि इतर कोणापेक्षाहि AK अधिक स्पष्ट लक्षात राहतो. अरमान हा पण त्याचा अजून एक वेगळा सिनेमा!! दीवाना मस्ताना मध्ये गोविंदा बरोबर केलेली धमाल मजा देऊन जाते.
AK ने काहि अगदीच बोअर सिनेमे पण केले....जसे लाडला, रूप कि रानी..., जुदाई वगैरे. पण त्याचा overall graph बघता असे खूप कमी सिनेमा आहेत. ८०% वेळा AK ने वेगळं दिलं आहे....वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा करियर स्पॅन तर नुसत्या पद्मिनी कोल्हापुरे ते बिपाशा यावरून च ओळ्खावा. आणि या इतक्या प्रचंड काळात जपलेली स्वच्छ प्रतिमा. AK हा खून हॅंडसम, चिकणा आहे असं माझ्या एका मैत्रिणी ने प्रत्यक्ष बघितल्यावर सांगितलं आहे. असं असून त्याचं नाव कोणाबरोबर घेतलं गेलं नाही. जिच्याशी लग्न केलं तिच्याच बरोबर अजून हि आहे. (आमिरने इथे मार खाल्ला..)
खरं सांगायचं तर अनेक आत्ताच्या किंवा त्याच्या काळ्च्या कोणापेक्षाहि AK सरस आहे. आज हि मला AK चा सिनेमा म्हणलं कि काहि वेगळं असेल याची खात्री असते.... त्याची मुलगी आता १७-१८ वर्षांची आहे म्हणे....
ती जर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेमात येणार असेल तर AK ने अशीच variety करण्याची समज दिला पण द्यावी!!!
AK..... कोणी मानो वा ना मानो...पर तुस्सी ग्रेट हो!!!

Sunday, July 08, 2007

वास्तुशास्त्र!!!

Real estate business ने आजकाल इतका सुवर्णकाळ पूर्वी कधी बघितला नसेल.... मागच्या वर्षीचा प्रति चौरस फूट चा भाव आज जवळपास ४०% ने वाढलेला आहे. आणि ठोस कारण काहि नाही. या दरवाढीवर सरकारी/ निमसरकारी कुठल्याच यंत्रणेचा control नाही. कुठल्या भागात जागेचा काय भाव असावा याचे काहि कोष्ट्क नाही. काहि शहरात (जवळपास सगळ्याच), काहि भागात जागेचे भाव असे चढले आहेत कि चांगल्या जागेत राहाणं हा अनेकांचा survival प्रश्न व्हावा!!! असो....यावर बरंच आहे लिहिण्यासारखं...ते नंतर कधीतरी :)

तर या अचानक फुगलेल्या real estate business मध्ये अनेक इतर व्यावसायिक आपली पोळी भाजत आहेत. यात अगदी interior decorator, designer sanitary accessories, सुतार, fabricator.....गेला बाजार अगदी माळी सुद्धा आले. आणि या सगळ्यात गेल्या ४-५ वर्षात अधिक भाव आला तो वास्तुशास्त्र या प्रकाराला!!! म्हणजे हे शास्त्र काहि नवं आहे का हो? नाही...पण लोक अचानक जागृत झाले याबाबत. घर बांधायला सुरूवात झाली किच लोक एखाद्या वास्तुशास्त्र जाणकाराला गाठा....घरातल्या प्रत्येक चौरसाबद्दल त्याचा सल्ला घ्या....त्याप्रमाणे घराच्या मूळ रचनेत अतोनात बदल करा असा सगळा प्रकार चालतो. पूर्वी ज्योतिषकार, पत्रिका बघून तारिखवार भविष्या सांगणे या लोकांची जाम चलती होती. तीच जागा आज या वास्तुशास्त्र वाल्या लोकांनी घेतली वाटतं.

मी नास्तिक नाही....देवावर माझी श्रध्दा आहे. अडचणीच्या वेळी त्याच्यावर हवाला टाकलेला आहे. आणि मी विचार केला त्याहून जास्त सकारात्मक रिझल्ट मला देवाने दिलेला आहे. देवपूजा, स्तोस्त्रपठण इ. मी मानते. या सगळ्याने जी पवित्रता निर्माण होते ती मला आवडते. पण तरीहि मला स्वत:ला देवाधिष्ठीत म्हणवणारे ज्योतिषकार कधीच आवडले नाही. तोच प्रकार या वास्तुशास्त्राचा!!! घराची रचना कशी त्यापेक्षा त्या घरात राहातं कोण यावर त्या घराचं सुख, उन्नती ठरते ना!!! घर म्हणजे पूर्वेकडे दरवाजा, दाराच्या दिशेने laughing buddha कि घर म्हणजे हसतमुखाने स्वागत, अगत्य...कुटंबातल्या लोकांचा एकमेकांवर विश्वास, प्रेम ??? मला वाटतं....businessman जसा काळा पैसा कसा खर्च करू असा विचार करत काहिहि करतो...तसं आज गरजेपेक्षा जास्त मिळणारा पैसा लोक अशा अनैसर्गिक गोष्टीवर खर्च करत असावेत.

या वेडापायी आजकाल काहिहि ऐकायला मिळतं.... दक्षिणमुखी घर नको!!! मला दक्षिणमुखी मारूती माहित आहे.... घर काय प्रकार आहे विचारलं तर कळलं ज्या घराचा दरवाजा दक्षिणेला आहे ते म्हणे दक्षिणमुखी. विचार केला... मी लहानाची मोठी ज्या घरात झाले ते दक्षिणमुखीच होतं. पण आजहि त्या घराइतक्या रम्य आठवणी मला दुसर्या कुठल्याहि जागेच्या नाहीत. माझ्या आई-बाबांनी आम्हा भावंडांबद्दल याच घरात स्वप्ने बघितली...बरीचशी त्याच घरात पूर्ण झाली. आजच्या मानाने पैसे कमी असूनदेखील आताच्या आणि तेव्हाच्या सुख समाधानात फरक असा तो नव्हता!!! एका माणसाने म्हणे घर बांधून पूर्ण झाल्यावर वा.शा. वाल्याला बोलावलं (घर बांधूनहि पैसे शिल्लक राहिले असावेत!!!) तर त्या वा.शा. ने सांगितले कि तुमचे स्वच्छ्तागह चुकिच्या दिशेला आहे. मी चाट च!!! अहो दिवसाचे १५ मिनिटाचे अति महत्वाचे काम त्यात आमच्या पूर्वजांनी देखील दिशेचा विचार केला नाही. आणि "घाईची" लागली कि कुठे दिशा शोधत बसाल??? असो... तर त्या माणसाने toilet काढून पार drainage line बदलून प्रात:विधीसाठीची दिशा बदलली. मी म्हणलं..आता "पूर्वीपेक्षा कमी वेळात आणि जास्ती" होते कि काय? दिशेचा परिणाम म्हणून????

तर यातला विनोदाचा भाग सोडा.... पण वा.शा. हे एक चक्रव्यूह आहे. तुम्ही आत जाता...जातच राहता. बाहेर पडायचा मार्ग ना तुम्हाला दिसतो ना तुम्ही आत राहू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली आणि येनकेन कारणाने ते जमलं नाही तर...मन खातंच राहातं. आणि घर म्हणजे काय हो? वा.शा. प्रमाणे बांधलेल्या घरात जर आई बाबांना जागा नसेल तर कशाला ती वास्तुदेवता प्रसन्न होईल? घर बनतं ते माणसांनी कि योग्य दिशेला योग्य ठेवलेल्या वस्तुंनी??? पैसा आहे म्हणून तो उधळू नका.... तो पैसा मिळवण्याची शक्ती ज्या शिक्षणाने तुम्हा आम्हाला दिली त्याचाच वापर जरा सारासार विचार करण्यात करा. घराची गरज काय..संकल्पना काय हे तपासा.

वा.शा. प्रमाणे घर बांधलेले १००% सुखी आहेत असा पुरावा आहे? जो तो आपलं नशीब घेऊन येतो....प्रत्येकाला चढ उतार आहेतच. आणि चढ सोपा करतील ती तुमची नाती...तुमचे आचार विचार. उतारावर साथ देणारी पण तीच!!! मी रोज वायव्येकडे प्रात:विधी करूनहि मला promotion का मिळत नाही असं का म्हणणार आहात तुम्ही? मग कशासाठी हा अट्टाहास????

वेळीच जागे होऊया..... वा. शा. च्या वाढणाऱ्या स्तोमाला आवर घातलाच पहिजे.

