Monday, March 26, 2007

कौसल्या


आज रामनवमी... पुरूषोत्तम रामाचा जन्म पुराणकाळात आजच्या दिवशी झाला. दशरथ राजाचा राम हा पहिला पुत्र. असं म्हणतात कि रामजन्मानंतर संपूर्ण अयोध्यानगरी आनंदून गेली होती. राजाला पुत्र झाला, राज्याला वारस मिळाला... पुढे हा दशरथपुत्र खरोखर एक आदर्श राजा झाला. इतका कि "रामराज्य" हि एक संकल्पना झाली.
पण मला नेहमी वाटतं कि या सगळ्यात रामाची आई, राणी कौसल्या, कुठेतरी हरवून गेली. एक आदर्श पुरूष घडायला एका आईचे योगदान, संस्कार सगळ्यात महत्त्वाचे असतात. कौसल्या हि दशरथाची पहिली राणी. त्यानंतर अजून २ राण्या झाल्या. सगळ्यात धाकटी कैकेयी. कैकेयी हि आवडती राणी!!! पण राणी कौसल्येने कधी सवतीमत्सर केल्याचा उल्लेख नाही. पुत्रप्राप्तीसाठी ओटि मिळालेला प्रसाद देखील हिने वाटून घेतला. याच प्रसाद भक्षणाचे फलित म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चार दशरथ पुत्र!!!
कृष्णाच्या बाललीलांप्रमाणे रामाच्या बाललीला फारशा नसाव्यात. निदान त्याचा उल्लेख तरी कमी आढळतो. पण त्याच कोवळ्या संस्कारक्षम वयात कौसल्येने रामाला घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पण दुर्लक्षितच राहिले. हा काळ असा असतो कि मूल सगळ्यात जास्त आईजवळ असते. आई हेच विश्व!!! पण रामाने चंद्राचा हट्ट केला आणि कौसल्येने तो प्रतिबिंब दाखवून पुरा केला याउपर आई-मुलगा यांच्या नात्याचा विशेष उल्लेख नाही. कैकेयीने भरताला राजगादीवर बसवण्यासाठी रामाला वनवासात जायला सांगितले. कैकेयीच्या अशा वागण्याने दशरथ कोसळला होता. ज्याला जन्म दिला तो आता वनवासात जाणार आणि ज्याच्याबरोबर जन्म काढला तो दु:खाने विव्हळ होतोय, हे सगळं कसं सहन केलं असेल कौसल्येने? वनवासात जा असं सांगणाऱ्या आईबद्दल मनात कटूता न ठेवता विनम्र भाव ठेवणे याचं बाळकडू रामाला याच कौसल्येने दिलं असेल ना!!! लेखकांनी उर्मिलेचं (लक्ष्मणाची बायको) दु:ख मांडलं, पण पुत्रवियोग सहन करणारी कौसल्या दिसलीच नाही का?
अजाणतेपणे कर्णाला जन्म देणारी कुंती, शंभरपुत्रांची आई गांधारी, कृष्णाला जन्म देणारी देवकी आणि संगोपन करणारी यशोदा सगळ्यांचा पुराणकाळात स्वतंत्र उल्लेख, अस्तित्व दिसून येतं. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई, सानेगुरूजींची आई यांनी मुलांवर लहानपणी केलेले संस्कारांचे महत्त्व सगळेच जाणतात. मग नेमकी कौसल्याच का दुर्लक्षित राहिली? सर्वश्रेष्ठ पुरूष जिच्या पोटी जन्माला आला ती आई तितकीच महान नसणार का? शंकरासारखा नवरा मिळावा म्हणून बायका व्रत करतात मग रामासारखा मुलग व्हावा अशी इच्छा होत नाही का यांना? कि पतिसुख, पतिप्रेम हे पुत्रसुख आणि पुत्रप्रेमाहून जास्त प्रिय आहे बायकांना?
कलियुगात यशोदा, देवकी, जानकी, उर्मिला अशा नावाच्या मुली सहज दिसतील पण कोणी मुलीचे नाव कौसल्या ठेवलेलं ऐकलं आहे?
कोणी काहिहि म्हणो, माझ्यामते राम जितका श्रेष्ठ, नरोत्तम आहे तितकीच त्याची आई कौसल्या महान आहे. आज या रामनवमीदिवशी माझा कौसल्येला शतश: प्रणाम!!! असे पुत्र जन्माला घालण्याचे आणि घडवण्याचे सामर्थ्य कलियुगात अधिकाधिक स्त्रियांना लाभो.

