Monday, September 22, 2008

पडदा

१३ वर्षापूर्वीचं घर... त्यावेळी घरात ५ माणसं असायची...आज त्याची ९ (२ बच्चे) झाली! ९ पैकी ३ आता जरा अंतरावर वेगळीकडे राह्तात... पण आठवड्यातून ४ वेळा तरी या जुन्या घराच्या ओढीने इकडे येतातच. या घरी राहायला आलो तेव्हा माझं भविष्य अजून काय आकार घेणार ते पण माहित नव्हतं. आणि मधल्या दादाला निदान त्याचा किरण दिसत होता; मोठ्या दादाचं त्या मानाने बरंच स्पष्ट होतं. बाबांनी अवघ्या आयुष्याची कमाई या घरात घातलेली... आमच्या आधीच्या घरातलं सामान घेऊन या घरात प्रवेश केला होता.
नवीन घरी लग्गेच सगळं नवीन घेणं शक्य नव्हतं.... पण पडदे तर हवेच होते. आधीच्या घरी आम्ही दार च फक्त रात्री झोपताना लावायचो तिथे पडदे कशाला? तिथे माणसं मनाचे आणि घराचे दरवाजे उघडे ठेवून च फ़िरत. तर मग नवीन घरी आल्याआल्या त्याच आठवड्यात आई-बाबा पदद्याचं कापड आणायला गेले होते. आधीचं घर आकाराने लहान, त्यात पडद्याची आवश्यकताच नाही अशी साधी राहणी. आई ने कपाटाला, एका खिडकीला वगैरे पडदे शिवले होते पण ते आपली तिची घर सजवायची आणि शिवणकाम करायची हौस म्हणून. पडदा पाहिजेच असा आमचा कोणाचाच आग्रह नसायचा. मी तर घरात कमी नि बाहेर जास्त असला प्रकार... :) मग माझ्या लहानपणी आईच कधीकधी मैत्रिणींबरोबर जाऊन पडद्याचं कापड आणत असे...कसा शिवायचा वगैरे चा मनात बेत करत असे. आम्हा भावंडांना पडदा म्हणजे येताजाता लोंबायला, हात पुसयला, खेळता-खेळता लपायला इतकाच तो त्याचा उपयोग माहित होता. पडदयाला याहून जास्त महत्त्व त्यावेळी आमच्या कोणाच्याच आयुष्यात नव्हतं.
मग नवीन घरी कोणी एक माणूस येऊन खिडक्यांची मापं घेऊन गेला.... त्यावरून खर्चाचा अंदाज दिला. अबब!!! २१ मीटर कापड लागणार होतं. माझ्या कल्पनेपलिकडचंच होतं... पडदे शिवून आले... ते लावायला खास बार, कडेला शो च्या मुठी वगैरे पण आले....काहीतरी झाकायला लागणारा पडदा स्वत:च इतका सजला कि क्या बात है!! नवीन घर बघायला येणारे लोक पण "पडदे छान आहेत हो" असं म्हणू लागले. या सगळ्या प्रकारामुळे मी पण कोणाकडे गेले कि त्या घरातले पडदे लक्ष देऊन बघू लागले. हळूहळू मग कळत गेलं कि पडदा हा गृहसजावटी मधला महत्त्वाचा भाग आहे. त्यात निरनिराळ्या प्रकाराचे कापड असते, शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याच्या रंगसंगतीमुळेहि घराच्या शोभेत बराच फ़रक पडतो वगैरे मौलिक भर पडत गेली. पण तरी पडदा हे प्रामुख्याने आई चे आणि नंतर आई-वहिन्यांचे क्षेत्र राहिले... मी नवीन/ धुतलेले पडदे लावणे आणि कसे आहेत यावर प्रतिक्रिया देणे या व्यतिरिक्त जास्त कधी काही केलं नाही.
