Monday, September 22, 2008

पडदा

१३ वर्षापूर्वीचं घर... त्यावेळी घरात ५ माणसं असायची...आज त्याची ९ (२ बच्चे) झाली! ९ पैकी ३ आता जरा अंतरावर वेगळीकडे राह्तात... पण आठवड्यातून ४ वेळा तरी या जुन्या घराच्या ओढीने इकडे येतातच. या घरी राहायला आलो तेव्हा माझं भविष्य अजून काय आकार घेणार ते पण माहित नव्हतं. आणि मधल्या दादाला निदान त्याचा किरण दिसत होता; मोठ्या दादाचं त्या मानाने बरंच स्पष्ट होतं. बाबांनी अवघ्या आयुष्याची कमाई या घरात घातलेली... आमच्या आधीच्या घरातलं सामान घेऊन या घरात प्रवेश केला होता.
नवीन घरी लग्गेच सगळं नवीन घेणं शक्य नव्हतं.... पण पडदे तर हवेच होते. आधीच्या घरी आम्ही दार च फक्त रात्री झोपताना लावायचो तिथे पडदे कशाला? तिथे माणसं मनाचे आणि घराचे दरवाजे उघडे ठेवून च फ़िरत. तर मग नवीन घरी आल्याआल्या त्याच आठवड्यात आई-बाबा पदद्याचं कापड आणायला गेले होते. आधीचं घर आकाराने लहान, त्यात पडद्याची आवश्यकताच नाही अशी साधी राहणी. आई ने कपाटाला, एका खिडकीला वगैरे पडदे शिवले होते पण ते आपली तिची घर सजवायची आणि शिवणकाम करायची हौस म्हणून. पडदा पाहिजेच असा आमचा कोणाचाच आग्रह नसायचा. मी तर घरात कमी नि बाहेर जास्त असला प्रकार... :) मग माझ्या लहानपणी आईच कधीकधी मैत्रिणींबरोबर जाऊन पडद्याचं कापड आणत असे...कसा शिवायचा वगैरे चा मनात बेत करत असे. आम्हा भावंडांना पडदा म्हणजे येताजाता लोंबायला, हात पुसयला, खेळता-खेळता लपायला इतकाच तो त्याचा उपयोग माहित होता. पडदयाला याहून जास्त महत्त्व त्यावेळी आमच्या कोणाच्याच आयुष्यात नव्हतं.
मग नवीन घरी कोणी एक माणूस येऊन खिडक्यांची मापं घेऊन गेला.... त्यावरून खर्चाचा अंदाज दिला. अबब!!! २१ मीटर कापड लागणार होतं. माझ्या कल्पनेपलिकडचंच होतं... पडदे शिवून आले... ते लावायला खास बार, कडेला शो च्या मुठी वगैरे पण आले....काहीतरी झाकायला लागणारा पडदा स्वत:च इतका सजला कि क्या बात है!! नवीन घर बघायला येणारे लोक पण "पडदे छान आहेत हो" असं म्हणू लागले. या सगळ्या प्रकारामुळे मी पण कोणाकडे गेले कि त्या घरातले पडदे लक्ष देऊन बघू लागले. हळूहळू मग कळत गेलं कि पडदा हा गृहसजावटी मधला महत्त्वाचा भाग आहे. त्यात निरनिराळ्या प्रकाराचे कापड असते, शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याच्या रंगसंगतीमुळेहि घराच्या शोभेत बराच फ़रक पडतो वगैरे मौलिक भर पडत गेली. पण तरी पडदा हे प्रामुख्याने आई चे आणि नंतर आई-वहिन्यांचे क्षेत्र राहिले... मी नवीन/ धुतलेले पडदे लावणे आणि कसे आहेत यावर प्रतिक्रिया देणे या व्यतिरिक्त जास्त कधी काही केलं नाही.
आता आमच्या याच १३ वर्षापूर्वीच्या घराचा काहिसा कायापालट करायचा आम्ही घाट घातला... अगदी रितसर interior वाल्याला काम देऊन वगैरे. या रविवारी पडद्याचं कापड बघायला जायचं ठरलं... कधी नव्हे ते मी पण येते म्हणाले... आई ला नेमकं बरं वाटत नसल्याने ती येऊ शकली नाही. लक्ष्मी रोड वरच्या काही दुकानात गेलो. काय सुरेख व्हरायटी असते... अगदी त्या रंगीत दुनियेत गुंडाळल्यासारखं वाटलं. साडीच्या दुकानात साडी ड्रेप करून दाखवतात तसा इकडे पडदाहि ड्रेप करून दाखवतात!! परत दुकानात निरनिराळे samples होतेच display ला. पडदा, तो बांधायला शोभेचं अजून काही.. पडद्यात पण sheer वगैरे प्रकार. हे sheer म्हणजे एक पारदर्शक, झुळझुळीत कापड. मनात आलं असला पडदा काय कामाचा? हेच भाव कदाचित चेहर्यावर उमटले तसा interior वाला म्हणाला "फार सुंदर दिसतं हे", कि लागलीच दुकानदार ते ड्रेप करून दाखवू लागला. इतकंच काय त्या दुकानवाल्याने चहा/कॉफी घेणार का इतपत विचारलं. पडदे खरेदी बरीच सुखदायक असते कि! :) २-३ दुकानातले samples घेऊन परत निघालो.
१३ वर्षापूर्वीच्या संपूर्ण घराच्या पडद्याची किंमत आता एका पडद्याला जेमतेम पुरत होती. आणि इतकं करून लहानपणी मी ज्याला मनासारखं हात पुसायचे, लपायचे तसलं काहीही करू शकणार नव्हते :( वाटलं...स्नेहल नुसतं घर बदललं, त्याचे पडदे बदलले असं का आहे? आधीच्या घरातून इकडे येताना तू पण किती बदललीस? तिकडे सहज कोणाच्याहि घरात शिरणारी, कुठेहि भटकणारी, सगळ्या जनतेला "मुतालिकांची मुलगी" म्हणून माहित असलेली ..नवीन घरात किती कोशातली झाली? वय हे एक कारण असेल... पाचव्या वर्षी जशी मैत्री होते तितकी सहज ती १८ व्या वर्षी नाहीच होऊ शकत! म्हणजे मनाने पण नवीन पडदे च घेतले तर... पण मग पडदे घर सजवतात, काही न दाखवाव्या अशा गोष्टी पडद्यामागे लपतात...माझं तसं च आहे?? कि मनाचे हे पड्दे कसे आहेच याचा मी कधी विचारच नाही केला? ते माझी शोभा वाढवताहेत कि माझी शोभा करताहेत? कधी विचारच नाही केला.... या पडद्यांमुळेच कदाचित मला बरंच चांगलं काही दिसलं नाही, त्यामुळे मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्नच केला नाही. नवीन आलेल्या त्या sheer सारख्या पारदर्शक पडद्यासारखा एखादा तरी sheer माझ्या मनात आहे? आणि त्यातून मी जगाला आणि जग मला अस स्वच्छ बघू शकत आहोत का? कोण जाणे. कायापालट झालेल्या घरातल्या नवीन पडद्याबरोबर मी पण जरा मनाचे हे पडदे बदलून बघेन... निदान प्रयत्न तर नक्कीच करेन.

