Tuesday, April 21, 2009

झोपी गेलेला...........

"काय करणार weekend ला?" मी काल एका मित्राला विचारलं
"काही नाही गं. झोपणार आहे :)" तो तसा प्रामाणिक च!
"हम्म, बरोबर आहे. office ची सवय अशी घरी मोडवत नसेल."
"अगदी अगदी.... घरी ८ तास, बस मधले २ तास आणि office मधले ४-५ तास..इतकी झोप हवीच ना. शिवाय IT मध्ये सध्या recession मुळे किती ते tension. त्यामुळे तर झोपेची गरज वाढलीच आहे. लोकांची tension मुळे भूक वाढते ना, तशी माझी झोप वाढलीये बघ :)"

लहानपणा पासून एकमेकांना खेचण्याची कला आम्ही अगदी मनापासून जोपासली आहे. आणि आमचा ग्रुप म्हणजे अगदी कुंभकर्णाचे वंशज. तो निदान ६ महिने तरी जागा असायचा (म्हणे)..पण आम्ही तर अगदी निद्रादेवीचे प्रामाणिक भक्त! तिला कधी नाही म्हणायचं नाही.."आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे आमचे नि तिचे संवाद.

लहान असताना एक नरक चतुर्दशी सोडली तर मी कधी घड्याळात सकाळचे ५ बघितले नव्हते. ट्रिप वगैरे असेल तरी जास्तीत जास्त उशिरा ऊठायचं नी पटापट आवरायचं, हे ठरलेलं. आणि देव तारी त्याला कोण मारी? पूर्ण शालेय जीवनात माझी फ़क्त ३ च वर्ष सकाळची शाळा होती. प्राथमिक पर्यंत तर मी ९:३० पर्यंत वगैरे झोपायचे...आईने मग ब्रश, आंघोळीचं पाणी सगळं तयार ठेवून मला उठवायचं, दणादण आवरून मी शाळेत परत वेळेत हजर! एकदा ऊठलं कि गाडी जोरात, पण एकदा झोपलं कि मग ज्याचं नाव ते.

"झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते, तुमची आमची ती मुळीच सेम नसते" :) तुम्ही घरी झोपलेले आहात आणि बाहेर गेलेले आई बाबा दार वाजवून थकले...इतके कि त्यांनी घरावर दगड फेकून मारावे असं झालंय? बरं, आता त्या दगडाचा आवाज ऐकून झोपेतून बळंच ऊठून दाराऐवजी बाल्कनीचं दार उघडलं असं कधी झालंय?? झोपेचा वारसा आमचा वडिलोपार्जित आहे... माझी आजी झोपाळू. तिला त्या वेळच्या जीवनपद्धतीनुसार बरंच काम करावं लागायचं, पण ती झोप वगैरे कायम तब्येतीत काढायची. मग आमचे बाबा... कोयनेचा भूकंप पुण्यात बराच जाणवला... बाबा त्यावेळी घरात झोपले होते...आणि शेजार्यांनी येऊन ऊठवे पर्यंत बाबांना काहीही पत्ता नव्हता.माझी आत्येबहीण जे.जे ला MBBS करत होती... रात्री जागून परत पहाटे उठून अभ्यास. मग असंच एकदा २ ल झोपून परत ४:३० चा गजर लावून झोपली. २.३० तास पटकन गेले...आणि गजर झाला. इतकी साखरझोप या घड्याळाने मोडली...झालं...झोपेतच ते उचलून तिने खिडकी बाहेर फेकून दिलं. hostel चा watchman वेडाच व्हायचा बाकी राहिला असणार :) तिचाच अजून एक किस्सा.. मुंबई हून रत्नागिरीची गाडी...गाडी पहाटे रत्नागिरीला पोचली, हिने सवयीप्रमाणे ताणून दिली होती. कंडक्टर ने उठवलं..
"ताई, रत्नागिरी आलं"
"५ च मिनिटं झोपू दे" ही अजून झोपेतच :)
परत ५ मिनिटानी "ताई, ऊठा आता... गाडी आत मध्ये लावायची आहे."
"५ मिनिटं झोपू दे ना पण!!!"
"मग झोपा आणि चला परत मुंबईला"
मग एकदम खाडकन उठली. आता तीच ताई सलग ३२-३४ तास काम करते. पण आमचा कोणाचाच प्रश्न जागाण्याचा नाहीच आहे. एकदा झोपलो कि मग मात्र ऊठवणे हा एक project आहे!