Wednesday, June 27, 2007

स्टेनलेस स्टील

स्टेनलेस स्टील हा प्रकार ज्या कोणा महाभागाने शोधून काढला त्याला माझे कोटी कोटी प्रणाम!!! जगातल्या इतर कुठल्याहि शोधापेक्षा सामान्य माणसाला या शोधाइतका फ़ायदा झाला नसेल.
स्टील म्हणजे मायमराठीत खरं तर लोखंड!!! स्टेनलेस म्हणजे डाग नसणारे....(दाग अच्छे होते है वगैरे विसरा!!!) काय कमाल कल्पना आहे....लोखंड म्हणलं कि वाटतं जड वस्तू, आठवतो तो लाल गंज.... कधी हिरवी करडी बुरशी. (पाण्याचा पाईप बघितला असेल तर सहमत असालच). पण स्टेनलेस स्टीलने हे सगळं खोडून काढलं... हे ना जड, ना याला गंज चढतो. स्पर्श पण इतक सुखद कि जणू रेशमी साडी वरून हात फ़िरवावा. स्टेनलेस स्टील हे भारतात internet पेक्षाहि लवकर प्रसिद्ध झालं असावं. पितळी भांडी वापरणारी आजी स्टेनलेस स्टीलची भांडी कधी वापरू लागली तिलाच कळलं नाही :) घासायला सोपी, दिसायला छान...म्हणून सगळ्यांनीच स्वागत केलं. आज हि काहि खेड्यात वीज नसेल पण स्टेनलेस स्टील नक्कि असेल.
मला तर स्टेनलेस स्टील फार मनापासून आवडतं. कारण भांडी घासायचा मनस्वी कंटाळा आहे...त्यामुळे शक्यतो जमेल तितकि भांडी कामवाल्या बाईकडून घासून घ्यायचा माझा प्रयत्न असतो. बाईला स्टीलची भांडी द्यायला बरी ना!! acralic किंवा काचेची भांडी दिली तर उगाच ती फुटतील, तडा जाईल अशी भिती जास्त....(आई अशी भांडी घरी घासायला लावते...मग तर मल स्टेनलेस स्टील ची जास्तच आठवण येते) पाहिजे त्या आकाराची स्टेनलेस स्टीलची भांडी मिळत असताना लोक कशाला त्या महागड्या dinner set च्या मागे लागतात कळत नाही. एक तर महाग महाग म्हणून जपून वापरायचं आणि कधीकाळी वापरलंच कि स्वत: घासत बसायचं...सांगितलाय कोणी नसता त्रास? मस्त branded steel आणा (neelam वगैरे).छान टिकाऊ असतं...लहान मुल घेईल का...मग ते फ़ुटेल का....चिंता नको!!! साध्या आपटण्याने वा पडण्याने स्टेनलेस स्टील ला काहिहि होत नाही....ते काय काचेचं भांडं नाही एक चरा, टवका गेला तरी विद्रूप दिसायला. परत अगदी स्वत: घायायची वेळ च आली तर साबणाचा एक हात फ़िरवा कि स्वच्छ नि पूर्ववत सुंदर :) No tention!!!
मला तर त्या अति महाग भांड्यांचा मुळीच सोस नाही नि कौतुक तर त्याहून नाही, जी भांडी घरच्या बाईलाच त्रास देतात ती भांडी काय कामाची??? अशा गोष्टी दुकानातल्या शोकेस मध्येच बऱ्या. मी तर खुष आहे स्टेनलेस स्टील वर आणि त्याच्या जनकावर!!!

Wednesday, June 13, 2007

गोळे बाई

गोळे बाई.... माझ्या मनात एक विशिष्ठ स्थान असलेली व्यक्ती. मनाचा एक संपूर्ण कप्पा मी गोळे बाईंना दिलाय असं म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरू नये!!!
माझ्या वयाच्या तिसऱ्या - चौथ्या वर्षी आमची गट्टी जमली. अर्थात...त्या माझ्या बालवर्गाच्या शिक्षिका होत्या. प्रसन्न हसरं व्यक्तिमत्व... मोतिया गोरा रंग, अगदी माझी मैत्रिण होऊन माझ्याशी बोलणं. मला सगळंच आवडलं होतं...अगदी पहिल्या दिवसापासून. आई-बाबा आजहि सांगतात कि मी शाळेच्या पहिल्या दिवशीदेखील अजिबात रडले नाही. याचं कारण गोळे बाईच असाव्यात. इतक्या छान बाई मिळाल्यावर का रडेन मी? आज अचानक मला त्यांची आठवण यायचं कारण म्हणजे नुकताच शाळेत जाऊ लागलेला माझा भाचा... काल शाळेत रडला....म्हणलं साहजिक आहे "त्याच्या शाळेत गोळे बाई नाहित!!!" इतकं बालवर्ग आणि बाईंचं गणित माझ्या डोक्यात पक्कं आहे. :)
गोळे बाई म्हणजे एकदम tip top बाई... मला तर त्या अगदी हेमामालिनी च वाटायच्या!!! deam girl सारख्या माझ्या dream बाई :) केसांचा यू कट, त्याला एखादी छानशी क्लिप लावलेली. डाव्या हातात गोऱ्या मनगटावर शोभून दिसणारं काळ्या पट्ट्याचं घड्याळ, चेहऱ्यावर लोभस हासू, शक्यतो हलक्या फिकट रंगाची पान-फुलाचं डिझाईन असलेली साडी....खांद्याला पर्स, त्यात नेहमी ४-५ गोळ्या, चॉकलेट्स. आजहि मला त्यांचं हे रूप जसच्या तसं आठवतं...जणू मी आत्ता अर्ध्यातासापूर्वी भेटलेय त्यांना. मी शाळेत जाणं कधीहि टाळलं नाही...अगदी आई बाबा एखाद दिवशी म्हणाले तरीहि.... कारण मग मी माझ्या लाडक्या बाईंच्या भेटीला मुकायचे!!!
बाईंना पण मी खूप आवडायचे....त्या आधीच माझ्या लाडक्या अन मी त्यांची लाडकी म्हणून मग त्या माझ्या अजून खूप खूप लाडक्या :) बाई कशा बोलतात, कशा बसतात, कधी काय करतात याचं मी अगदी बारिक निरिक्षण करत असे.... घरी आलं कि आईने दिलेला खाऊ खाऊन लगेच मी "गोळे बाई" व्हायची (शाळा शाळा हा माझा आवडता खेळ!!!) माझा खेळ बघून घरी सगळ्यांना आज शाळेत काय झालंय ते कळायचं, इतकं त्यात साम्य असायचं..... बड्बड्गीत, गोष्टी सांगण्यात बाई पटाईत. फळ्यावर त्या अशा काहि चित्र काढायच्या कि वाटावं पुसूच नये. जसे टपोरे डोळे तसंच टपोरं अक्षर..... कुठलाहि सण असला कि आदल्या दिवशी त्याची गोष्ट, महत्त्व सांगायच्या...सुसंगत चित्र फळ्यावर काढायच्या. All rounder बाई!!!
शाळेत पहिल्या शिक्षक दिनाला मी त्यांच्या साठी गुलाबाचं फूल घेऊन गेले होते...ते देऊन मी त्यांना नमस्कार केला. बाईंना इतका आनंद झाला होता, कि त्यानंतर मी जवळ जवळ एक-दोन दिवसाआड त्यांच्यासाठि फूल घेऊन जायचे. आणि कधी ते फूल त्यांच्या साडीच्या रंगाला matching झालं तर मला अगदी आभाळाला हात लावल्यागत व्हायचं. बाईंना पण याआधी किती वेळा विद्यर्थ्यांनी फुलं दिली असतील....पण दर वेळी त्या त्याच आनंदाने हसायच्या आणि फुल डोक्यात घालायच्या. कधी कधी मला दुसऱ्या दिवशी येऊन सांगायच्या "स्नेहल, फुल छान होतं असं अंजू मंजू ने सांगितलंय". अंजू मंजू या त्यांच्या जुळ्या मुली...माझ्याहून ३-४ वर्षांनी मोठ्या. असंच बाई एकदा म्हणाल्या "अगं, अंजू मंजू ने त्यांच्या नवीन बाहुलीचं नाव ’स्नेहल’ ठेवलंय"...वा!!!! "आज मै उपर, आसमान नीचे" हा अनुभव मी पहिल्यांदा त्या दिवशी घेतला. म्हणजे जितकि बड्बड मी घरी त्यांच्याबद्दल करायची तितकीच त्याहि माझ्याबद्दल करयच्या तर.... (केवळ एक वेगळं नाव म्हणून अंजू मंजू ने ते नाव ठेवलं असेल असा खडूस विचार तेव्हा माझ्या चिमुकल्या मनातहि आला नाही)
मी शाळेत जायला कधी उशीर केला नाही.....शाळा कधी बुडवली नाही. ्सगळ्या स्पर्धेत भाग घेतला, नंबर मिळवला, शिकवलेलं बरंच आपोआप लक्षात राहायचं....बाईंची लाडकि व्ह्यायला इतकि कारणं पुरेशी होती...मला आपलं उगाच वाटायचं कि माझे गोरे गुबगुबीत गाल बाईंना आवडतात नि मी त्यांना फूल देते म्हणून पण मी त्यांना आवडते.
बघता बघता शाळेतलं पहिलं वर्ष संपलं...बाईंनी "उत्तम" असा शेरा मारून प्रगती पुस्तक हातात दिलं. पुढच्या वर्षी आता गोळे बाई नसणार शिकवायला हे कळलं त्याक्षणी मला रडूच आलं होतं. शाळा नकोशी झाली. मग त्यांनी आणि आई ने मिळून माझी समजूत घातली..... वर्गात नसले तरी बाई माझे लाड करत राहतील अशी खात्री झाल्यावरच मी रडं बंद केलं.
जून मध्ये परत शाळा सुरू झाली. सवयीप्रमाणे मी गोळे बाईंच्या वर्गात (म्हणजे बालवर्गात) गेले.... बाईंनीच मग दुसऱ्या वर्गात पाठवलं....
त्यानंतर मात्र बाईंनी मला वर्गात असं कधीच शिकवलं नाही.....पण आम्ही भेटायचो...दर शिक्षकदिनाला फुल, गुरूपौर्णिमेला नमस्कार.....कुठलंहि बक्षिस मिळालं कि बाईंची शाबासकि हे अगदि ठरलेलं. जणू मी आम्ही दोघींनी ते सगळं गृहित धरलं होतं.
चवथी नंतर शाळा बदलली.... आता बाईंची भेट क्वचित होत असे. पण मनात त्या तशाच होत्या. मी पुढे पुढे जात राहिले...शाळा, कॉलेज, नोकरी...... चार वर्षांपूर्वी अशाच अचानक डेक्कन वर भेटल्या....तेच सुंदर हासू घेऊन!!! मी आता नोकरी करते....IT मध्ये..याचं काय कौतुक त्यांना!!! बोलता बोलता कळलं कि त्या एक वर्षात निवृत्त होणार...म्हणलं "बाई, मग आपल्या बालवर्गाचं काय? तुम्ही नाहित तर मुलं खूप काहि गमावतील" माझ्या त्या भाबड्या प्रेमाला बाई नी हसत माझी पाठ थोपटत प्रतिसाद दिला.
आता बाई निवृत्त झाल्या असतील.....जे त्यांच्याकडे शिकले ते खरेच भाग्यवान!!! आणि मी सगळ्यांहून जास्त...कारण माझ्या पहिल्या शिक्षिकेवर मी जितकं प्रेम केलं त्याहून कितीतरी पट अधिक त्यांनी माझ्यावर केलं.