आता आमच्या याच १३ वर्षापूर्वीच्या घराचा काहिसा कायापालट करायचा आम्ही घाट घातला... अगदी रितसर interior वाल्याला काम देऊन वगैरे. या रविवारी पडद्याचं कापड बघायला जायचं ठरलं... कधी नव्हे ते मी पण येते म्हणाले... आई ला नेमकं बरं वाटत नसल्याने ती येऊ शकली नाही. लक्ष्मी रोड वरच्या काही दुकानात गेलो. काय सुरेख व्हरायटी असते... अगदी त्या रंगीत दुनियेत गुंडाळल्यासारखं वाटलं. साडीच्या दुकानात साडी ड्रेप करून दाखवतात तसा इकडे पडदाहि ड्रेप करून दाखवतात!! परत दुकानात निरनिराळे samples होतेच display ला. पडदा, तो बांधायला शोभेचं अजून काही.. पडद्यात पण sheer वगैरे प्रकार. हे sheer म्हणजे एक पारदर्शक, झुळझुळीत कापड. मनात आलं असला पडदा काय कामाचा? हेच भाव कदाचित चेहर्यावर उमटले तसा interior वाला म्हणाला "फार सुंदर दिसतं हे", कि लागलीच दुकानदार ते ड्रेप करून दाखवू लागला. इतकंच काय त्या दुकानवाल्याने चहा/कॉफी घेणार का इतपत विचारलं. पडदे खरेदी बरीच सुखदायक असते कि! :) २-३ दुकानातले samples घेऊन परत निघालो.
१३ वर्षापूर्वीच्या संपूर्ण घराच्या पडद्याची किंमत आता एका पडद्याला जेमतेम पुरत होती. आणि इतकं करून लहानपणी मी ज्याला मनासारखं हात पुसायचे, लपायचे तसलं काहीही करू शकणार नव्हते :( वाटलं...स्नेहल नुसतं घर बदललं, त्याचे पडदे बदलले असं का आहे? आधीच्या घरातून इकडे येताना तू पण किती बदललीस? तिकडे सहज कोणाच्याहि घरात शिरणारी, कुठेहि भटकणारी, सगळ्या जनतेला "मुतालिकांची मुलगी" म्हणून माहित असलेली ..नवीन घरात किती कोशातली झाली? वय हे एक कारण असेल... पाचव्या वर्षी जशी मैत्री होते तितकी सहज ती १८ व्या वर्षी नाहीच होऊ शकत! म्हणजे मनाने पण नवीन पडदे च घेतले तर... पण मग पडदे घर सजवतात, काही न दाखवाव्या अशा गोष्टी पडद्यामागे लपतात...माझं तसं च आहे?? कि मनाचे हे पड्दे कसे आहेच याचा मी कधी विचारच नाही केला? ते माझी शोभा वाढवताहेत कि माझी शोभा करताहेत? कधी विचारच नाही केला.... या पडद्यांमुळेच कदाचित मला बरंच चांगलं काही दिसलं नाही, त्यामुळे मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्नच केला नाही. नवीन आलेल्या त्या sheer सारख्या पारदर्शक पडद्यासारखा एखादा तरी sheer माझ्या मनात आहे? आणि त्यातून मी जगाला आणि जग मला अस स्वच्छ बघू शकत आहोत का? कोण जाणे. कायापालट झालेल्या घरातल्या नवीन पडद्याबरोबर मी पण जरा मनाचे हे पडदे बदलून बघेन... निदान प्रयत्न तर नक्कीच करेन.