Friday, March 23, 2007

सात्विक संताप

ऑफिस मध्ये रोज कितीतरी फॉरवर्ड मेल्स येत असतात...सगळं काहि मी बघतेच असं नाही. काहिकाहि लोक तर इतके फॉरवर्डस पाठवतात कि अशा लोकांसाठी एक rule लिहावासा वाटतो. पण न जाणो खरंच एखादी चांगली मेल आली अशा व्यक्तीकडून तर आपली miss नको व्हायला असा विचार करून मी कोण्या एका मेलच्या प्रतिक्षेत अशा १०० मेल्स सहन करून शहाण्या मुलीसारखी डिलीट करते.
आजहि अशाच एका व्यक्तीकडून एक मेल (खरंतर अनेक, पण त्यातली हि एक) आली. सवयीप्रमाणे डिलीट करणार इतक्यात त्यातल्या subject ने लक्ष वेधले गेले. subject होता - Let's salute these officers.....today....and year after year......we are enjoying freedom because of them only.....
बघू तरी मेल म्हणून ओपन केली. त्यातला मजकूर हा असा होता -
Today is 23rd March.
The day to be remembered as today is their 75th death anniversary...
We must salute these brave officers today also who sacrificed their lives for us only.
For our INDEPENDENCE only...
Sahidon ki chitaaoo pe lagenge har baras mele, Watan per marne waloon ka bas yahi baaki nishan hoga… (Bhagat Singh)


आज २३ मार्च आहे हे सकाळी लक्षात आलं होतं....माझी जाम चिडचिड झाली ते The day to be remembered as today is their 75th death anniversary हे वाचून.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना २३ मार्च १९३१ साली इंग्रज सरकारने फाशी दिले. आज या गोष्टीला ७६ वर्षे झाली, ७५ नाही. प्रखर विचारांचे भगतसिंग यांच्या फाशीने उभा देश हेलावला होता. २३ वर्षाच्या या मुलाने जे मतप्रदर्शन, जनजागरण केले होते ते तोंडात बोट घालायला लावणारे आहे. आपल्याच देशातील काहि महान नेत्यांनी भगतसिंगांवर कडाडून टिका केली होती. असे असतानाहि आज देशभराच्या सगळ्या शालेय पाठ्यक्रमाच्या इतिहासात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या त्रयीचा स्वतंत्र उल्लेख आहे. २३ मार्च १९३१ पासून आजतागायत त्यांच्या बलिदानाला आम्ही "शहीद" म्हटले आहे. हे सगळं काय केवळ शाळेत गुण मिळवण्यापुरतं??
तेजस्वी क्रांतिकारकांच्या रक्ताची हिच किंमत करते आमची पिढी?? अमिताभ, राणी मुखर्जी, शाहरूख खान यांचे वाढदिवस मुखोद्गत असतील पण भगतसिंगांना फाशी झाली तो दिवस, जो आमच्या स्वातंत्र्यलढ्यातला महत्वाचा दिवस आहे तो लक्षात राहत नाही. इतके casual केलंय आम्हाला स्वातंत्र्याने??
प्रत्येकाची गती वेगवेगळ्या क्षेत्रात असते, सगळं लक्षात ठेवणे वस्तुत: शक्य नाही हे मलाहि मान्य आहे. मी स्वत: कित्येक महत्वाचे दिवस, घटना विसरते. पण एखादि मेल ज्यात ऐतिहासिक किंवा इतर महत्त्वाचे काहि आहे असे आपण जेव्हा इतर १५-२० लोकांना वाचायला फॉरवर्ड करतो तेव्हा एकदाहि तपशीलात जायची गरज वाटत नाही??? तुमचा जन्मदिवस समजा एका वर्षाने कोणी पुढे मागे केला तर काय प्रतिक्रिया असेल?? तुम्ही तर असे कोण ज्यांच्या बाबतीत लोक लक्षात ठेवतील... पण भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशासाठी प्राणार्पण केले आहे, त्याची निदान दिवस लक्षात ठेवून तरी चाड ठेवा. आजच्या पिढीला केवळ पूर्ण आयुष्य देशात घालवा असं म्हणलं तरी त्रास होईल, जीव देणं तर लांबच!!!

खूप चिडचिड होते माझी, संताप होतो.... कि काय होतंय, काय होणार आहे??

Tuesday, March 20, 2007

जीवघेणा छंद....