माझा दादा :) बाबा त्याला रोज सकाळी ऊठवायचे..संस्कृतचं पाठांतर कर म्हणून... बाबा ६ ला ऊठवायला लागायचे, दादा दर वेळी ५-५ मिनिट्म करून ३०-४० मिनिटं झोपून घ्यायचा. एकदा तर "बाबा, ५ च मिनिटं.. स्वप्न पडतंय" असं म्हणाला होता. बाबांना हसावं कि रागवावं कळ्लं नसणार त्यावेळी. हाच दादा अगदी पेपरला जाताना पण १० मिनिटं झोप काढूनच जायचा..वर तसं केलं तर पेपर बरा जातो हे logic! आईच्या सहनशक्तीचा अगदी अंत पाहिला आमच्या झोपेने. मी तर अजूनही २ मिनिटं आहेत असं बघूनहि परत झोपू शकते. झोपायला (अति) जास्त मिळावं म्हणून मी बाकिचं भराभर आवरायला शिकले...म्हणजे उठले सगळं आवरून मी ३०-३५ मिनिटात बाहेर पडू शकते..आणि याचा onsite ला फ़ार फ़यदा झाला :)

कॉलेग मध्ये चष्मा असलेल्या लोकांचं बरं असं वाटायचं. टयुबचा प्रकाश पडला कि डोळे बंद काय उघडे काय काही कळत नाही. असंच एकाला सरांनी खडू मारून दचकवलं होतं. कंपनीच्या बस मध्ये लोक जबरी मस्त झोपतात.. विप्रो मधला एक almost पडायचा बाकी राहिला होता. मी एकदा बस मध्ये ताणून दिल्याने २-३ stop पुढे उतरले आहे. मग झोप आली कि आता मोबाईल वर गजर लावूनच झोपते. परत earphone, vibrator सगळं चालू ठेवायचं! आत्ताच्या ऑफिस मध्ये एक tester कोपर्यातल्या cubicle मध्ये झोपायचा.. मला जाम हेवा वाटायचा त्याचा. पण मग पुढे त्याच्या manager ने त्याला एकदम highway cubicle मध्येच बसवला. त्यानंतर त्याचं वजन २ महिन्यात ४ किलो ने कमी झालं असं आम्ही त्याला चिडवतो :)

कित्ती प्रयत्न केला तरी मला अजून सकाळी लवकर ऊठायची सवय लागलेली नाही. आई कडून सगळ्यात जास्त मी या बाबतीत रागावून घेतलं असेल... हल्ली तिला रात्री झोप उशीरा लागते म्हणून मग सकाळी जाग येत नाही, तर मी ऊठल्यावर का ऊठवलं नाही म्हणून परत माझ्याच वर चिडते. :) पण मला झोपायला आवडतं त्यामुळे असं छान झोपणार्याला मी सहसा ऊठवत पण नाही. झोप म्हणजे सुख असतं... ते जग तुमचं असतं...तुम्ही वाटेल ती स्वप्न त्या जगात बघू शकता. सुदैवाने झोप उडावी असं भयंकर भीतीदायक किंवा तरल आल्हाददायक दोन्ही कधी फारसं कधी झालं नाहीये... म्हणजे भयंकर भीतीदायक कोणाच्याच बाबतीत नको म्हणा...आणि ठराविक तरल आल्हाददायक चालेल... म्हणजे झोप नाही तर निदान साखरझोप तरी मिळते. :)

अन्न हे पूर्ण्ब्रह्म आहे खरंच... पण अन्नाची चोरी करता येते. झोप पण अन्नाइतकीच गरजेची आहे माणसाला...पण ती चोरता येत नाही. ज्याच्या नशिबात जितकी तितकीच त्याला ती प्रसन्न होणार. आज मी चार तासच झोपणार म्हणलं की ७-८ तास झोप लागते. आणि आज जास्त झोपू म्हणलं की २ तासात जाग येते. आपल्याकडे इतके देव आहेत आणि त्याची आपण अगदी व्यवस्थित पूजा करतो...मग कोणी "निद्रा"देवी ची पूजा का नाही करत? म्हणजे या घरातल्या लोकांना शांत झोप मिळू दे..त्यांना जास्तीत जास्त स्वप्न बघता यावीत असं का कोणी त्या देवीकडे साकडं घालत?

चला...खूप च लिहिलं...झोप आली :) तसही हे पोस्ट मी ३ दिवस लिहिते आहे...लिहायला घेतलं की निद्रादेवी यायच्या, मग आमचं तत्व "आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे :))

देवीची कृपा अशीच सगळ्यांवर राहो....

॥ श्री निद्रादेवी प्रसन्न॥