Monday, March 26, 2007
कौसल्या
आज रामनवमी... पुरूषोत्तम रामाचा जन्म पुराणकाळात आजच्या दिवशी झाला. दशरथ राजाचा राम हा पहिला पुत्र. असं म्हणतात कि रामजन्मानंतर संपूर्ण अयोध्यानगरी आनंदून गेली होती. राजाला पुत्र झाला, राज्याला वारस मिळाला... पुढे हा दशरथपुत्र खरोखर एक आदर्श राजा झाला. इतका कि "रामराज्य" हि एक संकल्पना झाली.
पण मला नेहमी वाटतं कि या सगळ्यात रामाची आई, राणी कौसल्या, कुठेतरी हरवून गेली. एक आदर्श पुरूष घडायला एका आईचे योगदान, संस्कार सगळ्यात महत्त्वाचे असतात. कौसल्या हि दशरथाची पहिली राणी. त्यानंतर अजून २ राण्या झाल्या. सगळ्यात धाकटी कैकेयी. कैकेयी हि आवडती राणी!!! पण राणी कौसल्येने कधी सवतीमत्सर केल्याचा उल्लेख नाही. पुत्रप्राप्तीसाठी ओटि मिळालेला प्रसाद देखील हिने वाटून घेतला. याच प्रसाद भक्षणाचे फलित म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चार दशरथ पुत्र!!!
कृष्णाच्या बाललीलांप्रमाणे रामाच्या बाललीला फारशा नसाव्यात. निदान त्याचा उल्लेख तरी कमी आढळतो. पण त्याच कोवळ्या संस्कारक्षम वयात कौसल्येने रामाला घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पण दुर्लक्षितच राहिले. हा काळ असा असतो कि मूल सगळ्यात जास्त आईजवळ असते. आई हेच विश्व!!! पण रामाने चंद्राचा हट्ट केला आणि कौसल्येने तो प्रतिबिंब दाखवून पुरा केला याउपर आई-मुलगा यांच्या नात्याचा विशेष उल्लेख नाही. कैकेयीने भरताला राजगादीवर बसवण्यासाठी रामाला वनवासात जायला सांगितले. कैकेयीच्या अशा वागण्याने दशरथ कोसळला होता. ज्याला जन्म दिला तो आता वनवासात जाणार आणि ज्याच्याबरोबर जन्म काढला तो दु:खाने विव्हळ होतोय, हे सगळं कसं सहन केलं असेल कौसल्येने? वनवासात जा असं सांगणाऱ्या आईबद्दल मनात कटूता न ठेवता विनम्र भाव ठेवणे याचं बाळकडू रामाला याच कौसल्येने दिलं असेल ना!!! लेखकांनी उर्मिलेचं (लक्ष्मणाची बायको) दु:ख मांडलं, पण पुत्रवियोग सहन करणारी कौसल्या दिसलीच नाही का?
अजाणतेपणे कर्णाला जन्म देणारी कुंती, शंभरपुत्रांची आई गांधारी, कृष्णाला जन्म देणारी देवकी आणि संगोपन करणारी यशोदा सगळ्यांचा पुराणकाळात स्वतंत्र उल्लेख, अस्तित्व दिसून येतं. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई, सानेगुरूजींची आई यांनी मुलांवर लहानपणी केलेले संस्कारांचे महत्त्व सगळेच जाणतात. मग नेमकी कौसल्याच का दुर्लक्षित राहिली? सर्वश्रेष्ठ पुरूष जिच्या पोटी जन्माला आला ती आई तितकीच महान नसणार का? शंकरासारखा नवरा मिळावा म्हणून बायका व्रत करतात मग रामासारखा मुलग व्हावा अशी इच्छा होत नाही का यांना? कि पतिसुख, पतिप्रेम हे पुत्रसुख आणि पुत्रप्रेमाहून जास्त प्रिय आहे बायकांना?
कलियुगात यशोदा, देवकी, जानकी, उर्मिला अशा नावाच्या मुली सहज दिसतील पण कोणी मुलीचे नाव कौसल्या ठेवलेलं ऐकलं आहे?
कोणी काहिहि म्हणो, माझ्यामते राम जितका श्रेष्ठ, नरोत्तम आहे तितकीच त्याची आई कौसल्या महान आहे. आज या रामनवमीदिवशी माझा कौसल्येला शतश: प्रणाम!!! असे पुत्र जन्माला घालण्याचे आणि घडवण्याचे सामर्थ्य कलियुगात अधिकाधिक स्त्रियांना लाभो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
कोणी काहिहि म्हणो, माझ्यामते राम जितका श्रेष्ठ, नरोत्तम आहे तितकीच त्याची आई कौसल्या महान आहे."
हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि कोणी ते मान्य करण्याचा प्रांजळपणा नसेल दाखवत तर ती त्याचा संकुचितपणा आहे. खरंच कौसल्येचा इतिहास पडद्याआडच राहीला.
Just to inform you that your blog has been added into Marathi Blogs aggregator - MarathiBlogs.com. I would appreciate if you can give a link back to MarathiBlogs.com.
-- Punit
खरंच कौसल्येबद्दल फार कमी लिहीले गेले आहे. ह्या विषयावर लिहील्याबद्दल धन्यवाद!
खरच
कौसल्या फक्त "कौसल्येचा राम ग बाई कौसल्येचा राम" ह्या गाण्यात फक्त राम नमवी ला भेटते.
Post a Comment