काल सकाळी ऑफिस ला आले.. नेहमीप्रमाणे Hi, good morning करत माझ्या डेस्कपाशी आले. योगेश (माझ्या शेजारी बसतो) आधीच आला होता. मी आलेले बघून त्याने पटकन वळून विचारलं
"काल पेपर मध्ये वाचलस का?"
" काय????"
"तो केदार देशपांडे गेला..."
"कोण रे??"
"अगं तो माझ्या ट्रेकिंग ग्रुप मधला... enduro-3 जिंकलेला..."
"काय सांगतोस??? कसा काय?"
"सकाळ ला आली आहे ना बातमी...वाचली नाहिस का?"
मी काहिच बोलले नाही.... मशिन चालू करून आधी इ-सकाळ उघडला....
तशी या केदारला मी कधी प्रत्यक्ष बघितले नाही. योगेश कडूनच मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं, बरेच फोटो बघितले होते. केदार....इतर चार जणांसारखा मुलगा. BE झाल्यावर रितसर एका मोठ्या IT कंपनीमध्ये सर्व्हिस करत होता. लहानपणापासून याला ट्रेकिंगचा अतिशय नाद... केदार आणि मंदार (जुळा भाऊ) ने मिळून अनेक ट्रेक केले. सर्व्हिस सुरू झाल्यावर केदार ने कंपनीतच एक treker's club चालू केला. उन्हाळा,पावसाळा कुठलाहि ऋतू असो.... २-३ weekend गेले कि एखादा नवीन ट्रेक करायचा. long weekend ला काहितरी मस्त प्लॅन करायचा... हे सगळं अगदी रूटिन. जणू डोंगर, दऱ्या-खोऱ्या फिरणं हाच त्याच्यासाठी श्वास!!!
यावर्षी enduro3 हि स्पर्धा केदार ने आपल्या सोबत एक मित्र-मैत्रीण घेऊन प्रथम क्रमांकाने जिंकली. योगेशला त्या दिवशी झालेला आनंद अजून आठवतो मला!!! लगेच दुसऱ्याच दिवशी केदारचे enduro3 मधले फोटो बघितले. ते सगळं वाचताना, फोटो बघताना मलापण आनंद होत होता. आणि मला आश्चर्य वाटलं ते याचं कि इतका मोठा ट्रेक करून हा मुलगा दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिस मध्ये होता!!! अशा साहसाची, कष्टांची त्याला इतक्या लहानपणापासून सवय होती कि असं काहि केलं नाहि तरच त्याला चैन पडत नसावं.
दरम्यान केदार-मंदार चा वाढदिवस झाला. वयाची २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल योगेश त्याची फोनवर खेचत होता. तेव्हा कुठे कोणाला माहित होतं कि हा दिवस परत फिरून केदारच्या आयुष्यात येणारच नाहीये.
इ-सकाळ मध्ये ही बातमी वाचली अन क्षणभर काहि सुचेनासं झालं. हे कसं शक्य आहे असं राहून राहून वाटलं. कित्येक गड हा मुलगा लिलया चढला होता... सिंहगड तर त्याला अतिपरिचीत होता. धोक्याच्या जागा माहित नसणं, पुढचा मागचा विचार न करता काहितरी साहस करणं असं काहि केदार बाबतीत झालं असण्याची शक्यता कमीच. मग नक्कि काय झालं?? कि वेळच सांगून आली होती?? ज्या छंदासाठी तो जगत होता त्या छंदानेच त्याच्यावर झडप घालावी!!! आणि अशाप्रकारे कि त्याला कसला विचार करायची उसंतच मिळू नये?? हे सगळंच दुर्दैवी आहे.
मी कोण, कुठली.... आम्ही कधी प्रत्यक्ष भेटलो नाहि तर मला या यातना होत आहेत.... मंदार, त्याचा सख्खा जुळा भाऊ, त्याला काय होत असेल? लहानपणापासून सावलीसारखे सोबत असलेले हे जुळे भाऊ.... एक गेला तर दुसऱ्याचं अस्तित्व हरवावं इतके जवळ. आई-बाबांनी कसं सहन करावं?? तरणा ताठा, सुविद्य, सुसंस्कारी मुलगा.... नेहमीप्रमाणे ट्रेकला जातो आणि घरी परत येतो तो त्याचा मृतदेह!!! नियतीने क्रूर थट्टा केली या कुटुंबाची.
मला सगळे गड चढून बघायचे आहेत हि इच्छा असणाऱ्या केदार ने मरणाचा गड पण किती सहज पणे पार केला. पण तो इतक्या लवकर करायला नको होतास केदार!!!

Monday, March 12, 2007

मधुमिलन

२-३ दिवस सतत साडी नेसल्याने केतकीला कधी एकदा कपडे बदलेन असं झालं होतं. दगिने काढायला म्हणून ती आरशासमोर उभी राहिली. इतक्यात बेल वाजली. बघते तर प्रसन्न च होता.

