Friday, April 16, 2010

माझी झेन राणी

"हा घे पेढा!!" पेढ्याचा बॉक्स पुढे धरत ती म्हणाली.
"काय? कसला?" एरवी एका ऑफिसमधे असून पण आमचं फारसं बोलणं व्हायचंच नाही.
"कार घेतली मी." तिच्या चेहर्यावर एक मस्त आनंद आणि अभिमान.
मलाच ते खूप आवडलं होतं, माझ्यापेक्षा एखाद दोन वर्षाने मोठ्या असलेल्या तिने स्वत: गाडी घेतली होती!! वा!!! तेव्हाच ठरवलं, स्नेहल बाई हा आनंद तुम्हाला हवा असेल तर आधी गाडी शिका. एरवी दादा सतत म्हणायचाच कि शिकून घे गाडी, पण मलाच भीती वाटायची. वाटायचं बाईक चं कसं काही झालं की पाय टेकता तरी येतात. कार मधे तो पण स्कोप
नाही, कसं जमणार आपल्याला? बाईक म्हणजे कसं on-field वाटतं, सगळं आपल्या control मधे आहे असं. या कार मधे काचेपलिकडून असं ते काय जमणार?

त्याच आठवड्यात driving school मध्ये नाव देऊन आले, तरी जमेल कि नाही अशी धाकधूक मनात होतीच. पण आमचे नांगरे मास्तर एकदम मस्त होते, पहिल्याच दिवशी म्हणाले "गाडी शिकणं म्हणजे काही अवघड नाही. हे A, B, C, D लक्षात ठेवा कि झालं A = Accelerator, B = Brake, C = Clutch, D = Driver. गाडीत हे इतकं सांभाळलंत कि सगळं आलं म्हणून समजा". तरी पण यायचं ते टेन्शन आलंच होतं. यू टर्न शिकताना फुटलेला घाम अजून आठवतो. L-shape reverse, half clutch, night driving मास्तर एक एक शिकवायचे. चुकलं तरी मजेशीर च बोलायचे. एक दिवस म्हणे "गाडीचा क्लच खराब झालाय का?" मी चमकून बघितलं तसे म्हणतात "नाही, तुम्ही दाबत च नाही म्हणून म्हणलं" मग एक दिवस म्हणे, " अहो ते स्टीअरींग अलगद धरा, इतकं घट्ट धरायला ती काय तलवार आहे का?" :) नांगरे अगदी नावाप्रमाणे डोक्याची नांगरणी च करायचे. करत करत एक महिना झाला आणि RTP Inspector ने मज गोंधळलेल्या नवशीक चालकाला एकदाचा परवाना (कसा काय कोण जाणे?) दिला. विनाशकाले विपरीत बुद्धी!
दुसरं काय :)

गाडी शिकले तरी दादाची गाडी फारशी चालवायचं धाडस नव्हतं. कुठे ठोकूच आपण याचा कोण विश्वास मला!! गाडी शिकून ३ वर्ष झाली आणि मी सगळं मिळून ३०० कि.मी पण गाडी चालवली नव्हती. मग अचानक आठवला पेढा देतानाचा तिचा तो चेहरा, त्यावरचा तो अभिमान आणि मग ठरवलं कि आता आपणही घेऊ गाडी. घरी सांगितल्यावर पहिला प्रश्न "चालवणार आहेस का? ठेवायची असेल तर नको घेऊस" मी अगदी मोठा "होssssssss" म्हणून मोकळी. मग बर्याच गाड्या बघितल्या. Alto, Wagon R, Zen Estilo, Spark, Indica, Santro. लहान मुलाला दुकानात नेल्यावर जसं सगळीच खेळणी आवडतात तसं काहीसं सुरुवातीला माझं झालं. पण मग Alto जरा बेसिक आहे, Wagon R एकदम manly आहे, Spark चे interiors खास नाहीत, Indica म्हणजे cab वाटते आणि Santro घरी आहेच असं elimination theory वापरत सगळ्या निकालात काढल्या आणि Zen Estilo घ्यायची ठरली.

कलर, variant, कुठल्या banke चं लोन वगैरे ठरलं आणि गाडी बुक केली. ८ मार्च (महिला दिन!!!) ला घ्यायची असं पण ठरलं. आकाशातल्या देवाचं अधून मधून माझ्याकडे लक्ष जातं तसं यावेळी गेलं आणि त्याने देशाच्या अर्थसंकल्पात चारचाकी वाहनांच्या किंमती कमी केल्या!!! किंमत चांगली १३-१५ हजार ने कमी झाली.. मी लगेच डीलर ला फोन केला आणि गाडी नंतर दिलीत तरी चालेल पण नवीन कमी झालेल्या किंमतीनेच द्या असं सांगितलं. महिला दिनाचा मुहूर्त अशा रितीने चुकला. मग गाडी १६ मार्च २००८ या दिवशी आली. माझ्यापेक्षा हि जास्त आनंद आई-बाबा, दादा-वहिनींना झाला होता. गाडी ठोकायची माझी भीती अजून कायम होती म्हणून शो-रूम पासून दादानेच ती चालवत आणली. बाबांनी एकदम झकास पूजा केली आणि मी पहिल्यांदा त्या माझ्या गाडीचं स्टीअरींग हातात घेतलं. १-२ कि.मी च्या त्या फेर्यात मी साधा तिसरा पण गीअर टाकला नव्हता! आता हसू येतं :) पण तेव्हा अगदी फाटायचीच...

