Friday, November 09, 2007

मॅच

हितगुज दिवाळी अंक २००७ साठी मी हि कथा पाठवली होती. ती इथे प्रकशित झाली आहे - मॅच

मॅच
"पव्या, बोल हेड की टेल?"

माझा चुलतभाऊ मंदार सोफ्यावर रेलून बसत चिडवण्याच्या सुरात म्हणाला. मंदार माझा नात्याने चुलतभाऊ, पण तसा मित्रच.... केवळ दहा महिन्यांनी लहान. त्यामुळे लहानपणापासून एकत्रच उंडारलो होतो.... अगदी चड्डी न घालता येण्याच्या वयापासून, सेडान कार मध्ये कोणाला फिरवावं या आणि अशा सगळ्या मित्र मैत्रिणी आम्ही शेअर केलेल्या. त्यात पठ्ठयाला चुकून एक सुंदर मुलगी पटली होती आणि तिला ’अक्कल’ जरा कमी असल्याने ती मंद्याशी लग्नाला तयार झाली होती. अशी देवाची कृपा माझ्यावर कधी होते हे बघण्यात कॉलेजची सहा नि नोकरीतली चार वर्षे गेली आणि मग अस्मादिकांनी 'अरेंज्ड मॅरेज' करण्याची मनाची तयारी केली. तर आजचा हा माझा चौथा कांदापोहे कार्यक्रम!! दर वेळी कार्यक्रम झाल्यावर माझी ’खेचायला’ येणारा मंद्या आज आधीच येऊन माझी ’खेचत’ बसला होता.

"काय हेड की टेल? तू ये एकदा..मग कळेल"
"वैतागतो काय यार? बरं..सांग दिल कि दिमाग??"मंद्याची टकळी चालूच होती.
"दोन्ही"
"टॉस केल्यावर एकच काहीतरी मिळतं"
"गधड्या, ही काय मॅच आहे...टॉस करायला???"
"मग काय आहे?? सांग दिल की दिमाग?"
"जाऊन आल्यावर सांगतोssss..." असं म्हणत मी गाडी चालू केली. सोबत आई बाबा होतेच. मंद्याचं शेवटचं वाक्य आठवून मला जाम हसू येत होतं ...

"लग्न म्हणजे मॅच नाहीतर काय आहे?" या मॅच मधले प्रमुख खेळाडू दोन...मी- पव्या उर्फ प्रवीण आणि ती (ठरली की नाव सांगतोच) !!! तर एक खेळाडू दुसर्‍या खेळाडूला भेटायला चालला आहे. आजचा प्राथमिक सिलेक्शनचा राऊंड. इकडून सिलेक्टर्स मी आणि आई..तर तिकडून ती आणि तिची आई. दोन्हीकडचे बाबा न्यूट्रल!!! बरोबर आहे... अध्यक्ष असाच हवा!

मी तसा बर्‍यापैकी अनुभवी खेळाडू म्हटलं तरी हरकत नाही. दोन वेळा भोपळे आणि तीन वेळा मॅच कॅन्सल!!! पण माझा टीम मधला सहभाग, अस्तित्व महत्त्वाचं... काय?? दोन वेळा भोपळे म्हणजे मी एकदा इंजिनीयरिंगच्या दुसर्‍या वर्षाला असताना एकीला आडूनआडून प्रपोज केलं होतं. अपयशी झालो. आणि त्यानंतर पहिल्या नोकरीत एक आवडू लागली हे ज्या क्षणी कळलं त्याच्या पुढच्याच आठवड्यात तिने साखरपुड्याचे पेढे हातावर ठेवले!! पुढे तीन वेळा मॅच कॅन्सल म्हणजे ’लग्नासाठी’ मुली बघायला लागलो तेव्हा प्राथमिक फेरीनंतर ’पिच रिपोर्ट’, ’ढगाळ हवामान’ वगैरे कारणं देऊन मी ती कॅन्सल केलेली. आजची ’ती’ कितपत अनुभवी आहे माहीत नाही.

दोन खेळाडू भेटले....गप्पा, चहा वगैरे झालं. दोन्ही खेळाडूंनी ’होम पिच’ (त्यांची बाग) वर पाय मोकळे केले. एकमेकांची ’स्टाईल’ जाणून घेतली. ती ’स्टाईल’ आपल्या ’स्टाईल’ शी कितपत जुळते वगैरे काही कंपॅटॅबिलिटी टेस्ट झाल्या. मी तिचा एकूण टीमस्पिरीट आजमावला. माझ्या (घरच्या) टीम मध्ये कशी वाटेल वगैरे. शेवटी ’होम पिच’ वरच्या बॅडलाईटमुळे (तिन्हीसांज) खेळाडू परतले. आणि परत गाडी सुरू करून घरी!