"काय रे, आई बाबांना सोडायला जाणार होतास ना?"
"हो... चाललो आहे. एक काम राहिलं, म्हणून आलो परत वर." असे म्हणत त्याने तिला हातात एक बॉक्स देत मिष्किलपणे डोळे मिचकावले.
"काय?" केतकी.
"उघडून बघ. आणि मी येईपर्यंत घालून बस. मी आलोच."
"सावकाश जाऊन ये रे"
"आज नाही. अब ये दूरी सहि ना जाये..." बाहेर पडता पडता प्रसन्न केतकीच्या पाठीवर ओठ टेकवून गेला.
केतकी मनोमन लाजली.
(आज च्या रात्री या दोघांना एकांत मिळावा म्हणून घरातले सगळे पाहुणे, आई बाबा मामाकडे गेले होते.)

तो बॉक्स उघडून बघितला तर त्यात सुंदर सॅटिन चा, लेमन कलरचा २ पीस गाऊन होता. प्रसन्न ने दिलेल्या बॉक्स मध्ये असं काहि असेल हे वाटलंच नव्हतं तिला!!!
कपडे बदलून, चेहरा स्वच्छ धुवून केतकी ने तो गाऊन घातला. खूप गोड दिसत होता तो तिला. आरशात बघून ती स्वत:वरच जाम खूष होती. दोन दिवस सतत त्या मेक-अप मुळे तिला कंटाळा आला होता. केसाला नुसता एक fixer लावला. छान perfume, natural lipstic लावून केतकी टेरेस मधल्या आराम खुर्ची वर डोळे मिटून बसली.

तिचं मन मागे धावत होतं. सगळच कसं अचानक घडत गेलं होतं.
प्रसन्न हा एका मोठ्या IT कंपनीत project lead. मूळचा सोलापूरचा. आई-बाबा डॉक्टर. साधारण दहा वर्षांपूर्वी त्यांनी पुण्यात एक फ्लॅट घेऊन ठेवला होता. प्रसन्न च पुण्यातच settle व्हायचं ठरल्यावर त्या घराचं renovation करायचं ठरलं. एका interior decorator कडे प्रसन्न गेला आणि सगळं ठरल्यावर हि assignment केतकीच्या बॉस ने तिला दिली. घराची रचना, प्रकाशाचे प्रमाण वगैरे बघून केतकी ने कामाला सुरूवात केली. प्रत्येक वेळी ती आणि प्रसन्न भेटायचे तेव्हा केतकी काहितरी नवीन बदल सुचवायची त्याला. तिचे रंगसंगतीचे कौशल्य आफाट होते. बघता बघता अवघ्या ५ महिन्यात केतकीने वॉल restructing पासून furniture, lights सगळे पूर्ण केले. प्रसन्न आणि बॉस दोघेहि तिच्या कामावर खूष होते. शेवटचं पेमेंट करायला प्रसन्न ऒफिस मध्ये आला तेव्हा बॉस ने तिला केबिन मध्ये बोलावलं.

"केतकी, well done young lady"
"Thanks sir!!! I hope Mr. Prasanna is also happy" ती प्रसन्न कडे बघून म्हणाली.
"Oh yes, he is. Actually त्यासाठीच त्यांनी आज लंच ला बोलावलं आहे मला आणि तुला. पण I have got some more important work to do. But you go ahead please"
"सर...."
"प्लीज...." प्रसन्न म्हणाला.
"ऒके. मी इथे बाहेरच बसते. तुमचं बोलणं झालं कि या माझ्या केबिनमध्ये. मग जाऊ आपण"
"Sure!!!" हसत प्रसन्न म्हणाला.

त्याच लंच मध्ये त्याने तिला लग्नाबद्दल विचारले होते. (म्हणजे हे सगळे बॉस ला माहित होतं तर!!!) त्याच्या अचानक प्रश्नाने ती जरा गोंधळली होती. मला थोडा वेळ हवाय असं सांगून ती सरळ घरी गेली. तसा तो पण तिला आवडत होता... पण एकदम लग्न!!! ती आईशी बोलली. आईने तिला कशाचा विचार करायचा नि कशाचा नाही हे समजावलं. त्या सगळ्याचा विचार करता केतकी च्या मनाने होकार दिला. प्रसन्नला तिने हे सांगितलं तेव्हा कसला आनंद झाला होता त्याला

मग काय...त्याचे आई बाबा येउन आईला भेटले. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख ठरली. सा.पु ते लग्न यामधल्या ३ महिन्याच्या काळात ते दोघं जवळ जवळ रोज भेटत होते.