Friday, June 08, 2007

परिपक्वता...

साधारण सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे.... आईने मला विचारलं "तुला सांगली ला जायला जमेल का या गुरूवारी?"
"का गं? एकदम सांगली??"
"लग्न आहे ’तिचं’ "
"अरे वा!!! मजा आहे. अगं पण असं अचानक अवघड आहे जमणं.... कधी ठरलं लग्न?"
"बरेच दिवस झाले.... बरंच समजावून झालं, रडून झालं...पण ती ऐकत नाही म्हणून मग आई बाबांनी करून द्यायचं ठरवलं"
मग या नंतर आईने मला स्टोरी जरा डिटेल मध्ये सांगितली.
’ती’ माझी एक लांबची मावसबहिण. लहानपणापासून हुषार...हुषार म्हणून आधीच हौशी असलेल्या आई बाबांनी जास्तच लाडात वाढवलेली. तिचा दहावी, बारावी चा निकाल म्हणजे ९० च्या पुढे किती हेच कळायचं बाकि असायचं...तिथेपर्यंत ती जाणार याची खात्रीच!!! मग इतर ४ हुषार पण ठरलेल्या वाटेने जाणाऱ्यांप्रमाणे तिनेहि Computer Engineer व्हायचं ठरवलं.
करता करता ३ वर्ष पार पडली. चवथे सुरू होताच campus drive चालू झाला. एखाद दुसरी कंपनी निसटली असेल..आणि तिचं एका मोठ्या कंपनीत सिलेक्शन झालं. वा!!! परत अपेक्षित कौतुकाचा वर्षाव. लठ्ठ पगार, पुण्यात नोकरी..... सगळेच जणू हरखून गेले होते. शेवटचं वर्षहि झालं.....ती पुण्यात आली. कदाचित खूप स्वप्न उराशी घेऊन.....
काळजी घे, वेळेत खात-पित जा.....वगैरे सूचना आई बाबांनी दिल्याच. पैशाची काळजी करू नकोस......वगैरे पण होतंच. या सगळ्यात एकच सांगायचं राहिल..."आम्हाला काळजी वाटेल असं काहि वागू नकोस"
तिचं आता स्वतंत्र आयुष्य सुरू झालं..... कोषातलं फुलपाखरू जणू बागेत अचानक सोडलं गेलं. नवीन कंपनी, नवीन वातावरण......सगळच मखमली, गुलाबी!!! आमच्यासारखे काहि नातेवाईक होतेच पुण्यात....पण तिने नेहमीच येणं-जाणं टाळ्लं. दिवसातले ११-१२ तास तर कंपनीतच जात होते....आर्थिक स्वयंपूर्णता हि होती.
अशा वेळी मोहाचे क्षण म्हणजे जणू तुमची सावली असतात. २२-२३ चं वय.... मित्र मैत्रीणींचा गराडा. इतके दिवस निर्णयात आई बाबा असतात...आता सगळं स्वत:च ठरवायचं. thrilling वाट्तं सगळंच. आपण चुकू असं चुकूनहि मनात येत नसावं. कारण तसा विचार करण्याची शक्ती च मिळाली नाहि कधी!!!
पुढचं एखादा चित्रपट वाटावा इतकं साहजिक आहे...... ती एका मुलाच्या प्रेमात पडली....तो पण. तो हरियाना मधल्या कुठल्या तरी गावातला. तो पण हुषार..... गुलाबी रंग अजूनच गडद झाला, मखमल अजूनच मऊ!!! तिने घरी सांगितलं... कडाडून विरोध ठरलेला..... एकदा, दोनदा....अनेकदा........ शेवटी आई बाबांनी लग्न करून द्यायचं ठरवलं. ती अशी का वागतेय किंवा ते का इतका विरोध करताहेत हे दोघांनीहि विचारात घेतलं नाही. "आमची इतकि हुषार मुलगी अशी वागेल असं वाटलं नव्हतं" असं ते म्हणतात. "मला सगळं देणारे आई बाबा लग्नाला का विरोध करताहेत" असं ती म्हणते. गैरसमजाची भिंत.... कोणी तोडतच नाहिये...कि त्यांना ती दिसतच नाहिये???
थोड्याशा अनिच्छेनेच लग्न पार पडलं. वाटलं झालं सगळं सुरळित........ पण कहानी का climax अभी बाकि है!!!
राजा राणीचं नवीन आयुष्य सुरू झालं. प्रेमात पडले, घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं.... पण लग्नातली जबाबदारी, घ्यायची खबरदारी न यांनी विचारात घेतली ना यांच्या आई बाबांनी.
नोकरी, घर याच्यात ती गुंतून गेली.....त्याचं MBA करायचं आधीच ठरलं होतं, तो त्यामागे होता. लग्नाच्या ३ च महिन्यांनी दोघांना कळलं कि ते आता आई बाबा होणार आहेत!!! या गोष्टिला मानसिक तयारीच नाही...... त्याला MBA करायचं आहे....आणि तो शिकणार म्हणून तिला नोकरी गरजेची आहे. आता काय?? काहि नाही...... show must go on!!!
हे सगळं ऐकून मावशीला त्रास झाला.... साहजिक आहे. काल्पर्यंतची मुलगी, उद्या आई होणार...या नाजूक अवस्थेत नवरा सोबत नसणार (तो परगावी असणार). "काय हि गडबड? इतके शिकलेले लोक...असं कसं करतात?" हे आणि वर सगळ्या मोठ्या लोकांचं मत.....
पण मी म्हणते सगळी चूक त्यांचीच आहे????? पालक, मोठे म्हणून तुम्ही काहिच चुकला नाहि??? मुलीला (मुलाला देखील) शिकायला, नोकरीसाठी बाहेर पाठवताना काहि गोष्टिंची कल्पना आई बाबांनी द्यायला हवी. बाहेर काय प्रलोभनं असतात, चार लोकांमध्ये चांगला माणूस कसा ऒळखावा वगैरे. सतत आई बाबांजवळ राहिल्याने विचारशक्तीला खूप मर्यादा आलेल्या असतात..... बाहेर पडल्यावर आपली आपण चौकट ठरवायची आणि पाळायची असते. पण हे कोणीतरी सांगायला हवं होतं ना? आजकाल च्या जगात निर्णय मुलांनीच(अपत्य) घ्यायचा आहे, पण तो निर्णय बरोबर घेण्याची क्षमता आई बाबा म्हणून तुम्ही द्यायला हवी ना? तिचा त्याच्याशी लग्न करायचा निर्णय बरोबर असेल (कारण तो शिक्षण, नोकरी वगैरे दृष्टिने योग्य आहे) पण मग आता जी जबाबदारी तिला एकटिला पेलावी लागेल(त्याचं MBA होईपर्यंत) त्याचं काय? मुलीचं लग्न म्हणलं कि साड्या, दागिने, हळवं होणं इतकंच......कि त्यापुढे जाऊन तिला काहि महत्त्वाच्या गोष्टि सांगायला हव्यात??? आपल्या देशात अजून तरी सांगायलाच हव्यात. निदान २२-२५ या वयापर्यंत तरी!!!
खूप शिकलेले लोक याबाबतीत चुकतात....सरळ आहे. आपलं शिक्षण आपल्याला तांत्रिकदृष्ट्या परिपक्व बनवतं...... पण मानसिक परिपक्वता कुठलंच लौकिक शिक्षण देत नाही. तिथे महत्त्वाचे ठरतं upbringing, आई बाबा नी तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावं म्हणून घेतलेले कष्ट....संस्कार......तुमची जगाकडे बघण्याची आणि आकलन करण्याची शक्ती. या सगळ्यात पालकांचा वाटा खूप मोठा आहे. निर्णय पुढच्या पिढिलाच घेऊदेत...पण तुम्ही त्यांना योग्य निर्णय घेण्याची परिपक्वता द्या. त्याने तुमचा उतार वयातील त्रास नि पुढच्या पिढिचा तरूणाईतला मनस्ताप नक्किच कमी होईल.