मला यावेळी का कोणास ठाऊक, पण ही मॅच होऊनच जाऊ देत असं वाटलं. ’पिच रिपोर्ट’, ’ढगाळ हवामान’, ’बॅड लाईट’ अशा काहीही सबबी आठवल्या नाहीत. (विनाशकाले विपरीत बुद्धी ते हेच वाटतं). उतावीळ मंद्याचा रात्री फोन आलाच...
"काय रे कशी आहे?"
"चांगली आहे..."
"बस क्या!! मुझे शेंडी?? काकू सांगत होती की तू एकदम गाणं वगैरे गुणगुणत आहेस म्हणून"
"काहीही........ आणि बाय द वे, तिला दिल, दिमाग दोन्ही आहे"
"ओह हो.....पण पहिल्या भेटीत तू दिमागवाल्या गोष्टी करत होतास? हरी ओंम!!! पव्या....म्हणून तुला मुलगी पटली नाही बघ" हा मंद्याचा आगऊपणा.
"ही पटणार गड्या...बघ.."
'सुंदरा मनामध्ये भरली' अशी काहीशी माझी अवस्था. आई-बाबांना पण ती पसंत. चला...इकडे सिलेक्शन टीम आणि अध्यक्ष यांचा होकार आला. फोनवर बोलणं झालं नि तिकडून पण अपेक्षित होकार आला. अशा रितीने दोन खेळाडूंची टीम तयार झाली. तिचं नाव ’दिशा’. (माझी दशा नाही केली म्हणजे मिळवलं)

आता मॅच साठी महत्त्वाची म्हणजे खेळाडूंची मानसिक एकात्मता आणि तयारी. त्यासाठी वारंवार भेटणे चालू झाले. अधून मधून मग तिचे नातेवाईक, कधी माझेपण आमची तयारी (??) बघायला म्हणून भेटत असत. वर परत ’हे दिवस एंजॉय करा, नंतर आहेच’ हे असलं कोचसारखं सूचना करणं होतंच!

बाकी आमचं ट्युनिंग चांगलं जमत होतं. सुरूवातीची एकदम अबोल, लाजरी दिशा हळूहळू खुलत चालली होती. मॅचचा आनंद घेण्याच्या दृष्टीने हे फारच महत्त्वाचं होतं. माझ्या काहीकाही स्ट्रॅटेजीजवर ती जाम लाजायची. आणि तसं झालं की मी पार पाघळायचो. तिला मी पहिलं गिफ्ट दिलं तेव्हाचा तिचा चेहरा.....अगदी कपिल देवने १९८३ मध्ये वर्ल्डकप जिंकल्यावर जसा होता तस्साच!!! ती खूप हळवी आहे....एकदा मी तिला विचारलं की माझ्यात असं काय बघितलंस आणि हो म्हणालीस? तर ती म्हणे "पहिल्याच दिवशी भेटलो...तेव्हा बागेत चालताना तू एकदाही मला सोडून पुढे गेला नाहीस. मी चहाचा घोट घेईपर्यंत तू थांबला होतास. जाताना माझ्याकडे बघून, हसून बाय केलास. तुझा हा केअरिंग स्वभाव आवडला." विचारलेल्या सराव प्रश्नाला दिशाने जबरी षटकार लगावून दिला होता. आणि त्या षटकारातला जणू मी बॉल आहे असं मला हवेत तरंगायला झालं होतं.

असं सगळं चालू असतानाच सिलेक्टर्सपासून प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांच्या मनात आमचा एक सराव सामना व्हावा असं ठरलं आणि आम्ही साखरपुड्याच्या तयारीला लागलो. सराव सामना त्यामुळे प्रेक्षक १०० वगैरेच..... शिवाय दिवसभराची मॅच चार तासात उरकली. सराव सामन्यात बराच गोंधळ लक्षात आला होता..जसं फोटोग्राफर दुसरा बघायला हवा.... हॉल जरा जास्त हवेशीर असावा. तिचा आणि माझ्या कपड्यांचा रंग साधारण साजेसा असावा (हे अर्थात तिकडचं म्हणणं). साखरपुड्याला तिची साडी मेंदी कलरची नि माझा शर्ट आकाशी...... म्हणजे जमीन-आसमानाचा फ़रक झाला होता. तर हे सगळं टाळायचं होतं. आता इतकं सगळं चालूच होतं तर एक-दोन वेळा मी पण संधी साधून ’तोंडओळख’ करून घेतली.