"केतू, मी या weekend ला पुण्यात नाहिये. treking ला चाललो आहे."
"कुठे??"
"तोरणा"
"मी पण येऊ??"
या प्रश्नावर प्रसन्न खो खो हसत सुटला होता.
"इतकं हसायला काय झालं? नाहि येत मी."
"पर्वती चढली आहेस का कधी? तोरणा किती अवघड आहे माहित आहे??"
"चल, आत्ता चढून दाखवते पर्वती"

प्रसन्न च्या नंतर १५ मिनिटांनी ती वर पोचली होती आणि ते पण धापा टाकत. वर बसल्यावर नकळत त्याच्या खांद्यावर डोक ठेवून ती बसली.
"not bad huh!!! कधी जाऊयात मग तोरण्याला?" प्रसन्न ने विचारलं
"का? आता का? मगाशी किती हसू येत होतं"
"हो, पण पर्वती चढून मला हे सुख मिळत असेल(खांद्यावरच्या तिच्या डोक्यावर डोक टेकवत प्रसन्न म्हणाला) तर तोरणा म्हणजे ..........."
"वा वा...काय विचार आहेत!!! तोरण्याला लग्न झाल्याशिवाय जायचं नाही" त्याच्या खांद्यावरून डोक काढत केतकी म्हणाली.
"चालेल ना. असलं सुख मला लग्नानंतर हि हवंच आहे कि...."
"काय हा निर्लज्जपणा....." उभं राहत केतकी.
"अर्रेच्या, बायकोवर प्रेम करण्यात कसली लाज???"

----------------------------------------------------------------------------------------
"अगं, आपण HM साठि कुठे जाऊयात?"
"कुठेहि....."
"हे काय उत्तर?? सांग ना नीट"
"अर्रे!!! बरं तू सांग...तुला कुठे आवडेल??"
"मला काय... HM साठी कुठलंहि ठिकाण चालेल. तू मिठीत असलीस कि अजून काय हवं?"

हे असं काहि प्रसन्न बोलला कि केतकी लाजून चूर व्हायची.

----------------------------------------------------------------------------------------

"उद्यापासून भेटायचं नाही आपण?" प्रसन्न वैतागून विचारत होता.
"हो. उद्या घरी मुहूर्तमेढ उभी करणार. खूप पाहुणे असतील. परत मेंदि वगैरे...."
"निदान मेंदि दाखवायला तरी भेट कि......"
"ए, मेंदि रंगेल ना माझी? कि नाही?"
"आता हे मला कसं माहित असेल?"
"माठ्या, नवयाचं प्रेम असेल तर मेंदि रंगते असं म्हणतात"
"आईशप्पथ, कसल्या बावळट असता ग तुम्ही मुली. इथे मी प्रत्यक्ष भेटून प्रेमाचे पुरावे द्यायला तयार आहे ते नकोय पण मेंदिवर विश्वास.... जिथे माझं प्रेम तुला कळत नाही ते मेंदिला काय कळेल??"
"चिडू नको ना!!! सहाच तर दिवस आहेत. मग असेनच ना मी."
"हो.... या सगळ्याचा बदला घेणार आहे मी. आत्ता जमेल तितकि झोपून घे. मग कधी पूर्ण रात्र झोप मिळेल असण नाही."

----------------------------------------------------------------------------------------
काल लग्नाच्या दिवशीचे पण सगळे चोरटे सुखकर स्पर्श केतकीला आठवत होते. सप्तपदीच्या वेळी खांद्यावर ठेवलेला हात, मंगळसूत्र घालताना त्याने हळूच मारलेली फुंकर!!! अगदी आज सकाळी पूजेच्या आधी आसपास कोणी नाही हे बघून हळूच ओढलेला गाल. आठवणीने च शहारा आला केतकीच्या अंगावर.
डोळे उघडून तिने घड्याळ बघितले. अर्धा तास झाला.... अजून कसा नाही आला हा?

इतक्यात बेल वाजली. प्रसन्नच होता.... तिला त्या गाऊन मध्ये बघून जाम खूष होता. दारातूनच त्याने तिला एक flying kiss दिली.

"आवडला??" च्प्पल काढत त्याने विचारलं.
बाईसाहेब बेडरूम पर्य़ंत पोचल्या होत्या.