Thursday, May 31, 2007

एक दिवस गंमतीचा....

काही काही दिवस जबऱ्या हटके असतात....म्हणजे लौकिकार्थाने त्यात काहिही खास नसतं (वाढदिवस, पगारवाढ वगैरे वगैरे)पण नेहमीच्या घटनाच अशा काहि चमत्कारीक घडतात कि दिवस वेगळा होऊन जातो. तसाच हा एक दिवस...२९ मे २००७.
माझ्या शाळेतल्या मैत्रिणीचा वाढदिवस या पलिकडे याला काहिहि महत्त्व नव्हतं....पण काहि मजेशीर गोष्टींमुळे हा दिवस लक्षात राहिल.

घटना १.

नुकत्याच घेतलेल्या insurance policy साठी आज मेडिकल होती. डॉ. सकाळी ८.३० ला येणार होते, म्हणून मी आदल्या रात्री ८.३० ला जेवून त्या नंतर काहि न खाता पिता बसले होते. ९ वाजले, ९.३० वाजले....डॉ. चा पत्त नव्हता. न राहवून (भूक न सहन होऊन लिहायचं म्हणजे मी अगदीच ’हि’ आहे असं कबूल केल्यासारखं होईल ना!!!) insurance agent ला फोन केला.

"अरे ...., ते डॉ. अजून आले नाहीत."
"हो, निघालेत ते. २० मिनिटात येतील"

१-१ मिनिट मोजत बसले. १५ व्या मिनिटाला डॉ चा फोन....
"मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय. अजून अर्धा तास लागेल"
"अहो मला ऑफिस असतं. तिकडे वेळेत जावं लागतं. आता आज नका येऊ. शिवाय पोटात अन्नाचा कण नाही गेले १३ तास.... (लाज नाही वाटत..खात्या पित्या गुटगुटीत मुलीला उपवास घडवता!!! कुठे फेडाल???)"
"मग उद्या येऊ? हवं तर ऑफिसमध्येच येतो. जास्त काहि नाही...ECG & blood test आहे."
मी उडालेच..."अहो ऑफिसमध्यए काय?? तिकडे कुठे करणार हे सगळं"
"एखादी isolated room असेलच ना... तिकडे करू"
(वा!!! काय तयारी आहे डॉ ची...कर्तव्यदक्षता अशी असावी.... )
"आहे हो...पण तिकडे तुम्हाला नाही सोडणार"
"का?"
(कारण तुम्ही माझ्या कं च्या CEO चे जावई नाही)
"नाही सोडणार. शनिवारी करूयात आता या टेस्ट्स"

घटना २.

वरच्या सगळ्या प्रकारामुळे ऑफिसला उशीराच्या बसने जावं लागणार होतं. १२.३० ची शटल असते..जिच्यासाठी १२ पासून बुकिंग चालू होतं..... मी १२.०४ ला पोचले....बघते तर शटल बुकिंग फ़ुल झालं होतं...
"अहो, १२ ला सुरू करता ना? मग इतक्यात कसं झालं?"
"मॅडम, ३० च शीट असतात....भरले"
"पण इतक्यात??? तुम्ही असं म्हण्ताय कि लोक ऊठ्सूठ विमाननगरला जातात."
"आता ३० भरायला किती वेळ लागतो? आणि १५ मि. झाली कि आता"
"१५ कुठे?? ५ तर झालीत. तुमचं घड्याळ पुढे आहे...."
"नाही!!! मी कं चे घड्याळ बघून च बुकिंग घेतो..."
त्याच्यावर वैतागून मी बाहेर जाऊन बस ची वाट बघत उभी राहिले.
बस आली. बुकिंग केलेले लोक चढले.....नेमके आज सगळे आले होते...एकाला तरी न यावंसं वाटावं!!!
बुकिंग केलेलेच लोक चढले आहेत हे बघायला एक security वाला आला.
"मॅडम, बस फुल झाली."
"ते दिसतंय...पण २ जागा आहेत अजून..."
"अहो तिथे किन्नर (क्लिनर) बसतो."
"आता आपल्याला कुठे माऊंट अबू ला जायचंय कि किन्नर पाहिजे....उतरवा त्याला. मला ऑफिसला जायचंय"
"असं नाही करता येत आम्हाला"
"उतरवताय त्याला कि मी उतरवू?"
किन्नर च बिचारा गरीब होता....खाली उतरला आणि मी ड्रायव्हर शेजारी बसून ऑफिसला आले.

घटना ३.

ऑफिसला आले तर information security ची टेस्ट द्या अशी मेल आली होती. join झाल्यापासून हि मेल मी पाचव्यांदा बघत होते...आणि टेस्ट देता येत नव्हती कारण मला log in च करता येत नव्हतं. दर वेळी "Emp No not found in database!!!" असं दिसायचं
आज एकूणच डोकं जरा सटकलं होतं. पूर्ण info. security group ला मेल केली....चांगली खरमरीत.
१५ मिनिटात एका मुलीचा फोन आला..... तिला पण चांगलं चेपलं.... सरते शेवटी तिने मला माझं log in create करून दिलं आणि मग टेस्ट दिली.

घटना ४.

रात्रीचे आठ वाजले होते. मी अजून ऑफिस मध्ये. ८.३० ला माझा client interview होता. हा client जरा जास्तच फाडतो असं ऐकलं होतं....धुकधुक होतीच.
interview सुरू झाला. सुरूवातीलाच
"tell me about your earlier projects"
वा!!! मज पामरासी आणि काय हवे? माझी गाडी अशी धाड्धाड सुटली कि बास......
अमुक तमुक करता करता ३२ मि. झाली आणि आमची मुलाखत संपली. ग्राहक काका खुष होते....त्यांनी लगेच मॅनेजर काकांना तसं कळवलं......मॅनेजर एकदम "मोगॅम्बो....खुष हुवा!!!" style मध्ये माझ्या डेस्कजवळ आला आणि उद्यापासून project वर आहेस म्हणाला. ग्राहकाने याआधी २ लोकांना नाकारल्यामुळे बेजार झाला होता बिचारा!!!
अधिक मासात एका ब्राह्मणाला खुष केल्याचं पुण्य पदराशी (साडी नव्हती..पण असं म्हणायची पद्धत असते..) बांधून मी घरी जायला निघाले.
उद्याचा दिवस म्हणजे ३० मे कसा असेल याचा विचार करत...........

