Tuesday, July 29, 2008

Corporate दुखवटा

नवीन(??) आर्थिक वर्ष चालू होऊन आता ते जुनं व्हायची वेळ आली.... मार्च मध्ये सुरू झालेली appraisal cycle मे पहिल्या आठवड्यात उरकली गेली. त्यात मिळालेलं rating बघून २५% लोक आधीच नाराज होते...उरलेले काही माझ्यासारखे आशावादी अजूनही उरला सुरला उत्साह टिकवून होते. दरम्यान Infy, CTS, Capgemini, IBM वगैरे बड्या कंपन्यांमध्ये पगारवाढ जाहीर होत होती. $ घसरण्याच्या निमित्ताला सगळ्या कंपन्या टेकलेल्या होत्या, management, HR सगळी लोकं आपापली गाजरं अगदी होलसेल भावात विकायला बसली होती.... Onsite चे कमीतकमी chances, बढती नाही वगैरे वगैरे नेहमीच आहे..यंदा भर पडली ती एक अंकी पगारवाढीची!
शेअर मार्केटने पण अशी काही मान टाकली कि नकोच ते चढ-उतार track करणं, तो portfolio बघणं असं वाटू लागलं. पेट्रोल महाग झालं, पर्यायाने सगळ्याच वस्तू महाग झाल्या. Inflation 11% च्या वर गेलं. याच सगळ्या गोंधळात मध्ये मी एका investment plans ची माहिती देणार्या माणसावर पण चिडले :)
मे मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील ही आमच्या सारख्या लोकांची साधी आशा आमच्या कंपनीने अगदी धुळीला मिळवली. मग नुसत्या अफ़वा....लोक वाट्टेल ते बोलत होते. बस मध्ये, canteen मध्ये सगळीकडे आडून आडून याच गोष्टीची चर्चा! कंपनी अधिकृतरित्या काही सांगत नव्हती आणि लोक इकडे हवालदिल झाले होते.करता करता शेवटी जून च्या शेवटी एक e-mail आली ज्यात आम्हाला जुलै मध्ये पगारवाढीची पत्रं मिळतील असं म्हणलं होतं.... चला! परिस्थिती अगदीच वाईट नव्हती तर!!!
जुलै सुरू झाला. काहीतरी जबरदस्त suspense असावा अशा थाटात कंपनीने अगदी २८ ला सकाळी ई-पत्रं पाठवली. सगळा फ़ुगा फुटला होता. इकडे पण बहुतांश लोकांना एक अंकी पगारवाढ आहे. Inflation 11% आणि पगारवाढ एक अंकी! बहुत नाइन्साफी है! salary restructure करून उगाचंच एक खोटं मानसिक समाधान दिलंय. कालपासून बरेच लोक नाराजी व्यक्त करत आहेत. बाहेर पडायचं कि अजून एक वर्ष इथे काढायचं अशा चर्चा आता रंगत आहेत. पण एकूण चित्र दुखवट्याचं आहे. इतर सगळ्या दुखवट्याप्रमाणे हा पण १०-१२ दिवसावर काही टिकत नाही. लोक सरावतात.... न सरावून पर्याय नसतो.
तुम्ही अनुभवला असेलच असाच एखादा Corporate दुखवटा!

Friday, July 18, 2008

तूच खरा गुरू!!!

मला आठवतं तेव्हापासून...म्हणजे जवळ जवळ गेले २५ एक वर्ष तो माझ्यासोबत आहे. अगदी पहिलं कधी भेटलो वगैरे आता आठवत नाही, पण खात्री आहे भेटला तेव्हापासूनच मला तो माझा वाटला असणार आणि त्याने पण मी कायम तुझ्यासोबत असेन असं हसून म्हणलं असणार :) म्हणजे अगदी लहान होते तेव्हा काय केलं कि आई-बाबा माझं ऐकतात, पाहुणे आले कि कसं वागायचं हे पण यानेच शिकवलं.
मग मोठी झाले... शाळेत जाऊ लागले. आई-बाबांच्या चिमुकल्या गोड विश्वातून एकदम ३०-४० मुलं, आई सारख्याच दिसणार्या बाई इतक्या त्यावेळी अफ़ाट, भन्नाट वाटणार्या जगात वावरू लागले. बाईंना कशी वागणारी मुलं आवडतात, मी काय केलं तर मला शाबासकी मिळेल हे सगळं मला यानेच शिकवलं. बाई शाळेत सांगायच्या ती गाणी, गोष्टी, अ आ इ ई च्या पलिकडचं असं काहीतरी तो मला नेहमी सांगायचा. आणि सगळ्यात मला आवडायचं म्हणजे घर, शाळा, खेळ सगळीकडे माझ्यासोबत! सगळे म्हणायचे आई-बाबांना किती मोठी आणि शहाणी झालीये स्नेहल... मी पण मस्त भाव खाऊन घ्यायचे!