"केतू, वाट बघत होतीस माझी??" तिच्या खांद्यांवर हात ठेवून तिच्याकडे रोहून बघत प्रसन्न विचारत होता.
"तू change करून ये" दुसरं काहितरी बोलायचं म्हणून ती म्हणाली.
"सांग ना....वाट बघत होतीस माझी??" तिच्या केसाचा fixer काढत तो म्हणाला.
तिचे छान मोकळे केस अलगद मानेवर, पाठीवर पसरले.
"जा आधी तू change करून ये"
"कशाला?? थोड्यावेळाने होणारच आहे कि...change!!!!"
त्याच्या या एकाच वाक्याने केतकीची धडधड इतकि वाढली कि लाजून काहिहि न बोलता ती मागे वळून चालू लागली. प्रसन्नने तिचा हात मागच्या मागेच धरला. सोडवून घ्यायचा प्रयत्नहि न करता ती जागीच उभी राहिली.. तसं प्रसन्न ने तिला जवळ ओढली.
पाठमोया तिला सरळ करत म्हणाला "आत्तापासूनच लाजतेस?? कसं व्हायचं देवा माझं"
"परवापासून नुसतं डोळ्यानीच बघतोय.... नऊवारीतील माझी केतू, पैठणी नसलेली केतू...आत्ता माझ्यासमोर हे असे मोकळे केस, अशी लाजरी हसरी केतू. सगळयाच वेळी छान दिसतेस ग. केतू, केतू...... I love u. मला दूर नको ठेवूस."
"ए, माझी मेंदि रंगली आहे. बघ..." हात पुढे करत केतेकी म्हणाली.
"त्या मेंदिपेक्षा चेहयावरची लाली बघ. जास्त सुंदर आहे"
हे ऐकूताच केतकीचे डोळे आपोआप मिटले गेले.
प्रसन्नने तिच्या जवळ जाऊन कपाळावर ओठ टेकले.
इतक्यात केतकी...
"अ...आऊच...."
"काय ग...काय झालं? केतू, डोळ्यात पाणी आहे तुझ्या.....काय झालं"
"काहि नाही. तुझा पाय जोरात लागला माझ्या बोटाला. विरोली मुळे दुखतय ते आधीच. एकदम कळ आली रे."
"काय?? बघू मला. आधी बोलायचं नाहीस का??"
प्रसन्न ने तिला बेडवर बसवलं.
"बघू कुठे ते...."
"अरे इतकं नाहिये बाबा. एकदम धक्क लागला नि कळ आली इतकंच"
"केतू, अग रुतली आहे विरोली बोटात. सुजलय बोट. कसं सहन केलंस?? सांगायचस ना सकाळीच. श्या आता घरात कापूस पण नाही."
हळूहळू अलगदपणे प्रसन्न ने दोन्हि पायातून विरोली काढली. "कशाला ग घालता असलं काहितरी तुम्ही बायका??"
"लग्न दु:खदायक असतं हे कळावं बाईला म्हणून" केतकी अगदी सहज बोलून गेली. पण क्षणात तिला चूक लक्षात आली.
प्रसन्न ने नुसतंच बघितलं तिच्याकडे. shaving kit मधलं antiseptic क्रिम आणून, जखमेवर लावत तो म्हणाला
"असेल दु:खदायक, तरी मी आहे ना.... जखमांवर मलम लावायला, फुंकर घालायला. इतका विश्वास तर आहे ना?"
पायावर मलम लावणारा त्याचा हात हातात घेऊन केतकी म्हणाली "तो विश्वास आहे...नक्किच!!!"
हात काढून घेऊन तो ते क्रिम ठेवून आला.

"प्रसन्न, Sorry....."
हा शांत एकदम. आजच्या या क्षणांची तो किती वाट बघत होता हे तिला माहित होतं. एकतर नेमकं आजच तिला पायाने त्रास द्यावा....खूप अपराधी वाटत होतं तिला.
"बोल ना रे.... sorry म्हणाले ना!!!" त्याचा खांद्यावर डोकं टेकवीत ती म्हणाली.
"केतू, sorry कशासाठी?"
"माझ्यामुळे तुझा मूड spoil झाला.....पण मला ते दुखत नाहिये जास्त. खरंच."
"ओह....असं काहि नाहिये गं. अगं आजच्या क्षणांची प्रत्येकच जण वाट बघत असतो ना!!! तुझ्यासारखी बायको असेल तर कोण वेडा होणार नाही?" तिच्या मांडिवर त्याने डोकं ठेवलं.
"पण म्हणून काय मी फक्त माझाच विचार करेन का ग? जे क्षण मला हवे आहेत ते जर तुला वेदना देत असतील तर मला त्रासच होईल. हे सुख, हा सहवास दोघांनी मिळून घ्यायचा... तुला नको असेल किंवा त्रास होत असेल तरी मी मला हवं तेच कराण्याइतका वाईट नाहिये ग मी"
केतकी मंद हसत होती. प्रसन्नचा हा गुण तिला पहिल्यांदाच दिसत होता. चेष्टेखोर, romantic प्रसन्न इतका समजूतदार, परिपक्व पण होता.
नंतर बराच वेळ ते दोघे गप्पा मारत होते. प्रसन्न तिच्या केसांशी मनसोक्त खेळत होता. तिच्या चेहयावरून बोट फिरवताना, मांडिवर डोकं ठेवून तिच्या डोळ्यात बघताना होणारे तिच्या चेहयावरचे बदल टिपत होता. बोलता बोलता केतकीला कधी झोप लागली कळलंच नाही.

