Monday, February 19, 2007

अमृततुल्य!!!

तशी मी काहि चहाभक्त (किंवा चहाटळ!!! ) नाही... पण दिवसातून दोन वेळा, सकाळी-दुपारी, चहा पिते. त्यातूनहि उगाच कुठलाहि, कसलाहि चहा नाहिच चालत बुवा...चहा कसा हवा अमृतासारखा!!! आणि घर सोडून असा चहा मिळण्याचे ठिकाण म्हणजे खास पुण्यातील काहि अमृततुल्ये. पुणेकरांची एक खासियत आहे... एकदा एखादि गोष्ट कुठे चांगली मिळते म्हणलं कि आम्ही लावलीच तिथे रांग. उदाहरणार्थ - चितळे बंधू मिठाई वाले, श्री/ बेडेकर मिसळ, हॉटेल वैशाली, हिंदुस्थान बेकरी चे पॅटिस इ. कुठल्याहि पक्क्या पुणेकराला या स्थळांचं आणि तिथल्या चवीचं, वासाचं एक अनाम आकर्षण असतं.
असंच अजून एक ठिकाण म्हणजे हि अमृततुल्य... इथला चहा न पिलेला पुणेकर म्हणवून घ्यायला शोभत नाही. पूर्वीपासून जिथे मराठी लोकांची वर्दळ असते अशा सगळ्या भागात हि अमृततुल्ये आहेत. नाव हे बहुतेक वेळा xxxxxx अ+इश्वर भुवन असं काहिसं. (जबरेश्वर भुवन वगैरे). क्वचित कधी त्रिवेणी, तुलसी अशी जरा हटके नाव असेल. पण नावात काय आहे?? नाव काहिहि असो..साधारण रंगरूप ठरलेली. एक दहा बाय दहा ते दहा बाय पंधरा घन चौरसाची जागा, त्यात साधारण ३ ते ४ ऍल्युमिनियम चे पत्रे लावलेले टेबल्स आणि बसायला लाकडी बाक. चहा करणारा दुकानाच्या एकदम दाराशी उभा, त्याच्या मागे गणपती/ मारूती/ साईबाबा असा एक फोटो, एका मोठ्या पातेल्यात चहा चे आधण ठेवलेले, त्याहून लहान पातेल्यात जवळच दूध. बसल्या जागी हाताला येईल अशा बेताने ठेवलेले चहा पावडर, साखर आणि वेलदोडा पावडर चे डबे. चहा गाळण्यासाठी एक मऊ पंचा किंवा मोठे गाळणे, ऍल्युमिनियमची चहाची किटली (याला चहाचे किमान २-३ तरी ओघळ पाहिजेतच).
तीन इंच उंचीचे जाड काचेचे पेले किंवा दोन इंच उंचीचे पांढरे कप नि बशी. रस्त्यावरून सहज दिसतील अशा पद्धतीने ३-४ बरण्या...त्यात बटर, नानकटाई, क्रिमरोल इ. गोष्टी. कुठल्याहि अमृततुल्यामध्ये यात फारसा फरक दिसणार नाही. एक कप चहाचा दर पण जवळ जवळ सारखाच... फ़क्कड चहा चा मात्र दर वेगळा!!! आता हे फक्कड चहा म्हणजे काय तर स्पेशल चहा हो... दूध जरा जास्त, वेलची थोडी हात सोडून...असा customised चहा. फक्कड हा खास अमृततुल्य वाल्यांचा शब्द :)
सकाळी सातला सुरू होणारी हि दुकाने दिवसभर चालू असतात... यांना ना दुपारची जेवणाची सुट्टी ना आराम (पुण्यातली इतर बहुतेक सर्व दुकाने दुपारी १ ते ४ बंद असतात हे जगविख्यात आहेच). सकाळी पहिला चहा करून अर्धा अर्धा कप दुकानाच्या दोन दिशेला ओतून हे दिवसाची सुरूवात करणार!!! चहाच्या प्रत्येक घाण्याची हातावर एक थेंब घेऊन चव बघायची आणि मग च त्यात दूध घालायचे हा रिवाज.... कित्येक पिढ्या असा चहा करत असतील नी कित्येक त्याचा आस्वाद घेत असतील. भर गर्दीच्या रस्त्यांवर, आता जिथे महागडी आणि विदेशी कॉफी शॉप्स आहेत तिथेहि... गरीबाची, एका अस्सल चहाबाजाची तल्लफ पुरी करायला हि अमृततुल्ये आहेत. धो धो पावसात किंवा डोकेदुखीच्या वेळी तुम्हाला ती ७० रुपयाची कडू कॉफी आठवते कि चहा?? रस्त्यात दोन जुने मित्र भेटल्यावर ते "चल, एक एक चहा मारू" म्हणतील कि कॉफी??
मी या अमृततुल्य वाल्यांची ऋणी आहे... कॉलेज मधले इतक्या सुंदर दिवसांच्या आठवणी आहेत यात. दिवसभर कंटाळून दुपारी चार वाजता एक चहा पिऊन practical ला जायचं.. ग्रुप मधली कुठलीहि पैज या चहावर संपायची.... सायकलच्या हवेसाठी चे पैसे हवा भरावी लागली नाहि कि चहा आणि क्रिमरोल पार्टी करायची :)
नंतर नोकरी सुरू झाल्यावर इराण्याचा चहा अनेकदा पिला... तो पण चहा असतो छान पण अमृततुल्य ला पर्याय नाही..
काल च्या TOI मध्ये एक बातमी वाचली(इंटरनेट वर ही बातमी सापडली नाही), अमृततुल्य वाल्यांचा धंदा लक्षणीय कमी झाला आहे.. वाढती महागाई, तरूण पिढीची बदललेली चव या सगळ्याचा त्यावर परिणाम झाला आहे. ते वाचलं आणि सगळ्या आठवणी दाटून आल्या..
देव करो नि हि अमृततुल्ये अशीच चालू राहोत.... बाजारात नवीन काहि येताना जुन्या गोष्टींचा बळी गेलाच (दिलाच) पाहिजे का??