Tuesday, May 22, 2007

सामान्य पोलीस

त्यादिवशी तारीख होती १४ एप्रिल..डॉ. आंबेडकर जयंती!!! माझा साप्ताहिक सुट्टीचा वार असल्याने काहि रेंगाळ्लेली कामं उरकायचं मी ठरवलं होतं. त्यातलंच एक म्हणजे digicam च्या service center मध्ये जाऊन माझा कॅमेरा परत घेऊन येणं. आता हे service center बाजीराव रोडला आहे...तिकदे आज जाऊ नये असले मौलिक विचार मला त्यादिवशी सुचले नाहित.
वेळ साधारण संध्याकाळी ६.३० ची असेल. मुख्य रस्त्यावर पार्किंग मिळेल न मिळेल म्हणून मी एका गल्लीत गाडी लावून बाजीरव रोड ला आले. पाहाते तर एक बरीच मोठी मिरवणूक....एका ट्रक्वर स्पीकरची भिंत, कुठलंस असंबद्ध गाणं....भारताचा नकाशा, डॉ. आंबेडकरांचा पुतळा, त्याला हार.......मिरवणूकित साधारण ३००-३५० लोक सामील...त्यातले पन्नास एक जण विचित्र अंगविक्षेप करत स्नायू मोकळे करत होते. दया आली मला......माझी, माझ्या देशाची. खुद्द डॉ. आंबेडकर जरी आज आले तरी त्यांना काहिसं असंच वाटेल. विचार आणि त्यानुसार आचार हा क्रम आणि शक्तीच आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर गमावून बसलो कि काय? मला रस्ता ओलांडायचा होता, पण मिरवणूकिमुळे थोडा वेळ थांबावं लागलं. त्या लोकांबरोबर असलेली ८-१० पोलीसांची फौज मात्र कधी नाचणाऱ्याला आत ढकल, कधी गाड्यांना रस्ता मोकळा करून दे, कधी माझ्यासारखीला "ताई, जरा थांबा" असं सांगणे आणि इतर बऱ्याच गोष्टी करत होते.
कमाल वाटली ती त्या ८-१० पोलीसांची..... त्यांच्यापैकी कोणीच उच्च अधिकारी नसावेत. म्हणजे ते सगळे हुकुमाचे ताबेदार होते. या अशा मिरवणूका पुण्याला नवीन नाहीत. या मिरवणूकांना कुठलंहि सामाजिक, राजकिय कारण पुरे!!! शिवाय दरवर्षी मॅरेथॉन, दोन पालख्या, गणपती हे तर वेगळंच.... कारण काहिहि असो, अशी काहि समाजसमूहाच्या गोष्टी म्हणजे या पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत असावा!!! गणपती.....मराठी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. एक दिवस तरी घरी राहून बाप्पाचा आशिर्वाद घ्यावासा सगळ्यांनाच वाटत असणार...अगदी नाहीच जमलं तर निदान अनंत चतुर्दशी ला तरी. पण पोलिसाला कसं शक्य आहे ते? मंजूर झालेली रजा जिथे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रद्द होऊ शकते तिथे नियोजीत वेळी रजा कुठून मिळणार??? घरच्यांचा रोष ओढवत असेल कि.... शिवाय मिरवणूक, मोर्चा म्हणलं कि ते संपेपर्यंत उभी ड्य़ुटी!!! जनतेला शक्य तितक्या सबुरीने आवरायचं...धिंगाणा करणाऱ्यांना सरळ करायचं. पालखी आली, विसर्जन मिरवणूकित गणपती आला कि सगळे लोक दर्शन घेऊन नमस्कार करायला पुढे धावतात....अशावेळी यातल्या किती पोलीसांना देवदर्शन, नमस्कार वगैरे त्याक्षणी शक्य होतं माहित नाही. आपण जरी बाप्पाला "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत असू तरी हे पोलीस कदाचित "लवकर निघा, सावकाश जा आणि वेळेत पोहोचा" असं काहिसं बाप्पाला सांगत असावेत. दिवसभर ढोल ताशाने बधिर झालेले कान, गर्दी रेटता रेटता घामेजलेलं शरीर......१०-१२ तास उभं राहून गेलेले पाय या अवस्थेत माणूस यापलिकडे अजून काय भक्ती करू शकतो?
इतर कोणीहि नोकरदार माणूस इतकि सामाजिक उपेक्षा सहन करत नसेल जितके हे पोलीस करतात. तुम्ही काम करा वा न करा.....टिका हि ठरलेली. अगदी कॉलेज जाणारी विशीची मुलं पण हे कसे चुकतात आणि त्यांच्यामुळे किती त्रास होतो यावर तावातावाने बोलतील. तुम्ही-मी कोण अशी उपेक्षा इतक्या दिर्घ काळ सहन करू शकेल? जनतेचा राग पण चुकिचा असतो असं माझं म्हणणं नाहिये...पण त्या सगळ्याला हे कनिष्ठ (हुद्द्द्यच्या उतरंडीनुसार) अधिकारी कितपत जबाबदार असतात??? ९५% वेळा यांना केवळ काम बजावले जाते....ते कुठल्या पद्धतीने करावे, कोणी करावे याबाबतीत यांना सहभागी करून घेतलंच जात नाही. आणि बहुतेक वेळा अंमलबजावणीपेक्षा मूळ निर्णयच चुकिचा असतो......पण ज्याचा पूर्ण रोष निर्णय अमलात आणणार्या कनिष्ठ वर्गावर काढला जातो. हे पोलीस म्हणजे काय 'पब्लिक ने ओलीस’ ठेवण्यासाठीच पोलीसखात्यात भरती होतात का?
आज कुठल्याहि क्षेत्रात महिला आणि पुरूष वर्गासाठी वेगळी स्वच्छतागृहे असतात... पोलीसखात्यात या गोष्टीसाठी मागणी करावी लागली होती. हे किती जणांना माहित आहे? ते आमच्या सेवेसाठी आहेत, पण आम्ही त्यांचा किती आदर..आदर जाऊ दे, त्यांना किती सहकार्य करतो??? पोलीसखातं म्हणजे एकदम महान, कार्यदक्ष आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहिये...पण उठसूठ त्यांच्याबद्दल अनास्था बाळगणं कितपत योग्य आहे?
एका देशासाठी सैनिकवर्ग जितका महत्त्वाचा आणि अभिमानाची बाब आहे तितकाच पोलीसवर्ग पण नाही का? खरंतर पोलीस हे शहर, गाव यांच्या वेशीतले सैनिकच ना!!! चित्रपटात पण सैनिकांवर गाणी आहे....पोलीस तिथेहि उपेक्षितच!!!
निर्णयक्षमता आणि अधिकार असणारे लोक हे खरे या खात्यातील बेजबाबदार लोक आहेत......शहर वाहतूक, कायदाव्यवस्था यासाठी ठळक नियोजन लागतं. तेच नसेल तर कनिष्ठ वर्गाला वेठीस धरून काय उपयोग? तुमचे IAS सारखे अधिकारीच अकार्यक्षम असतील तर मग सामान्य पोलीस...जो दिलेलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि करूनहि रोषाला सामोरा जातो...त्याच्यावर आगपाखड करणं बंद झालं पाहिजे.

Saturday, May 19, 2007

नवीन गडी...नवा राज

या ७ तारखेपासून पंचमोध्याय सुरू झाला...माझ्या एका मित्राच्या भाषेत मी नवीन थाळीत जेवायला लागले. (as per him...anywhere u go, its same food in a different plate!!!) नेहमीप्रमाणे join झाल्यावर इथल्या लोकांनी ते काय काय नि कसं करतात ते अगदी फुगवून फुगवून सांगितलं. खरं तर कुठेहि जा, कंपनीबद्दल पूर्णत: चांगलं ऐकायला मिळणारे दिवस म्हणजे हे induction चे दिवस!!! वेगवेगळे लोक येऊन काय काय बोलत होते... मी मात्र बॅंकेच्या लोकांची वाट बघत होते...हो, एकदा का salary account ओपन झालं कि काम भागलं. पहिल्या दिवशी दिलेला चहा आणि जेवण मात्र चांगलं होत. (खाल्ल्या अन्नाबद्दल मी नेहमीच खरं बोलते.)
अजून पहिला दिवस संपतो न संपतो तोच माझ्या इथल्या नवीन मॅनेजर चा फोन...कि उद्या येऊन भेट. मी मनात म्हणलं जरा श्वास तर घेऊन द्या...नंतर आहेच बैल राबायला!!! ठरल्याप्रमाणे त्याला भेटायला गेले तर हा माणूस माझ्यासाठी जेवायचा थांबला होता. बाप रे!!! हे मला जरा नवीन होतं. मग जरा अनौपचारिक गप्पा मारत आमचं जेवण झालं (आज मी डबा नेला होता....त्यामुळे quality n taste बद्दल काहि शंका नको!!!) माझ्या आजवरच्या सगळ्या मॅनेजरप्रमाणे हा पण non-smoker.... देवाची कृपा!!!
जेवण झाल्यावर टिम शी ओळख....एकूण लोक ४...सगळे तेलुगू :( म्हणजे मला कायम आंग्ल भाषेत च बोलावं लागणार (कोकाटे क्लास लावावा कि काय?) बरंय निदान मॅनेजर तरी मराठी आहे. मोजून मापून कोकणस्थ आहे!!!
पुढे दोनच दिवसात मला मशिन मिळालं, मॅनेजर काकाने स्वत:हून net connection दिलं...वा वा वा!!! कामाला (कि टिपीला???) सुरूवात झाली. प्रोजेक्ट तसा बरा आहे...अजून काम खेचणं आता माझ्याकडे लागलंय. बघू....काय घाई आहे?
तर मी बसते ती जागा pantry च्या अगदी जवळ आणि मॅनेजरच्या बरीच लांब आहे...त्यामुळे पामर सुखी हे सांगणे नकोच!!! आजूबाजूला पूर्ण आंध्रप्रदेश आहे....त्यांच्याबरोबर काम करता करता मी एक दिवस कदाचित तेलुगू ब्लॉग लिहायला लागेन...शक्य आहे, कालच नाही का त्यांच्या नादी लागून मी आंध्र मेसमध्ये जाऊन ३ वेळा भात खाल्ला!!
इथल्या काहि आवडलेल्या गोष्टी, ५०० र. मध्ये बससेवा!!! तेहि चांगल्या लक्झरी बस, रेडिऒ नीट ऐकू येईल अशा. (आधीच्या कंपनीच्या बस्मध्ये रेडिऒ कमी नि खरखर जास्त ऐकू यायची) लायब्ररीमध्ये non technical पुस्तकं, management चे पुस्तकं भरपूर आहेत. परवाच ’wise and other wise' आणलंय. yaahoo messenger इथे officially चालतो :)
ज्याचा तीव्र निषेध करावासा वाटतॊ ते म्हणजे icicidirect , मायबोलीवर बंदि आहे. हा काय अन्याय!!! icicidirect नाही तर मी चार पैशाचे २० पैसे कसे करायचे हो?? आणि मायबोली नाही तर मग आम्ही आमचं मन कुठे जाऊन हलकं करायचं??? श्या...अजून थोड्यादिवसाने आवाज उठवला पाहिजे या विरुद्ध!!! पण सध्या जरा शांत आहे मी....नवीन गडि आहे ना...जरा सरावले कि मी पण माझे अंतरंग दाखवायला सुरू करेन!!! :)