कसल्यातरी आवजाने दचकून केतकी जागी झाली. घड्याळाचा गजर होत होता. प्रसन्नचा हात तिच्या गळ्याभोवती होता, तिला पटकन ऊठताहि येईना. हळूच त्याचा हात बाजूला करत ती उठली. खिडकिच्या पदद्यामागे घड्याळ होतं. गजर बंद केला. बघते तर काय रात्रीचे ३.१५ च वाजले होते. बेडरूम डेकोरेट करताना कोणीतरी हा मध्यरात्रीचा गजर लावण्याचा चावटपणा केला होता. बेडवर झोपलेल्या प्रसन्न कडे तिने बघितलं. छान शांत झोपला होता. तिला झोप लागल्यावर कधी जाऊन तो change करून आला, कधी झोपला काहि कळलंच नाही. केतकी चा पायाचा ठणका थांबला होता.

तशीच किती वेळ तरी ती त्याच्याकडे निरखून बघत होती. शेवटी झोपताना प्रसन्नच्या ओठांवर तिने अलगद ओठ टेकवले. तिच्या केसांमुळे त्याच्या चेहरा पूर्ण झाकला गेला. गजर झाल्यापसून इतका वेळ झोपेचं सोंग घेतलेला प्रसन्न याच क्षणाची वाट बघत होता. केतकीला काहि कळायच्या आत त्याने तिला इतक्या जोरात जवळ घेतलं....

"आआअह........" केतकी
या आवाजाने मिठी सैल करत प्रसन्न "अजून दुखतय?? sorry..."
केतकीला हसूच आवरत नव्हतं..... प्रसन्न कळायचं ते कळून चुकला.....
"मला फसवतेस काय.... थांब आता....सोडतो का बघ....." प्रसन्न तिला अजून जवळ घेत म्हणाला
..................
..............................................
................................
............

त्यानंतर ते दोघे नुसते स्पर्शानेच बोलत होते.
प्रसन्न मात्र मनात ३.१५ ला गजर लावणाया मित्राचे आभार मानत होता.

(समाप्त.)
(हे सगळं पूर्ण काल्पनिक आहे. याचे कोणाशी, कोणाच्या जीवनाशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
पूर्णपणे काल्पनिक लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घेणे. काहि सूचना असल्यास नक्कि सांगा.)

Wednesday, March 07, 2007

८ मार्च...महिलादिन!!!