9 comments:

Krupa said...

Waah.... Surekh... Nakki tharal.. tumacha nawin ghar.. gharache ani tuzya manache badalalele padade ekadam pahayala yein [:)]
Surekh lihila ahes...

Pallavi said...

Good....

Padda hai padda...

Pallavi

Monsieur K said...

gharaa kartaa navin paDade gheNa.. kharach ek dhamaal activity aste.. did u check those shops near shanipaar? kasli amazing variety aste...

aani post cha end kasla philsophical kelaa aahes..

>> मी पण जरा मनाचे हे पडदे बदलून बघेन... निदान प्रयत्न तर नक्कीच करेन..

5 varshanchi snehal jashi tyaa paDadyaashi lombun kheLaaychi.. tashich aajchya snehal la suddhaa tichyaa manaachyaa paDadyaanshi lombun nehmi hasat-kheLat raahu dey :)

HAREKRISHNAJI said...

Nice curtains are found in Fab India opp,. Jahangir Hospital

TheKing said...

:-)

Mindblogger said...

Wow..(if only these 3 letters, ofcourse when put together could explain ME right now)

I'm sorry me marathit naahi kautook karu shakat...limited vocabulary...pan kharach chhan vaatla vaachun...

Cheers,

God bless you..

Quality Tale said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर

Innocent Warrior said...

खूपच छान लिहिले आहे. मी तुमचा ब्लॉग माझ्या ब्लॉग लिस्ट मधे समाविष्ट केला आहे.

धन्यवाद

सुजित बालवडकर Sujit Balwadkar said...

नमस्कार,

मी आपला ब्लॉग बघितला. खुप मस्त आहे. मी सुदद्धा ब्लॉग लिहितो. मला कवितांचा संग्रह करण्याचा छंद आहे पण स्वतः कविता करीत नाही माझा ब्लॉग नक्की बघा

http://marathikavitaa.blogspot.com/

आपला

सुजित बालवडकर