Thursday, May 10, 2007

स्वभाव

मनुष्यस्वभावाला औषध नाही म्हणतात ते अगदी खरंय. संस्कार, शिक्षण, आजूबाजूचा परिसर याने काहि चांगल्या सवयी माणूस लावून घेऊ शकतो आणि अशा सवयींमुळे स्वभावात थोडेफार बदलहि होतात. पण लक्षात कोण घेतो? माणसाच्या व्यक्तिमत्वातील हि अतिशय महत्वाची बाजूच अनेकदा दुर्लक्षित राहते असं माझं मत आहे. कित्येकदा स्वभावदोषाला खतपाणीच घातलं जातं.
त्यातहि स्वभावात काहि काहि लोक टोकाचे असतात...कोणी अति तापट, अतिशय सरळ, नको इतके स्पष्टवक्ते, साखरपेरणी करून स्वार्थ साधणारे..असे अनेक. कुठलीच व्यक्ती हि सगळ्यांशी समान कधीच वागत नाही असं मला वाटतं. आपण समोरच्याशी काय बोलतो, वागतो याचा समोरची व्यक्ती सोडून अनेक गोष्टींशी संबंध असतो...जसे तुम्हा दोघातले आधीचे नाते, चालू असलेला चर्चेचा विषय, त्या क्षणाचे तुमची मानसिकता, समोरच्या व्यक्तीचे वय वगैरे वगैरे. म्हणूनच तर "तू माझी अमुक-तमुक आहेस म्हणून ठीक नाहीतर दाखवलं असतं", "आधीच माझा मूड नाहीये त्यात अजून तुझं परत नको", "आजोबा, वयाकडे बघून सोडून देतोय" अशी वाक्ये आजवर कित्येकदा ऐकली असतील. आपण स्वत:हि कित्तीतरी वेळा विचित्रपणे बोलत असतो किंवा समोरच्याच्या बोलण्याचा सोयीस्कर अर्थ काढत असतो. अगदी त्या व्यक्तीला आगाउ, नाटकी, शिष्ठ वगैरे लेबलं लावून मोकळे होतो.
आपलं रूप, बुद्धी जशी निसर्गदत्त आहे तसंच स्वभावाबाबतीत म्हणावं लागेल. पण मूळच्या स्वभावाला थोडं वेगळं वळण देता येतं ते संस्काराने, शिक्षणाने.... आता हे वळण म्हणजे नक्कि काय? तर आपल्या स्वभावातील जो dominating गुण आहे त्याला काबूत ठेवायला शिकणे. तापट माणसाने ऊठ्सूट आरडाऒरडा केला तर कोण त्याच्याशी मैत्री करायला धजेल? नको इतके सरळ असाल तर दुनिया तुम्हाला हातोहात विकेल...तुमच्या दरवेळी अति स्पष्ट्वक्तेपणामुळे किती लोक निष्कारण दुखावले जात असतील देव जाणे. स्वत:च्या स्वभावाचे असे टोकाचे कंगोरे लक्षात घेऊन काहि सकारात्मक कृती केली, प्रयत्न केला तर खरं शहाणपण. गुण आणि अवगुण यात एक धूसर रेषा असते....ती धूसर असली तरी त्याची खूणगाठ मनाशी पक्कि कराल तर बरंच जग, लोक तुमच्या जवळ येईल. कारण स्वभाव नि लोकसंग्रह हे सरळ प्रमाणात असतात. आपला स्वभाव सगळ्यात जास्त फायदा किंवा नुकसान आपलं स्वत:च करत असतो. जितके चांगले संस्कार होतील, चांगले वातावरण असेल, चांगले वाचन होईल तितक्या लवकर हि गोष्ट माणूस आत्मसात करू शकतो.
रूप निसर्गदत्त असलं तरी आपण अधिक चांगले दिसायचे प्रयत्न करतोच कि...मग हेच स्वभावाच्या बाबतीथि करून पाहूया. "मी अशीच आहे", "मला बदलणं शक्य नाही" हि वाक्य निष्कारण आत्मघातकि ठरायला नकोत..... शेवटी परिपक्वता म्हणजे काय? ती स्वभावाची एक अशी अवस्था आहे जिथे तुमचा स्वभाव सगळ्यांना आपलंस करू शकतो, समजून घेऊ शकतो. rational behaviour हे अनेकदा प्रयत्नपूर्वक मिळवलेलं असतं. कुठलीहि गोष्ट प्रयत्नानेच मिळते.... चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम स्वभाव असावा लागतो...आणि त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतील.

Friday, May 04, 2007

माधुरी दिक्षित


हे नाव आपल्या कोणालाहि अनोळखी नसेल... हिचं नाव ’माधुरी’ ठेवावं असं ज्या/जिला कोणी वाटलं तो खरंच मस्त माणूस असणार. नावाप्रमाणेच मधुर चेहरा आणि हास्य असणारी हि माधुरी दिक्षित!!!
चारचौघींसारखी मराठी कुटुंबात वाढलेली हि मुलगी.... निसर्गदत्त सौंदर्य घेऊन जन्माला आली आणि दिवसेंदिवस ते सौंदर्य खुलतच गेलं. प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजध्यक्ष एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते "अबोध नंतर माधुरी माझ्याकडे portfolio करता आली. नवीन चेहरा असल्याने मी तिला मेक-अप साठी लवकर यायला सांगितलं होतं. ठरलेल्या वेळेला ती आली. तिला बघितल्यावरच मला जाणवलं कि या जातिवंत सुंदरीला जास्त मेक-अप ची गरज नाही. ओठांचा शेपहि इतका perfect कि नुसतं lipstick लावा कि काम झालं" आणि खरंच असावं ते.... एक ’साजन’ पिक्चर सोडला तर इतर सगळ्यामध्ये मला ती आवडली आहे. (साजन मध्ये खूप pimples आहेत तिला....आणि माठ cameraman ने closeup घेऊन घेऊन ते सगळ्यांना बघण्याची शिक्षा केली.)
वयाच्या सोळाव्या वर्षी माधुरीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.... घरून थोडासा विरोध पत्करूनच!!! पहिला सिनेमा आला नि गेला.... मग अधिक गंभीरतेने विचार करून तिने photo session केले. कस्तुरी च ती...फोटो बघून दिग्दर्शक विचार न करतील तरच आश्चर्य!!! अबोध नंतर २ वर्षांनी ’तेजाब’ आला. बस्स!!! माधुरी रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर होती. ’एक-दोन-तीन’ या गाण्यावर नाचणारी माधुरी, ’सो गया ये जहॉं’ मध्ये अनिल कपूर कडे भांबावून बघणारी माधुरी!!! स्टेप कट, काळे टपोरे डोळे, सरळ नाक...छोटी जिवणी...एकूणच त्यावेळच्या दाक्षिणात्य चेहऱ्यांना आणि उत्तर भारतीय बाहुल्यांना कंटाळ्लेल्या लोकांना माधुरी आवडली. सरोज खान तर आजहि तिचे मनापासून कौतुक करते. ’एक-दोन-तीन’ या गाण्यासाठी माधुरीने प्रचंड मेहनत घेतली होती. जवळ जवळ आठ दिवस रोज ती या नाचाची practise करायची. There are no short cuts to serene and complete success हे किती आधीच माहित होतं तिला!!!
तेजाब हि केवळ सुरूवात होती. त्यानंतर राम-लखन, दिल पासून DTPH, देवदास हा प्रवास थक्क करणारा आहे. १९८७ पासून १०-१२ वर्ष माधुरी bollywood मध्ये चमकत राहिली. नजर खिळवून ठेवणारं सौंदर्य, ताकदीचा अभिनय...आपण ज्या वेगाने चालूहि शकणार नाही त्या वेगाने नाचणारी माधुरी... पुढे जाऊन तर लोकांनी तिला ’लेडी अमिताभ’ म्हट्ले. तिचे एकूण चित्रपट पाहता खूप कमी चित्रपट खऱ्या अर्थाने flop झाले.... तिच्या नावावर सिनेमा चालत असे. आणि हे सगळं यश माधुरीच्या गुणांवर तिने मिळवलं होतं.... कुठलीहि अनावश्यक तडजोड, थिल्लरपणा न करता. १०-१२ वर्ष चंदेरी जीवन जगताना एकाहि वादात, वादळात हि अडकली नाही वा कुठल्या एकाबरोबर हिचं नाव केवळ gossip च्या पुढे जाऊन जोडलं गेलं नाही. (हे खूप अवघड आहे...आजूबाजूला इतके सुंदर, श्रीमंत...तुमची स्तुती करणारे लोक असताना त्या नात्यातील व्यावसायिकता ओळ्खून स्वत:ला सावरून पुढे नेणं...आणि हे सगळं वयाच्या विशीत!!! सोपं नाही ते. एक हिंदी सिनेमा ’दीवाना’ हिट झाला नि दिव्या भारतीने साजिद नाडियादवाला शी लग्न केले. वय फक्त १८. या सगळ्याची परिणीती पुढे कशात झाली ते जगजाहिर आहे.)
माधुरीच्या सिनेमांचं वैशिठ्य म्हणजे गाणी आणि तिची नृत्य-अदा!!! ’एक-दोन-तीन’ , ’बडा दुख दिया तेरे लखन ने’, ’धक धक करने लगा’, ’हमको आजकल है इंतजार’, ’है के सेरा सेर....हमे प्यार का है आसरा चाहे जो हो’, ’माई नी माई मुंडेर पे तेरे’..... किती गाणी!!! आणि त्यातली माधुरी..... facial expressions कोणी हिच्याकडून शिकाव्यात. डोळे, ओठ यांच्या सुबक हालचालीतून इतकं व्यक्त करायची माधुरी कि बास!!! ते सगळं बघताना मी (एक मुलगी असून) घायाळ होते तर मुलं वेडी न होतील तरच आश्चर्य!!!
प्रत्येक गोष्ट, जी वर जाते, तिला खाली यावंच लागतं. हा निसर्गनियम आहे. माधुरीची कारकिर्द त्याला अपवाद नाही. पण हे माधुरीला माहितच असावं. (or she was prepared for it) नवऱ्याबद्दलच्या कल्पना, अपेक्षा यावर पण ती जणू ठाम होती. लग्न करायचं ठरल्यावर रितसर भेटून, बोलून आपला हात तिने श्रीराम नेने च्या हातात दिला. तिच्यासारखाच तिचा नवरा...देखणा नि कर्तत्ववान!!! लग्नानंतर ५-६ वर्ष केवळ नवरा, मुल नि घर.... आता मुलं जरा मोठी झाली. And even Madhuri is back in shape after 2 deliveries.... आता ती परत येतेय!!! पण कधी, कुठल्या रोल मध्ये...अजून तरी माहित नाही...पण तिचे पुनरागमनहि तितकेच यशस्वी ठरो... उघड्या-बोडक्या, अश्लील नाच करणाऱ्या आजकालच्या मुलींपेक्शा माधुरीने परत आपली जादू चालवावी. Madhuri..this true fan of yours...is just waiting for your come back. Come back soon and with equal grace as before!!!