मी गाडी चालवावी ही माझ्याहून तीव्र इच्छा आई-बाबांची होती. मग रोज रात्री जेवण झालं कि ते माझ्याबरोबर गाडीतून चक्कर मारायला यायचे. रोज वेगळ्या रस्त्यावर गाडी घे असं सांगायचे. कितीदा भर रस्त्यात गाडी बंद पडली तरी चिडायचे नाहीत. सुरूवातीला ऑफिसला येताना पण २-३ वेळा दादा सोबत असायचाच. तो थोडा चिडका आहे पण यावेळी सांभाळून घ्यायचा. कदाचित मी गाडी चालवतेय याची त्याला पण तितकीच भीती वाटत असावी!! सुरुवातीचे सहा महिने अगदी जेमतेमच चालवली गाडी, हळूहळू आत्मविश्वास(!!!) वाढत गेला आणि म्हणून मग गाडी चालवणं पण. तरी रोज ऑफिसला गाडी नव्हतेच आणत. ऑफिसची बस होतीच. आणि कोथरूड ते विमान नगर असं पुणे दर्शन नकोच वाटायचं कार ने. एकदा एक मित्र म्हणाला पण "त्या गाडीची काय श्रावणी शुक्रवारी पूजा वगैरे तरी करतेस कि नाही. चालवणं तर राहूच दे" :) इतकं चिडवून घेत होते मी!!!

त्या आकाशातल्या देवाचं परत एकदा माझ्याकडे लक्ष गेलं आणि यावेळी त्याने ऑफिसची बस बंद केली. आता माझ्याकडे पर्याय नव्हता! तसंही कामामुळे मी आता आठवड्यातून १-२ वेळा कार आणत होते पण बस नाही त्यामुळे ते आता सक्तीचं झालं. बघता बघता बाइक इतकीच कार सवयीची झाली. कुठूनही कुठेहि घुअसवता येऊ लागली. गर्दीत घुसणार्याला दाबायला(हे टिपिकल driver जातीतलं बोलणं) जमलं. पार्कींग सोयीचं वाटू लागलं. गाडी चालवणं यातलं दडपण गळून पडलं आणि मी ते enjoy करू लागले. १.५ वर्षात फक्त ४००० कि.मी धावलेल्या गाडीने म्हणूनच आज २५ महिने पूर्ण झालेल्या दिवशी १०००० कि. मी चा टप्पा गाठला!

या १०,००० मधे बरेच मजेशीर प्रसंग आले. जुन्या बाजारात रात्री ८ वाजता पोलिसासमोर बंद पडलेली गाडी, भर पावसाळ्यात तेव्हा फुटलेला तो घाम! एक बाईक वाला स्किड होऊन माझ्याच झेन ला चाटून, एक मोठा ओरखडा आणून गेला तेव्हाचा राग! एक दिवस रात्री घरी येताना battery drain होऊन सुरुच न झालेली गाडी आणि बरोबर एक मित्र होता
म्हणून त्यावेळी आलेला तो धीर! आपल्या महान महानगरपालिके ने माझ्या नेहमीच्या रस्त्यात अचानक खणून ठेवलेला एक खड्डा आणि त्यात मी नेम धरून घातलेली गाडी! मस्त चिखलाने माखली होती बिचारी, जवळचा एक security guard आणि अजून २-३ लोकांनी मदत केली म्हणून बरं! ऑफिसमध्येच एकदा टायर पंक्चर झालं आणि मग BPO
cab च्य driver ने ५ मिनिटात चाक बदलून दिलं, परत वळूनही न बघता, एक पैशाची अपेक्षा न करता!!! PUC करता गाडी चालू ठेऊन मी मस्त खाली उतरले आणि किल्ली आत, गाडी lock झाली. एक फोन केला आणि बाबा बिचारे duplicate किल्ली घेऊन रिक्षेने १० कि.मी. आले. असा बराच दंगा केला मी गाडी चालवताना :) म्हणा त्यात
नवीन काय! वो तो अपुन का style है!!! पण या सगळ्यातून दर वेळी नवीन शिकत गेले. मजा येत गेली. माझ्या मुलीकडे स्वत:ची कार आहे आणि ती छान चालवते, मला घेउन जाते असं आई जेव्हा कोणाला सांगते ना तेव्हा मनाला जे समाधान मिळतं ते फार सुंदर, मन शांत करणारं आहे.

