Tuesday, December 02, 2008

१०वी अ आणि सरमिसळ वही

कायापालट झालेल्या घरात अजूनही सामान पूर्ण लावून झालेच नाही.... नक्की काय ठेवायचं, काय देऊन टाकायचं नि काय टाकूनच द्यायचं यावर आमच्या सगळ्यांची डोकी चालूच आहेत आणि माझे-आईचे, माझे-दादा चे वाद पण! :)
नवीन सगळंच एकदम झकास झालेलं असलं तरी, जुन्याची आठवण आहेच. त्या जुन्या जागांचे, सामानाचे संदर्भ आठ्वून मग मन हळवंहि होतंच.
असंच काही आवरताना आख्खी दोन पोती पुस्तकं (अभ्यासाची!!!!) आणि काही शाळा-कॉलेज(सुवर्णकाळ..) मधल्या वह्या सापडल्या... पुस्तकांमध्ये अर्थातच कॉलेजची जास्त होती. अगदी cobol, data structures पासून servlets, ASP.NET पर्यंत सगळं, शिवाय मोठ्या दादाचे mechanical चे TOM, SOM इ. ठोकळे आहेतच. परत त्यातही आमची विभागणी चालूच...काय ठेवायचं किंवा कोणा होतकरूला द्यायचं, काय रद्दीत घालायचं आणि काय जाळून टाकायचं. तसं बघितलं तर सगळंच जवळपास कमीतकमी १० वर्षापूर्वीचं...पण जीव अगदी काल घेतलेल्या वस्तूप्रमाणे त्यावर जडलेला आणि अडकलेला.... मग सगळं आवरता आवरता एका खोलीत मी आणि चारही बाजूने आम्हा भावंडांचा तो शाळा-कॉलेज चा सुवर्णकाळ असं झालं. ३-४ तास तरी ते तसंच असणार...
अशातच सापडलेली माझी १० वी मधली शाळेची एक वही... माझी १० वी!!! कित्ती वर्ष झाली??? पण २ वर्षापूर्वी शाळेत जात होते कि काय इतक्या अजून आठवणी ताज्या आहेत. सकाळी ८:३० ते ११ क्लास, मग १२ ते ५:३० शाळा... आत्ताच्या मानाने तसं कमी व्यस्त वेळापत्रक...पण तेव्हा किती "बिझी" आहोत असं वाटायचं :) बरं एवढं सगळं करताना अभ्यास वगैरे जेमतेमच. १० वी चं वर्ष असूनही biology च्या journalमधल्या frog vissera टाईप अवघड आकृत्या गौतमी कडूनच काढून घेतलेल्या... आणि तेव्हाच ठरवलं की भविष्यात आपण biology घेऊन काहीही दिवे लावू शकत नाही! कदाचि गौतमी नसती तर माझे ते journal १० मार्कहि गेलेच असते :)
क्लास नि शाळा असं सगळं मिळून माझं दप्तर टम्म फुगायचं! मग मी आणि स्वाती (वर्गात शेजारी बसायची) ने डोकंच लढवलं. शाळेतल्या तासांची निम्मी पुस्तकं तिने आणायची आणि निम्मी मी :) वह्या पण मी बिन पुठ्ठ्याच्या कव्हर च्या आणल्या होत्या...त्यातलीच एक २०० पानी वही परवा सामान आवरताना सापडली. मस्त पंचरंगी पोपटाचं चित्र असलेली...(पुढे result मध्ये व्हायचा तो आमचा पोपट झालाच!!!)
पहिल्या पानावर छान (?) अक्षरात नाव, तुकडी वगैरे... मग phyiscs चा अभ्यास... जेमतेम ३०-४० पानं भरलेली. म्हणजे वही दिवाळी नंतर काढली असणार आणि जेमतेम १-१.५ महिना वापरली असणार. मग पुढे घरी अभ्यास(??) वगैरे करताना काहीबाही लिहिलेलं...मराठी वाक्प्रचार वगैरे.... परत बरीच पानं कोरी! काहीतरी आठवून मी वही एकदम मागच्या पानापासून बघायला सुरूवात केली. काय असेल शेवटच्या पानावर :) हसू येतं आता... मागून biology चा अभ्यास (कि आभास!!!). किती नावडतं होतं biology कि वहीतही मी त्याला मागून सुरूवात केली होती. मग एक-एक पान करत मागे-मागे बघत चालले. phyiscs ची निदान ३०-४० पानं तरी होती, इथे biology चं सगळं १५-२० पानातच उरकलं होतं. So much I hated this subject!!!! मग १-२ ठिकाणी जाने-फेब्रु मधलं अभ्यासाच (त्यापेक्षा कधी झोपायचं याचंच जास्त) वेळापत्रक... मग काही संस्कृतची सुभाषितं, त्यांचे अर्थ. क्वचित ठिकाणी chemistry च्या reactions देखील!!! गणित हा स्वतंत्र आवडता प्रांत असल्याने या वहीत त्याचे घुसखोरी झाली नसावी! मग कधीतरी परिक्षा झाल्यावर मी आणि दादाने टेप करून आणायच्या गाण्यांची केलेली यादी. त्याचा आवडता किशोर आणि मी सगळी त्या वेळ्ची नवीन गाणी यादीत घेतलेली.... cassette च्या एका साईड ला ९ गाणी बसताता या हिशोबाने त्याने त्याची १८ आणि मी माझी १८ गाणी निवडून टिपून ठेवलेली. आई ग!!! काय धमाल होते दिवस!
रिझल्ट लागल्यावर बरंच काही रद्दीत गेलं असणार... मग कॉलेज सुरू झाल्यावर पण शाळेतले हे दिवस थोडे विसरल्यासारखेच झाले असणार. पण ही वही कशी कोण जाणे माझ्याच कप्प्यात राहिली..आणि आज आवरता आवरता माझ्या मनाचे किती कप्पे सताड उघडून गेली?? :)