10 comments:

Yogesh said...

एका पुणेरी चहावाल्याकडे अमिताभ बच्चन ४ रुपये आणि जया भादुरी २ रुपये अशी पाटी वाचली होती.

जास्त उत्सुकता दाखवल्यावर

अमिताभ म्हणजे मोठा पेला व जया म्हणजे लहान असं सांगितलं :p

Monsieur K said...

yeah, even i felt disappointed after reading the news on "amrut-tulya" in Sunday TOI e-paper edition.
it does bring back fond memories of college days, and even work days - driving around Pune on a bike in the rain and stopping at one such amrut-tulya (e.g. the one on BMCC road) - nothing beats a hot 'glass' of cutting chai to rejuvenate yourself!
shucks, i really miss tht! :(

~ketan

Anonymous said...

hi read ur blog nice to know all about "Amruttulya" (as I amrked) but sad about the news.

vidyadhar dikkar

Anonymous said...

कुर्यात सदा टिंगलम नाटकामध्ये 'बसवेश्वर अमृततुल्य' नावाच्या हाटेलचा उल्लेख आला आहे. त्यावरून मला कल्पना होती साधारण. पण तुझ्या लेखामुळे फ़ंडा क्लिअर झाला. दहा बाय दहा..वगैरे. :-) चहाची तलफ़ आली..आलोच घेऊन.

प्रिया said...

वा! मस्तच लिहीलं आहेस बडे! मला आठवतं, आम्ही जंगली महाराज रोडवर पांचाली, सुरभि मध्ये दोसा/उत्तपा खायला गेलो की शेवटी चहा मागवायचो. आणि या हॉटेलांमध्ये चहाच्या नावाखाली जो काही द्रवपदार्थ द्यायचे ना... चिडचिड व्हायची जाम! मग समोरच्या अमृततुल्य मध्ये जाऊन आणखी एक एक चहा प्यायचा, हा आमचा ठरलेला कार्यक्रम असे! :) खरंच ’अमृततुल्य’ असतो हा चहा...

Prasad Chaphekar said...

मी पण इथे IIT कानपूर मधे खूप miss करतोय अमृत्तुल्य... जाने कँह गए वो दिन.......

TheKing said...

Amhi mulakhache mumbaikar ani tyatoonahi chaha na pinare,pan tarihi tuzya 'amrut-tulya-bhavana' samajalya. Good to find your blog!

HAREKRISHNAJI said...

चहा गुलाबी चहा, उकाला चहा, मसाला चहा आदि प्रकारचे चहा येथे मिळतात. (अ. )

अनु said...

Barich navi mahiti milali ya lekhatun.Mi pan chahabhakt ahe.

संदीप चित्रे said...

स्नेहल,
एकदम आवडता विषयावर लेख वाचायला मिळाला! जमेल तेव्हा माझा blog (www.atakmatak.blogspot.com) पहा. Latest post “चहा”वर आहे! अभिप्राय पाठवलास तर स्वागतच आहे.
उत्तम लिहीत रहा !
संदीप