सायकल शिकताना तर जाम मजा आली. मला वाटलं होतं कि मला काय सहज जमेल सायकल...त्याचाच बहुतेक त्याला जरा राग आला आणि मी सायकल शिकणार म्हणलं कि हा लांब जाऊन बसायचा. करता करता २ वर्ष गेली...सायकल चालवता यायची काहि चिन्ह दिसेनात :( मग त्यालाच माझी दया आली....हळूच माझ्या कानात येऊन म्हणाला, गधडे, आधी हाफ़ पेडलिंग कर, handle कडे बघू नकोस समोर बघ. मला रडूच यायचं बाकि होतं. तसा म्हणाला, रडतेस काय? मी आहे ना! आलोय ना आता. चला मग... आणि खरंच मला ४-५ दिवसात बर्यापैकी सायकल चालवता येऊ लागली :)

अभ्यास कसा करायचा, शिकलेलं ल़क्षात कसं ठेवायचं वगैरे शिकवायची याची खास पद्धत! आई-बाबा, शिक्षक यांचं ऐकायचंच ही याची शिस्त. तसं नाही केलं कि मग मात्र शिक्षेला तयार रहावं लागायचं. पण ऐकलं कि मग दुनिया मुठ्ठी में! असंच शिकत, गद्रे बाईंच ऐकत गाणं शिकले आणि ज्यादिवशी संपूर्ण शाळेत गाण्यात पहिला नंबर आला तेव्हा काय आनंद झाला होता! आणि माझा गुरू छान हसत होता माझ्या त्या आनंदाने फुललेल्या चेहर्याकडे बघून :)

college चं तर जग च गुलाबी! आपण मोठे झालो ही भावना, निरनिराळी प्रलोभनं...त्यामुळे काहिसं माझं गोंधळून जाणं. पण हा मस्त होता... याचं ठरलेलं काहि गोष्टी करून बघच; कारण मगच मी तुला नीट शिकवू शकेन. गाडी No Parking दिसलं तरी एकदा लावून बघ, अभ्यासातलं काहि ठरवून option ला टाकून बघ, घरी न सांगता सिनेमा बघ...सर्दी झाली तरी परत भिज, आई शी एकदा खोटं बोलून बघ, कामवाल्या बाईच्या मुलीला गणित शिकव, स्वत:चा कप्पा नीट आवरून बघ, आई घरी नसताना पोळ्या कर ...खूप काहि गोष्टी करायची मुभा देतो तो, अजूनही!!! जमलं तर ठीक आहे नाहीतर मग सरळ याचं म्हणणं ऐकायचं.

मैत्रीत तर किती शिकवलं याने मला... मित्र-मैत्रिण कसे निवडायचे, किती विश्वास ठेवायचा, कोणाशी कसं वागायचा....मैत्रीची सीमा काय ओळखायला शिकवलं!
परिक्षेत मार्क्स मिळाले म्हणजे मी नोकरी मिळवायला लायक आहेच असं नाही हे तर खूप कठोरपणे शिकवलं..पैसे मिळवायचे तर संघर्ष, कष्ट करायला शिकवलं. आता नोकरी करायला लागूनच ८ वर्ष होतील... किती बदलले मी या काळात! किती काय काय शिकले त्याच्याकडून! दरवेळी मिळणारी शाबासकीची थाप, होणारं कौतुक यात याचा किती मोठा वाटा असतो! एखादी चूक परत केली कि मिळणारी शिक्षा पण भयंकर असते.

नेहमी वेगवेगळ्या रूपात त्याचं मला भेटणं, एखाद्या खर्या मित्राप्रमाणे मला काहि गोष्टी करायला प्रोत्साहन देणं, चुकले तर कधी आई सारखं समजावणं, कधी रागावणं... मी कशीहि वागले तरी आजतागायत त्याने माझी सोबत सोडली नाही. मी मोठी काय कशीहि झाले असते, पण आज जे काही चांगलं वागू शकते त्यात माझ्यावर झालेले संस्कार आणि या गुरूचा च वाटा आहे.

असा हा गुरू..."अनुभव" त्याचं नाव! त्याने मला जे दिलंय ते अवर्णीय आहे. खरं तर अमोल ऋण आहे त्याचं ते. आणि ते ऋण वाढतच राहिल याची मला खात्री आहे. अशा या माझ्या आजन्म गुरूला आज "गुरूपौर्णिमे"च्या दिवशी शतश: प्रणाम!!! पुढच्या आयुष्यात माझ्यासोबत असाच सतत राहा आणि माझं जीवन समृद्ध कर. तुझ्यासारखा गुरू या जगात दुसरा नाहीच!!!!