Thursday, September 04, 2008

बाप्पा... हसू कि रडू?

बाप्पा...दरवर्षीप्रमाणे ठरल्या वेळेला तुम्ही आलात. फ़ार आनंद वाटला... आज-कालच्या दिवसात दिलेला शब्द आणि ठरलेली वेळ पाळणारे फ़ार थोडे. या पार्श्वभूमीवर नित्यनियमाने एक तुम्ही येता.. तुमसे बढकर कौन? इथे देशात काहीच वेळेवर होईना झालंय.
कॉलेजचा प्रवेश असो, घराचं बांधकाम असो, पाऊस असो कि निवडणूका असोत. सगळ्याचीच वेळ बदलली आहे. ऑगस्ट मध्ये कॉलेज सुरू कि लगेच ऑक्टोबर मध्ये submissions! अधला-मधला वेळ असाच welcome party वगैरे मध्ये गेलेला.... पाऊस पण जून मध्ये दडी मारतो नि आता बघताच आहात कि तुम्ही यायची वेळ झाली तरी कसा बिनदिक्कत बदाबदा कोसळतोय. लोक तर निवडणूक या प्रकाराला इतके सरावले आहेत कि जणू शाळेतल्या वर्गात सेक्रेटरी निवडावा. :( सगळं आबादी आबाद आहे बाप्पा!
आंबेडकरांनी सांगितलं होतं कि सवलतींवर जगू नका, आज इथे सवलतीशिवाय कोणी जगायला नको म्हणतोय. माणसांच्या शरीराची जाडी वाढतेय नि मनं संकुचित होत चालली आहेत. शिक्षणाने लोक उदात्त कमी झाले नि कोते जास्त. पंचविशीतला मुलं सरळ सांगतात कि "माझं आई-बाबांशी पटत नाही", अरे पण हा विचार करायला याला समर्थ कोणी केला? लहानपणी जास्त त्रास देतो म्हणून तुला सोडलं का आई-बाबांनी??
सगळं जीवनच व्यस्त झालंय... पैसे जास्त-वेळ कमी, घर मोठं-माणसं कमी, शरीर मोठं-कपडे कमी, देखावा जास्त-आपलेपणा कमी, झोप जास्त-स्वप्न कमी, नेते जास्त-आदर्श कमी, चोरी जास्त-निर्मिती कमी! चेहरा खराब झाला तर निरनिराळे लेप लावून स्वच्छ करतात..पण आमच्या मनावरच्या जळमटांचं काय? बाप्पा... मनासाठी एखादं parlour काढता येईल का? वयात येणार्या मुला-मुलींना आहार नियमांबरोबर विचार नियम किती जण समजावून देत असतील?
आजच वर्तमानपत्रात तुमचं अगदी वाजत-गाजत स्वागत झाल्याची सचित्र बातमी वाचली.... पण जरा शेजारी नजर जाते तर अमेरिकेने अणुकरारात केलेली दिशाभूल दिसली. विद्यमान सरकारने स्वत:ची तोंड लपवण्यासाठी केलेला विश्वासघात दिसला. एका आडरानात दरोडेखोरांनी महिलांवर केलेला अत्यचार दिसला. "एक लाखात कार" प्रकल्पाच्या अजून नवीन बातम्या वाचल्या. बिहार मधील लोकांचे हाल दिसले... विदर्भात पाणी नाही म्हणून माणूस मरतोय आणि बिहार मध्ये पाणी आलं म्हणून माणूस मरतोय! पाणी म्हणजे जीवन ना रे... मग जीवन सुद्धा अति झालं कि त्रासच होतोय!
तू म्हणशील काय आज वर्षानी आलो तर मला काही माहित नसल्यासारखं सगळं सांगते आहेस. तुलाच सगळं माहित आहे रे... तूच कर्ता आणि करविता! पण सगळंच इतकं दाहक नको ना करूस. माणूस चुकला...चुकतो आहे. पण तू त्याला योग्य त्या मार्गावर लवकरात लवकर आण.
आता म्हणशील इतकं काही वाईत नाहीये ....ते पण खरंच आहे. वर सांगितलेल्या सगळ्या परिस्थीतीतच प्रकाश-मंदा आमटे आहेत, अभिनव बिंद्रा आहे, भारतीय त्रिदल सेना आहे. पण महाभारताप्रमाणेच सुष्ट आणि दुष्ट हे व्यस्त प्रमाणात आहेत. मान्य आहे रे हे सगळं आमच्यामुळेच... पण तू आला आहेस तोवर मन मोकळं करून घेतलं. दहा दिवसात तू बघशीलच सगळं.... मग पुढच्या वर्षी येताना हे कमी करण्याच्या योजना घेऊनच ये. यंदा जाता जाता शक्य तितक्या लोकांना सुष्ट व्हायच्या मार्गावर नेऊन सोड. आणि पुढच्या वर्षी मला "बाप्पा... हसू कि रडू?" असं लिहावंसं न वाटता "बाप्पा... हसूच हसू" असं वाटायला पाहिजे.

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

गणपती बाप्पा मोरया!!!

Monday, September 01, 2008

बालीश बोल

परवा रविवारी दुपारी चार च्या सुमारास अचानक अंधारून आलं नि ४:३० च्या सुमारास एकदम धो-धो पाऊस पडायला लागला. गणपती बाप्पाचे आगमन अगदी २ दिवसावर आले असल्याने अनेक लोकांप्रमाणे आम्हालाही गणपतीच्या आरासीचं सामान आणायचं होतं. पण पाऊस काही थांबायचं नाव काढेना.... माझा भाचा (वय- सौव्वा ३ वर्ष) सारखा विचारत होता कि कधी जायचं बाप्पाचं सामान आणायला.... शेवटी अगदी वैतागून त्याने आबांना (आजोबा) विचारलं

"ए आबा, पाऊस का रे पडतो??"
"अरे, पाऊस हवा आहे सगळ्यांना"
"पण का??"
"पाऊस नसेल तर पिक.... (इथे आबांच्या लक्षात आलं कि नातवाला पिक वगैरे झेपणार नाही) आपण कपडे कसे धुणार??"
"पण कपडे का धुवायचे?"
"ते खराब होतात, मळतात ना! मग धुवावे लागतात...आपण धुतो कि नाही रोज"
"अले(अरे), पण मग त्यासाठी पाऊस कशाला? आपल्या मशिन (वॉशिंग) ला पाणी आहे कि..."

हे ऐकून आबा आणि मी खो खो हसत होतो...