काल रात्री साधारण ११.३० ला झोपले. अजून पूर्ण झोप लागायची होती..इतक्यात ऑफिस मधल्या एका मैत्रिणीचा SMS आला. "Happy Womens Day!!!" घड्याळ बघितलं तर १२ वाजून गेले होते. तिला "same 2 u" टाकून झोपले. पण झोप लागली नाही. डोक्यात विचारचक्र सुरू झालं.
आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच आज महिलांचा गौरव, गुणगान, स्तुती केली जाणार. पेपर, टीव्ही सगळीकडे आज महिलांसाठी काहि खास असेल. त्यातले कित्येक जण आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कशी आहे, स्वत:ला कशी सिद्ध करते वगैरे बोलतील. पण हे कितपत खरं आहे?? वस्तुस्थिती काय आहे हे जास्त महत्त्वाचं.
स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा आजची स्त्री नक्किच अधिक स्वावलंबी, कणखर आहे. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे पूर्ण होतील. इतक्या मोठ्या काळात देशातील किती स्त्रिया महत्त्वाची पदे (आरक्षणाशिवाय) मिळवू शकल्या?? सक्रिय राजकारण ते अगदी रोजच्या जीवनातला दूधाचा व्यवसाय... कशाचाहि विचार करूयात.
एक महिला पंतप्रधान - स्व. इंदिरा गांधी, एक तडफदार पोलीस अधिकारी - किरण बेदी (इतरही काहि आहेत पण केलेले काम लक्षात घेता एकच नाव पुढे येते), एक top executive - इंद्रा नूयी, एक पत्रकार - बरखा दत्त, एक पी. टी. उषा, सानिया मिर्झा, अंजू बेबी जॉर्ज, कुंजरानी देवी. संगीत हा भारतीय सिनेमाचा आत्मा!! त्यातही किती कमी क्षेत्रात महिला आहेत. उषा खन्ना सोडून एक संगीत दिग्दर्शिका नाही. कॅमेरा, editing, script writting, lyrics इ. अनेक क्षेत्रात नाहीच आम्ही. महिलांवर होणाया अन्यायावर बोलायला १०० महिला जमतील पण किती जणी न्यायाधीश, सरन्यायाधीश होत्या/ आहेत?? Finance हा कुठल्याही व्यवसायाचा कणा.... किती महिला आज मोठ्या कंपनीच्या CFO आहेत?? राजकारण जे देशाची स्थिती बदलू शकते त्यात आमचा सहभाग किती? अर्थमंत्री, गृहमंत्री अगदी लोकासभा प्रवक्ती म्हणून कोण आहे?? दैनंदिन जीवनात आज media ला असाधारण महत्त्व आहे...तिथे किती महिला आहेत? वृत्तनिवेदिका, talk show वाल्या 'य' आहेत, पण न्यूज एडिटिंग सारख्या जागी किती??
सुंदर दिसावं हि कुठल्याहि स्त्रीची उपजत इच्छा असते... पण या बाह्यसौंदर्याचं महत्त्व आम्हीच नाही ना वाढवून ठेवलं? क्रिकेट सारख्या खेळावर चर्चेसाठी भिल्लांसारख्या कपड्यांची गरज असते??? शरीराचा जो भाग दिसू नये म्हणून कपडे घालावे तोच कपडे घालून उघडा पाड्ण्यात कसली महानता, कसलं स्त्रीत्व??? बड्या पार्टीज ना पुरूष मारे सूट-बूट घालून येतील आणि बायका खांदे उघडे, पाय उघडे असलं काहि घालून येतील. शरीरसंपत्तीचे भांडवल करायची इतकि सवय जडलिये कि त्याची अनावश्यकता, उथळता च दिसत नाही आम्हाला.
Fashion designing, tailoring, jwellery designing या सगळ्याच क्षेत्रात पुरुष जास्त पुढे आहे. साधी गोष्ट घ्या, पुण्यासारख्या शहरात उत्तम ब्लाऊज शिवणारे बहुसंख्य लोक हे पुरूष आहेत. पाककला हे तर पूर्वापार चालत आलेलं महिलाप्रधान क्षेत्र पण नावाजलेले, आघाडिचे सर्व शेफ पुरूष आहेत!!!
आपल्या सूनेला आपला मुलगा घरकामात मदत करतो याचा त्रास सासूला होतो कि सासयांना?? गृहिणी असणाया महिलेचा अनादर अनेकदा इतर महिलाच करताना दिसतात. दोन बायका एकत्र काम करत असतील तर त्यांचे पटणे हे खूप अवघड असते यावर क्वचितच दुमत असेल. माझा स्वत:चा अनुभव आहे कि एक पुरूष manager ज्या पद्धतीने महिला sub-ordinates, collegues ना वागणूक देतो ती एका महिला manager पेक्षा नक्किच चांगली असते. एक स्त्रीच स्त्री ला समजून घेत नसेल, अनाठायी ईर्षा, दु:स्वास करत असेल तर या महिलादिना चा काय उपयोग आहे?
शारिरीक भेद, क्षमता हे निसर्गदत्त आहे. ज्याप्रमाणात पुरूष शारिरीक शक्ती च्या जोरावर काहि ठिकाणी पुढे जाउ शकतील ते स्त्री साठी कठिण असेल. कारण लिंगभेद हा शेवटी शरीररचनेमुळे आहे, बुध्दी, वैचारिक शक्ती यावर ते अवलंबून नाही. स्त्रियांना असणारे भय, असुरक्षितता ही पण आकलनीय बाब आहे. (याबद्दल बोलण्या-लिहिण्याजोगे बरंच आहे, पण त्याबद्दल नंतर कधीतरी..) पण हे सगळे असूनहि आम्ही बौद्धीक आघाडीवर खूप मागे आहोत.
समानतेची बात करताना आम्हाला आरक्षण, अर्थव्यवस्थेत वेगळी तरतूद का लागते? (Tax exemption limit) जातीयवाद जितका धोक्याचा तितकाच हा भेद धोक्याचा नाही का?
समाज कुठल्याहि चांगल्या गोष्टीचे स्वागत, कौतुक करतो. सचिन ला कधीच ओरडून सांगावं लागलं नाही कि तो उत्तम क्रिकेटपटू आहे. लता मंगेशकर तुमच्या मागे लागली नव्हती कि माझी गाणी डोक्यावर घ्या. मनिष मल्होत्रा चा dress sense त्याच्या कामातून दिसून आलाच. २ वर्षापूर्वीपर्यंत चेष्टेचा विषय असलेले लालू प्रसाद यांच्या रेल्वे बजेट ची याच लोकांनी वाहवा केली. मुद्दा हा कि चांगल्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. त्याचे कौतुक करताना लोक मग अशा अमूक दिवसाची वाट बघत नाहीत. महिला पुढे असतील, स्वतंत्र असतील तर समाजाची मान्यता मिळणारच आहे... त्यासाठी आजच्या दिवशी आम्हीच आमचा सत्कार करून घ्यायची गरज नाही. जे साध्य झालंय तो मॅचचा पहिला बॉल आहे, अजून पूर्ण ५० षटकं खेळायची आहेत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन कसे चालेल?