Wednesday, April 18, 2007

पुढचे पाऊल...

उद्या माझा या कंपनीतला शेवटचा दिवस.... पूर्ण दिवस कदाचित formalities पूर्ण करण्यातच जाईल. कदाचित जाता जाता सहकारी काहि भावुक बोलतील, काहि चांगलं बोलतील... नेहमीप्रमाणे ६ वाजले कि मी घरी जायला निघेन. पण ते सध्यासाठी शेवटचं असेल.... निदान पुढचे २-३ वर्षतरी मी दुसरीकडे कुठे असेन.
HR वाले एक टिपिकल exit interview घेतील. का, कुठे, कधी, कसं या त्यांच्या ठरलेल्या प्रश्नांना मी पण ठरलेलीच उत्तरे देईन.... सवय झालीये का मला आता याची?? सगळंच रूटिन वाटू लागलंय. १० वी च्या send off ला रडायचं नाही असं ठरवूनही वर्गात गेल्यावर भावना अनावर झालेली मी आणि आजची मी, पहिल्या वहिल्या नोकरीमध्ये office boy (जो माझ्याहून कमीतकमी १०-१२ वर्षाने मोठा होता) अहो जाहो म्हणवून घेताना अवघडणारी मी आणि आताची मी.....बदललेय नक्किच!!! काळानुसार सगळ्याची सवय होत गेली कि वयाप्रमाणे घराबाहेरच्या जगाबद्दल भावना बोथट होत गेल्या?
या कंपनीने मला बरंच काहि दिलंय... खूप गोष्टी शिकले. And I have due respect for all that....
मुख्य म्हणजे या कंपनीने मी शोधत असलेलं brand name मला दिलं. आत आल्यापासून दुसऱ्या आठवड्यापासून ते आजतागायत मला सतत प्रोजेक्ट(billable) वर ठेवलं. इथले बरेच लोक ६-८ महिने बेंचवर असताना मी खरंच नशीबवान आहे. माझ्या मॅनेजरने एक प्रोजेक्ट in process कसा ठेवायचा ते शिकवलं. (ज्याचा मला KT ला अतिशय फायदा झाला. ) याच मॅनेजरशी पुढे माझे इतके खटके उडाले कि जाता जाता त्याने people manager कसा नसावा हे शिकवले. (no one likes too pushy manager)
प्रचंड मोठा, देखणा कॅंपस, ४-५ हजार लोक या सगळ्यात सुदैवाने मला कधीच हरवल्यासारखं झालं नाही. याचं एक मुख्य कारण माझे सहकारी असावेत. १५-१६ जणांची माझी टिम जबरदस्त आहे.... त्यांना सोडून जाताना खरंच वाईट वाटतंय.... गेल्या २० महिन्यात आमची ३-४ मोठी टिम आऊटिंग्ज झाली. जाम धमाल केली प्रत्येक वेळी आम्ही. पहिल्या दिवशी मोजक्या २-३ लोकांना ओळ्खत होते नि आता सहज बाहेर पडलं कि ट्रेनीपासून delivery head, location head अशी अनेक लोकं हाय करतात.
खूपच well defined processes, professional attitude towards implementation of it हे एक ठळक वैशिष्ठ्य आहे इथलं... अगदी आजहि मी final settlement बाबत मेल केली तर व्यवस्थित उत्तर मिळालं.
माझ्या resource manager शी जेव्हा मी resignation बद्दल बोलले तेव्हा त्याचा पहिला प्रश्न "why?"
"मनासारखं काम नाही....भविष्यात पण मिळेल असं सध्या दिसत नाही. आणि काम नसेल तर growth कशी होईल?"
"u will not always get what u want when u expect it. Sometime u need to wait and watch"
"गेले सहा महिने मी तेच करतेय. release द्या म्हणून ओरडतेय. but all went in vain. And now I dont have time to wait and watch...as I am planning to retire by 40-42..."
तो मस्त हसला....
मग रितसर एक एक टप्पा करत करत आजचा दिवस आला.... आता काम तसं काहिच नाहिये. गेला आठवडाभर breakfast ४० मिनिटे, लंच १ तास...परत संध्याकाळी कॅंटीन अर्धा तास असं चालू आहे. उद्या संध्याकाळी हा करियरमधला चतुर्थ अध्याय संपेल...नि पंचम सुरू होण्यापूर्वी २ आठवडे मी "सुशिक्षित बेकार" असेन. माणसाला जी गोष्ट आधी मिळालेली नसते ती अचानक भरपूर मिळाल्यावर त्याचा गोंधळ उडतो... तसंच आता या २ आठवडे सुट्टीचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे मला :)
पंचम अध्याय आधीच्या सगळ्यापेक्षा जास्त फलदायी असावा.... मी १००% दिलं तर मोबदला म्हणून मला त्यांनी ११०% द्यावं. शेवटी देण्या-घेण्यानेच तर संबंध दृढ होतात ना!!!

Monday, April 16, 2007

पाऊस

ऊन्हाळा सुरू झाला.... बघता बघता पारा ४० अंशापर्यंत गेला.... संध्याकाळी घरी जातानापण रस्त्यावरच्या गरम वाफा नको वाटतात. मग असंच एका रविवारी आभाळ दाटून येतं...उकाडा जास्तच जाणवू लागतो. अचानक जोराचं वारं वाहू लागतं...वाटतं, आता हे ढग पळून जाणार. शिशिर ऋतुमुळे घराच्या मागच्या औदुंबराची पाने गळायलाच आलेली....अशातच या वाऱ्याने ती एकदम गळू लागली. वा!!! एखाद्या सिनेमात बघावं तसं दिसतंय अगदी.....वारा जरा कमी होतॊ...एक थेंब, दोन, तीन...पाऊस पडायला लागला. ऊन्हाने तापलेल्या मातीवर पाणी, त्या मातीचा तो सुवास...खॊल श्वास घेऊन मी तो मनात साठवते. अजून रस्ता ओला झाला नाही इतक्यात दिवे जातात... मी हातातलं पुस्तक (पानिपत) बंद करून खिडकीतून पाऊस बघत बसते.... पाण्याचे ते टपोरे थेंब, आमच्या बागेतली सगळी झाडे स्वच्छ धुवून निघतात. पावसाचा जोर कमी होतो.. कोकिळा ऒरडतेय. पाऊस थांबला...अरे वा!!! दिवे पण आले. मी वर्ल्ड कपची मॅच बघायला लागते. आता मला कोण जिंकतंय/ हारतंय याने काहिच फरक पडत नाही.... बाकि काहि बघण्यासारखं नाही म्हणून खरं तर मी मॅच लावली आहे.
आज परत सोमवार....नवीन आठवडा चालू....आणि हो, चालू कंपनीमधला शेवटचा आठवडा!!! या आठवड्यात काम तसं काहिच नाही (आधी होतं असंहि नाही :))... दिवसभर टंगळमंगळ करते.... बाहेर काय चालू आहे हे मला माझ्या क्युबिकल मध्ये बसून काहिच कळत नाही. सहा वाजले..... मी घरी जायला उठते.... अरे....आजपण पाऊस!!! बरं झालं, आज लखनवी नाहि घातला. उगाच खराब झाला असता. शी!!! किती बोर विचार करतेय मी धुंद पावसात. सगळी लॉन एकदम टवटवीत दिसतेय... रोजचाच हा कॅंपस पावसात मस्तच दिसतो.... पाठीमागे वळून एकदा तो २५ एकर परिसर पाण्यात न्हाताना बघते. युन्हिवर्सिटी नंतर मला फक्त याच कॅंपसने मोहिनी घातली. आणि हि मोहिनी पावसात जास्तच गहिरी होते.
एखाद्या यंत्राप्रमाणे मी बसमध्ये जाऊन बसते. वा!!! आज खिडकीची जागा :) उपरवाला कुछ तो मेहेरबान है गरीब पे। mp3 player काढला....या वातावरणात मला अजून वेडं करणारं गाणं चालू आहे...
"तू हि मेरी शब है, सुबह है...तू हि मेरी लम्हा
तू हि मेरा रब है खुदा है...तू हि मेरी दुनिया"

माझ्या आयुष्यात कधी येणार असा माणूस? असा पाऊस असावा.... काहिहि न ठरवता त्याने मला ऑफिसमध्ये पिक-अप करायला यावं... कार नको, बाईक च!!! रिमझिम पावसाचे थेंब मला भिजवताहेत....पण त्याहून जास्त मी त्याच्या मनकवड्या प्रेमाने भिजतेय. पावसाचा जोर वाढतो...तसं आम्ही जवळच्या भजी-चहा च्या गाडिजवळ थांबतो.... मस्त वाफाळता चहा!!! इतक्यात कोणी त्याच्या ओळखीचं दिसतं....मस्त जोरात शिट्टी मारून तो त्या मित्राला हात करतो. (हो, त्याला खणखणीत शिट्टी वाजवता यायलाच हवी) पाऊस जवळ जवळ थांबला....गार वारा सुटलाय. त्याबरोबर उडणारे माझे केस मी बांधयला बघते...."राहू दे गं....असेच छान दिसतात"
बाईकला किक मारून आम्ही पुढे जायला निघतो.

