मला आठवतं तेव्हापासून...म्हणजे जवळ जवळ गेले २५ एक वर्ष तो माझ्यासोबत आहे. अगदी पहिलं कधी भेटलो वगैरे आता आठवत नाही, पण खात्री आहे भेटला तेव्हापासूनच मला तो माझा वाटला असणार आणि त्याने पण मी कायम तुझ्यासोबत असेन असं हसून म्हणलं असणार :) म्हणजे अगदी लहान होते तेव्हा काय केलं कि आई-बाबा माझं ऐकतात, पाहुणे आले कि कसं वागायचं हे पण यानेच शिकवलं.
मग मोठी झाले... शाळेत जाऊ लागले. आई-बाबांच्या चिमुकल्या गोड विश्वातून एकदम ३०-४० मुलं, आई सारख्याच दिसणार्या बाई इतक्या त्यावेळी अफ़ाट, भन्नाट वाटणार्या जगात वावरू लागले. बाईंना कशी वागणारी मुलं आवडतात, मी काय केलं तर मला शाबासकी मिळेल हे सगळं मला यानेच शिकवलं. बाई शाळेत सांगायच्या ती गाणी, गोष्टी, अ आ इ ई च्या पलिकडचं असं काहीतरी तो मला नेहमी सांगायचा. आणि सगळ्यात मला आवडायचं म्हणजे घर, शाळा, खेळ सगळीकडे माझ्यासोबत! सगळे म्हणायचे आई-बाबांना किती मोठी आणि शहाणी झालीये स्नेहल... मी पण मस्त भाव खाऊन घ्यायचे!
सायकल शिकताना तर जाम मजा आली. मला वाटलं होतं कि मला काय सहज जमेल सायकल...त्याचाच बहुतेक त्याला जरा राग आला आणि मी सायकल शिकणार म्हणलं कि हा लांब जाऊन बसायचा. करता करता २ वर्ष गेली...सायकल चालवता यायची काहि चिन्ह दिसेनात :( मग त्यालाच माझी दया आली....हळूच माझ्या कानात येऊन म्हणाला, गधडे, आधी हाफ़ पेडलिंग कर, handle कडे बघू नकोस समोर बघ. मला रडूच यायचं बाकि होतं. तसा म्हणाला, रडतेस काय? मी आहे ना! आलोय ना आता. चला मग... आणि खरंच मला ४-५ दिवसात बर्यापैकी सायकल चालवता येऊ लागली :)
अभ्यास कसा करायचा, शिकलेलं ल़क्षात कसं ठेवायचं वगैरे शिकवायची याची खास पद्धत! आई-बाबा, शिक्षक यांचं ऐकायचंच ही याची शिस्त. तसं नाही केलं कि मग मात्र शिक्षेला तयार रहावं लागायचं. पण ऐकलं कि मग दुनिया मुठ्ठी में! असंच शिकत, गद्रे बाईंच ऐकत गाणं शिकले आणि ज्यादिवशी संपूर्ण शाळेत गाण्यात पहिला नंबर आला तेव्हा काय आनंद झाला होता! आणि माझा गुरू छान हसत होता माझ्या त्या आनंदाने फुललेल्या चेहर्याकडे बघून :)
college चं तर जग च गुलाबी! आपण मोठे झालो ही भावना, निरनिराळी प्रलोभनं...त्यामुळे काहिसं माझं गोंधळून जाणं. पण हा मस्त होता... याचं ठरलेलं काहि गोष्टी करून बघच; कारण मगच मी तुला नीट शिकवू शकेन. गाडी No Parking दिसलं तरी एकदा लावून बघ, अभ्यासातलं काहि ठरवून option ला टाकून बघ, घरी न सांगता सिनेमा बघ...सर्दी झाली तरी परत भिज, आई शी एकदा खोटं बोलून बघ, कामवाल्या बाईच्या मुलीला गणित शिकव, स्वत:चा कप्पा नीट आवरून बघ, आई घरी नसताना पोळ्या कर ...खूप काहि गोष्टी करायची मुभा देतो तो, अजूनही!!! जमलं तर ठीक आहे नाहीतर मग सरळ याचं म्हणणं ऐकायचं.
मैत्रीत तर किती शिकवलं याने मला... मित्र-मैत्रिण कसे निवडायचे, किती विश्वास ठेवायचा, कोणाशी कसं वागायचा....मैत्रीची सीमा काय ओळखायला शिकवलं!
परिक्षेत मार्क्स मिळाले म्हणजे मी नोकरी मिळवायला लायक आहेच असं नाही हे तर खूप कठोरपणे शिकवलं..पैसे मिळवायचे तर संघर्ष, कष्ट करायला शिकवलं. आता नोकरी करायला लागूनच ८ वर्ष होतील... किती बदलले मी या काळात! किती काय काय शिकले त्याच्याकडून! दरवेळी मिळणारी शाबासकीची थाप, होणारं कौतुक यात याचा किती मोठा वाटा असतो! एखादी चूक परत केली कि मिळणारी शिक्षा पण भयंकर असते.
नेहमी वेगवेगळ्या रूपात त्याचं मला भेटणं, एखाद्या खर्या मित्राप्रमाणे मला काहि गोष्टी करायला प्रोत्साहन देणं, चुकले तर कधी आई सारखं समजावणं, कधी रागावणं... मी कशीहि वागले तरी आजतागायत त्याने माझी सोबत सोडली नाही. मी मोठी काय कशीहि झाले असते, पण आज जे काही चांगलं वागू शकते त्यात माझ्यावर झालेले संस्कार आणि या गुरूचा च वाटा आहे.
असा हा गुरू..."अनुभव" त्याचं नाव! त्याने मला जे दिलंय ते अवर्णीय आहे. खरं तर अमोल ऋण आहे त्याचं ते. आणि ते ऋण वाढतच राहिल याची मला खात्री आहे. अशा या माझ्या आजन्म गुरूला आज "गुरूपौर्णिमे"च्या दिवशी शतश: प्रणाम!!! पुढच्या आयुष्यात माझ्यासोबत असाच सतत राहा आणि माझं जीवन समृद्ध कर. तुझ्यासारखा गुरू या जगात दुसरा नाहीच!!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
anubhav..experience.. yeah, that is indeed the best teacher one can have... till the very end, i was wondering who your teacher is... aani jevha vaachla, tevha agdi 100% patla :)
lihit jaa ga...aamhala pan tujhe 'anubhavaache' don bol kadhi tari laabhu dey ;-)
Wow!अनुभव हा खरा गुरू आहेच पण ह्या दिवशी खर तर गुरुंना प्रणाम करायचा असतो ना?
Keep writing!
Deep
"Time is the best teacher; unfortunately it kills all of its students."
khupach chan aahe. agadi manapasun aavadala. shabdach nahit sangayala,mazhyajaval.
तुझ्या या गुरू कम मित्राबद्दल पूर्वी पण लिहिलंयंस. आठवतंय?
तोच ना तो??
http://badbadi-snehal.blogspot.com/2007/02/blog-post_09.html
Snehal.. Khup chan lihilays ha post.. ani baryach idvsnni ala hya weli..
avdesh ekdam..:)
Post a Comment