Saturday, May 15, 2010

थोडं ट्रॅफिक ...थोडा विचार

नेहमीप्रमाणे अगदी शेवट्पर्यंत ई-मेल्स करत करत ऑफिसचा दिवस संपला आणि मी गाडी काढून असंख्य माणसांपैकी एक होऊन सवयीप्रमाणे रस्त्यातून वाट(??) काढू लागले. घड्याळ बघितलं... ७:४०! आज जरा उशीर च झाला.... रोज ठरवते ७ ला निघायचं पण आज देखील जमलं नाही. निघता निघता काही तरी आठवतं आणि मग ते काम उरकता उरकता वेळ होतोच.
(इतक्यात सिग्नल हिरवा झाला अन माझं वेडात मराठी नार (घेऊनी कार) दौडली एक झालं)
डोक्यात अजून ऑफिस घोळतच होतं... नवीन "select" केलेला माणूस लवकर आला पाहीजे. client ने काम नक्की पकक केलं पाहिजे. घरी आई चे पाय दुखायचे थांबले असतील का? नाहीतर आता डॉक्टर कडे जाऊन आलं पाहीजे. काही व्याप नसताना माझी इतकी धावपळ आणि दमछाक होतेय, ज्यांना मुलं वगैरे आहेत त्या कसं manage करत असतील. आपलं वजन पण वाढतंय बहुतेक... "पुरानी जीन्स" घालून बघैतली पाहिजे. आणि सकाळी लवकत उठून काही व्यायाम केला पाहिजे.
असे एक ना अनेक विचारांमागून विचार आणि सिग्नल मागून सिग्नल मी मागे टाकत होते. आणि अचानक मनात आलं कि आपण विचार करतो म्हणजे तरी नक्कि काय? कालच एक जण सांगत होता कि रात्री नीट झोप लागली नाही, डोक्यात काही विचार चालू होते. हे विचार चालू असणं म्हणजे तरी काय?
काहीतरी घडतं आपल्या सभोवती, काही ऐकतो-बघतो आपण. त्या सगळ्याचा आपल्या आकलन शक्ती प्रमाणे एक अर्थ लावतो. बहुतेक वेळा अर्थ नीट उमगत नाही किंवा मनाला पटत नाही आणि त्यामुळे मग झालेल्या, ऐकलेल्या-बघितलेल्या घटनेमुळे काही प्रश्न पडतात, हे प्रश्न आपणच आपल्या मनाला घालतो आणि मग त्याची उत्तरं शोधतो. काही शक्यता-अशक्यता पडताळून बघतो. यालाच आपण विचार करणं म्हणतो?? हो बहुतेक :)
म्हणजे घटना - प्रश्न - उत्तर / शक्यता-अशक्यता हि प्रक्रिया म्हणजे विचार करणे आहे तर... आणि या प्रक्रियेअंती जो निष्कर्ष मन काढतं तो होतो आपण केलेला विचार, कधी सुचलेला विचार असंही म्हणतो आपण!
म्हणजे असं आहे - आत्ता मला overtake करून गेलेला माणूस आज रात्री काय जेवेल याचा काहीही विचार नाही. का?? तर मला तो प्रश्न च पडत नाही :) पण मी काय जेवेन?? याचा काही तरी विचार आहे, कारण मला तो प्रश्न (बर्याचदा) पडला... (हाहाहा)
वा!!! असा काहीतरी विचार मनात आला कि भन्नाट वाटतंय एकदम... अरे हो! पण हा विचार तरी का आला? कारण मला प्रश्न पडला की माणूस विचार करतो म्हणजे नक्कि काय करतो? :)
गंमत आहे ना!!! बघाच..थोडा विचार करून :)