कित्येक पावसाळे कोरडे गेले नि कित्येक जाणार आहेत माहित नाही..... दर वर्षी बाहेर पडणारा पाऊस मला आतल्याआत अजून अजून कोरडा करत जातो. काहितरी नसल्याची तीव्र जाणिव करून देत पाऊस पडत राहतो..... एकाजागी शांत बसून मी तो नुसता बघत असते.... कदाचित असा एकटिने अनुभवायचा हा शेवटचा पाऊस असा विचार करत, पुढच्या वेळी माझ्या शेजारी बसून पाऊस बघायला तो असेल. त्याचं जवळ असणंच मला धुंद करणारं असेल..... पावसाच्या एका एका थेंबातून प्रेमाचा कणनकण विरघळत जाईल.

Thursday, April 12, 2007

नावात बरंच काहि आहे..

"नावात काय आहे?" हे शेक्सपियरचं एक अतिप्रसिद्धी लाभलेलं वाक्य... पण हे नेहमीच सगळीकडे लागू होऊ शकेल का?
विचार करूया -
 • दूध डेअरी चे नाव "पाणचट" असे आहे.
 • बेकरी ने ब्रेड चे नाव "पुराना" असे ठेवले.
 • भाजी मंडई चे नाव "पालापाचोळा" आहे.
 • एका मोठ्या हॉस्पिटल चे नाव "यमसदन" असे आहे.
 • गिफ्ट शॉप चे नाव "घेऊन टाका" असे आहे.
 • तुम्ही ज्या भागात राहता त्या भागाचे नाव "कटकट नगर" आहे.
 • एखाद्या सुंदर टुमदार बंगल्याचे नाव "काळापैसा" आहे.
 • रसवंतीगृहाचे नाव "अपेय पान" आहे
 • बॅंकेचे नाव "अफरातफर" आहे.
 • रेल्वे चे नाव "बर्निंग ट्रेन" आहे.
 • गॅरेज चे नाव "डब्बा गाडी" आहे.
 • गाण्याच्या क्लास चे नाव "भसाडा गायन शाळा" आहे.

तर "नावात काय आहे?" याचा मतितार्थ खरं तर जाती धर्मात काय आहे असा अपेक्षित असावा शेक्सपियर ला. म्हणजे मी स्नेहल नसून सुझी असते तरी फारसा काहि फरक पडत नाही. माणसाची वृत्ती, स्वभाव महत्त्वाचा!!!

पण इतरवेळा, माणसाव्यतिरिक्त सगळीकडे नाव महत्त्वाचंच असतं ना....कारण इतर गोष्टींना आपण विशिष्ठ कार्य नेमून दिलं आहे. बॅंक, रेल्वे, बस, डेअरी.... काहिहि म्हणलं तरी आपल्यासमोर त्याची एक प्रतिमा असते.... माणसाच्याबाबतीत नुसत्या नावावरून काहि ठोक प्रतिमा तयार करता येत नाही....करू नये. तरीपण एखाद्याचे नाव हिटलर, फुलनदेवी असेल तर मनात शंकेची पाल चुकचुकेलच ना!!! मग "नावात काय आहे?" या म्हणण्यात किती तथ्य आहे? म्हणूनच मला वाटतं कि नावात बरंच काहि आहे. :) तुम्हाला काय वाटतं?

Thursday, April 05, 2007

ऑर्कुट आणि Testimonial

आज बऱ्याच दिवसांनी ऑर्कुटवर मनसोक्त टाईमपास करायला मिळाला. (असतो एकेक दिवस चांगला न काय:)) सगळे स्क्रॅप्स बघून रीप्लाय करून झाले.... नेहमीप्रमाणे न बघता मेल्स डिलीट केल्या.... नेहमीच्या कम्युनिटीज बघून झाल्या..... तरी पण वेळ होताच...म्हणून मग काहि लोकांना स्वत:हून स्क्रॅप करून hi, hello करायला सुरूवात केली.
बरेच जुने लोक मला या ऑर्कुट मुळे भेटले..शाळा (अगदी प्राथमिकचे लोक पण), कॉलेज, ऑफिस १, ऑफिस २, ऑफिस ३, ऑफिस ४, मायबोली....असे कितीतरी जण. कोण कुठे, काय करतात.... वगैरे बरंच इथेच कळलं. बऱ्याच बातम्या लोक परत इथे भेटल्यामुळे समजल्या. परत अरे माझा हा मित्र त्या "आऊच्या काऊ" (अभिजीत कडून हा शब्द उधार घेतलाय) ला पण ओळखतो असले शोधदेखील इथेच लागले. मित्र-मैत्रिणींचे फोटो, त्यांच्या नवरा-बायको, पोरंटोरं इ. चे फोटो.... (हे म्हणजे अगदी टिपिकल असतात...गळ्यात हात घातलेले नवरा बायको, घोडा, खेळण्यातली स्कूटर वरचं मूल वगैरे वगैरे) हे तर आहेच.
ऑर्कुटमुळे हे सगळं तर परत नव्याने कळ्लच....पण जरा हट्के वाटलं ते इथलं testimonial प्रकार. म्हणजे हे ऑर्कुटवालेच तुम्हाला सांगणार "Have a great friend? Write a testimonial and let people know!"..मग आम्ही विचार करणार कि कोण बाबा असा great friend?? आणि त्याबद्दल जगाला सांगणारे आम्ही असे कोण great? बरं पण ते जाऊ दे.... मी काहि काहि लोकांच्या होमे पेज वर अक्षरश: ७-८ testimonials पाहिले आहेत. मस्त मस्त लिहिलेलं असतं पब्लिकने.... माझ्याच ओळखीच्या माणसांबद्द्ल काहि नवीन कळतं. ते वाचताना मला इतकं बरं वाटतं तर प्रत्यक्ष ज्याच्या बद्दल लिहिलंय तो बहुतेक २ क्षण हवेत तरंगूनच खाली येत असेल. इथले पंखा (fan) प्रकार पण तसाच!!! लोकांना १७-१८ पंखे आहेत...वा!!! आम्हाला celebrities ना पंखे असतात हेच माहित... असाच चुकून एकदा मला माझा पंखा दिसला.... दचकून बघितलं कि कोण बाबा... तर तो निघाला माझा ex-colleague. आता करीयरच्या सुरूवातीला केली असेल चुकून मी काहि मदत त्याला...पण तेव्हढ्याने हा पंखा झाला असेल हे माहित नव्ह्तं.
माझा कॉलेज मधला प्रोजेक्ट पार्टनर एकदा मला म्हणाला माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता testimonial लिहून दे. म्हणलं आत्ता काय? सुचत नाही काहिच... तर म्हणे नाही..जे सुचेल, वाटेल ते लिही. असं असेल तर काय!!! लिहिलं ७-८ ओळी आणि केलं submit. तर ते वाचून हा पठ्ठ्या म्हणतो.."हे काय असं? चांगलं लिही कि काहितरी." आता हा म्हणजे कळस होता...एकतर मनात येईल ते लिहा..वर परत चांगलं??? आता नसेल माझ्या मनात त्याच्या बद्दल त्यावेळी चांगलं आलं तर काय करणार? (तसंहि आम्ही एकमेकांना कॉलेज पासून शिव्याच घालतो) तर हे असं आहे. testimonial हे ९०% चांगलं सांगणारे नि १०% इतर सांगणारे असावेत बहुतेक.... हो, आता बहुतेकच... मला कुठे अनुभव या testimonial प्रकाराचा??? सांगायला हे खंडीभर मित्र-मैत्रीणी आहेत.... याहू वर शे-दोनशे, ऑर्कुटवर शेकडा+... पण एकाला माझ्याबद्दल काय लिहावं कळत नसावं किंवा आवर्जून सांगावं असं म्या पामरात काहि नसावं. इतरांचे testimonials वाचूनच एखादा उसासा सोडायचा आणि कधी कोणी चार शब्द आपल्याबद्द्ल लिहिल चांगलं अशी आशा ठेवून ऑर्कुटमधून लॉगऑफ करायचं.