गाडीचं loan पण आता संपलं आहे, आजच RTO मधून नवीन RC पण घेऊन आलेय. झेन राणी आता पूर्णपणे माझी आहे. गाणी हा आमच्या दोघींचा हळवा छंद आहे. गाणी लावली कि ती आणि माझं मन मस्त भरधाव सुटतं. नशीब तिला ब्रेक आहेत, मनाला तर ते पण नाहीत! :) झेन राणी कितीही वर्षाची झाली तरी मला कायमच आवडेल.. पहिल्या गोष्टींच आणि आपलं नातं च असं खूप जवळीकीचं असतं ना!!!

14 comments:

संगमनाथ खराडे said...

खूप आवडला हा पोस्ट...
मी ही उद्या पासून गाडी शिकायला सुरूवात करणार आहे, तुमचा अनुभव वाचून एक अनामिक हुरूप आला...:)

Vibhavari said...

Ekdam chhan zaliy post .

Pahili gadi haa kharach mast experience asto :)

Unknown said...

wa.. mastay zen rani!
ani itkya diwasanni post pahun anand zala!! :)

Anonymous said...

वा तुमचे अनुभव ऐकून म्हणजे वाचून मला पण गाडी शिकण्याची खूप इच्छा होते आहे. पण मला तर अजून 2 wheeler सुद्धा येत नाही अस म्हणून मला कोणी ओरडले तर मी म्हणते जाऊ दे माझा जन्मच मुळी 4 wheeler चालवण्यासाठी झाला असावा. असो छान आहे पोस्ट. इतरही पोस्ट खूप छान आहे.

S. Santosh said...

chhan,masta masta masta......
maza blog hi vachat ja

santy-right-write.blogspot.com

शैलेश देवस्थळी said...

shehal

chan lihites pan phar velane lihites..

asech likhan chalu thev..

Monsieur K said...

jabri!
congrats!! :)
25 mahinyaat 10,000km - aata pudhchyaa 12 mahinyaat 20,000km sampvun taak! ;-)

SACHIN PATHADE said...

Snehal...bhari aahe post... awadal :) Zenrani sathi congrats n it must be really proud feeling for ur family when u got that!

Bt trust me, girls can drive 4 wheeler better than 2 wheelers... "वाटायचं बाईक चं कसं काही झालं की पाय टेकता तरी येतात. " this is called as landing gears n we guys always have to keep watch on it instead of break light while driving behind girls :)

प्रभाकर कुळकर्णी said...

पोस्ट फारच मस्त आहे . स्टोरीला फार जास्त स्पीड आहे . एक गोष्ट खटकली. "१-२ कि.मी च्या त्या फेर्यात मी साधा तिसरा पण गीअर टाकला नव्हता! आता हसू येतं :) पण तेव्हा अगदी फाटायचीच..." यातल्या शेवटच्या शब्दाचा तुम्हाला काय अर्थ सांगायचा आहे . आमच्या भाषेत फ़ाटायचीच चा अर्थ वल्गर होतो . मह्नुन विचारतो की पुनेरी मुलींच्या उघड लिखाणातुन फाटायचीच चा अर्थ काय फाटायचीच . or else u change the word. otherwise it is likeli that in comments u can be asked " आताही फातते की बंद झाली?"

Kemo said...

Hi Snehal..mast ekdam... aani naveen gadi baddal abhinandan :)
gaditun firayala kadhi netes bol.. :)

Nitin C said...

Snehal - layee bari bug "tuzi Zen rani"...avadla mala, aga US maday khup boor zala ani manat vichar aala ki barach divas zalay Snehal cha Blog la visit nahi kayli - tula tar mahit cha aaha me kasa busy hoto tay...e-ahahha aaso..tu khup chan layeetays..

Nitin C said...

Snehal - layee bari bug "tuzi Zen rani"...avadla mala, aga US maday khup boor zala ani manat vichar aala ki barach divas zalay Snehal cha Blog la visit nahi kayli - tula tar mahit cha aaha me kasa busy hoto tay...e-ahahha aaso..tu khup chan layeetays..

Sachin Chavan said...

mastch ...khare tar navin gadi shikatana saglyanhi hich awastha hote...suruwatila mazya hatane gadi ekda lokmanya nagacya chokat band padali hoti mag kay....sinhgad ratya war partek 100 meters war gadi thmabwa ani parat 1'st gear madhe chlawa...ase kelya war amchi bhiti meli.. ajun dekhil gadi half clutch madhe chawayachi asel tar gham phutato...so keep it up...

Unknown said...

Chan lihaly.