या मॅच मध्ये एक्स्ट्रा प्लेयर नसल्याने (आम्हाला नको पण होते!!!) फिटनेस महत्वाचा होता. म्हणून मग केळवणावर बंधने! मॅच मध्ये तिच्या दिसण्याला ’अति’ महत्त्व म्हणून मग एक महिना आधीपासून ब्यूटीपार्लर वगैरे. माझं काहीच नाही.....मी फक्त एक नवीन शेव्हींगकीट आणलं. साला आमच्याकडे बघतोच कोण! (मनातल्या मनात ’भोपळा' वाल्या दोघी डोकावून गेल्या). मॅचचा दिवस जवळ आला तशी धडधड वाढली..

ही पहिली नि शेवटची मॅच!!! हीच इनिंग कायम जपायची. आयला...मला कमिटमेंट फोबिया होतोय का??? छे छे!!! आय ऍम ऑलरेडी कमिटेड. मग कसलं टेन्शन??? तर....तेच तेव्हढं सांगता येत नाही बघा. तुम्हालाही अनुभव असेलच. जवळ जवळ ६००-७०० प्रेक्षक नक्की झाले. गुरूजीच्या नावाखाली अंपायर ठरला. मॅचच्या दिवशीचा मेनू ठरला. आणि तो दिवस आला.

गेले दोन दिवस मी आणि तिने एकमेकांना भेटलो नव्हतो. त्यामुळे एकत्र ज्यांना खेळायचं आहे त्यांनाच मनाचा अंदाज घेता येत नव्हता. एव्हाना मंद्याच्या लग्नाला दोन महिने झाले होते...त्यामुळे तो आपली काही खास मतं, ’टिप्पण्ण्या' देत होता. बहिणाबाईंचे काही फुकट सल्ले चालू होते....असा उभा रहा, तसा हास वगैरे. मला ऐन डिसेंबर मध्ये घाम फुटतो की काय असं झालं होतं. मॅच सुरू व्हायची वेळ अगदी दहा मिनिटांवर आली.

ग्राऊंडवर आधी मी उतरलो. सासूबाईंनी माझं अगदी औक्षण वगैरे करून स्वागत केलं... मी मनात म्हटलं ’अहो तुमच्या मुलीशी संसार हा काय युद्धाइतका भयंकर असणार आहे का?’ पण त्याक्षणी काहीही न बोलता सगळं करायचं असा मंद्याचा एक सल्ला आठवला. दोनच मिनिटात दिशा आली. आपुन खल्लास!!! ती ज ब री दिसत होती. म्हणजे कॉलेज मध्ये असताना मी आणि मंद्याने अनेक वेळा टप्पे टाकण्याचा प्रयत्न केलेल्या त्या ’शीतल’ पेक्षा उच्च दिसत होती. हे मंद्याला सांगायला म्हणून मागे वळलो तर तो कोपर्‍यात हातात डीजीकॅम नाचवत त्याच्या बायको शेजारी उभा होता. मनात आलं, आता इथून पुढे दिशा बद्दलचे असे सगळे हळवे, नाजूक क्षण फक्त माझे आहेत. ते मी अगदी मंद्याबरोबर पण शेअर नाही करणार. गुदगुल्या झाल्या.

मॅचच्या आधी जसे दोन्ही देशांचे राष्ट्रगीत असते त्याच धरतीवर इकडे गुरूजींनी दोन, मग तिच्या आत्याने एक, माझ्या मावशीने एक वगैरे मंगलाष्टके म्हणली (गायली म्हणणं चुकीचंच ठरेल). दर तीस सेकंदांनी अंगावर येणार्‍या अक्षता मानेवर अडकून टोचू लागल्या होत्या.... आणि अंतरपाट खाली आला. दिशाने मला हार घातला नि मी तिला..... अंपायरने 'मॅच सुरू करा'' असा इशारा दिला नि आमच्या मॅचचा पहिला बॉल पडला!

आम्ही दोघेही एकमेकांना ’मॅच’ असल्यामुळेच ही ’मॅच’ सुरू होऊ शकली. आमची ही मॅच ऊन, वारा, पाऊस या सगळ्यात अशीच चालू राहू दे, सिलेक्टर्सपासून प्रेक्षकांपर्यंत आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद, पाठींबा मिळू दे. जमेल आणि शक्य असेल तेव्हा चौकार, षटकार मारायला मिळू देत. दोघांचीही इनिंग रंगतदार, बहारदार व्हावी. कर्तव्य नीट पार पाडून देवाने आम्हाला आऊट करावं....आणि मागे राहिलेल्याला ताकदीनं उभं राहायचं बळ त्याने द्यावं.

तर मंडळी....मॅच आता सुरू झालेली आहे... जेवण करून जायचं. आणि मॅच संपेपर्यंत अशीच साथ द्यायची. कसं आहे... प्रेक्षकांशिवाय काही मजाच नाही ना कशाची!!!