Monday, February 19, 2007

अमृततुल्य!!!

तशी मी काहि चहाभक्त (किंवा चहाटळ!!! ) नाही... पण दिवसातून दोन वेळा, सकाळी-दुपारी, चहा पिते. त्यातूनहि उगाच कुठलाहि, कसलाहि चहा नाहिच चालत बुवा...चहा कसा हवा अमृतासारखा!!! आणि घर सोडून असा चहा मिळण्याचे ठिकाण म्हणजे खास पुण्यातील काहि अमृततुल्ये. पुणेकरांची एक खासियत आहे... एकदा एखादि गोष्ट कुठे चांगली मिळते म्हणलं कि आम्ही लावलीच तिथे रांग. उदाहरणार्थ - चितळे बंधू मिठाई वाले, श्री/ बेडेकर मिसळ, हॉटेल वैशाली, हिंदुस्थान बेकरी चे पॅटिस इ. कुठल्याहि पक्क्या पुणेकराला या स्थळांचं आणि तिथल्या चवीचं, वासाचं एक अनाम आकर्षण असतं.
असंच अजून एक ठिकाण म्हणजे हि अमृततुल्य... इथला चहा न पिलेला पुणेकर म्हणवून घ्यायला शोभत नाही. पूर्वीपासून जिथे मराठी लोकांची वर्दळ असते अशा सगळ्या भागात हि अमृततुल्ये आहेत. नाव हे बहुतेक वेळा xxxxxx अ+इश्वर भुवन असं काहिसं. (जबरेश्वर भुवन वगैरे). क्वचित कधी त्रिवेणी, तुलसी अशी जरा हटके नाव असेल. पण नावात काय आहे?? नाव काहिहि असो..साधारण रंगरूप ठरलेली. एक दहा बाय दहा ते दहा बाय पंधरा घन चौरसाची जागा, त्यात साधारण ३ ते ४ ऍल्युमिनियम चे पत्रे लावलेले टेबल्स आणि बसायला लाकडी बाक. चहा करणारा दुकानाच्या एकदम दाराशी उभा, त्याच्या मागे गणपती/ मारूती/ साईबाबा असा एक फोटो, एका मोठ्या पातेल्यात चहा चे आधण ठेवलेले, त्याहून लहान पातेल्यात जवळच दूध. बसल्या जागी हाताला येईल अशा बेताने ठेवलेले चहा पावडर, साखर आणि वेलदोडा पावडर चे डबे. चहा गाळण्यासाठी एक मऊ पंचा किंवा मोठे गाळणे, ऍल्युमिनियमची चहाची किटली (याला चहाचे किमान २-३ तरी ओघळ पाहिजेतच).
तीन इंच उंचीचे जाड काचेचे पेले किंवा दोन इंच उंचीचे पांढरे कप नि बशी. रस्त्यावरून सहज दिसतील अशा पद्धतीने ३-४ बरण्या...त्यात बटर, नानकटाई, क्रिमरोल इ. गोष्टी. कुठल्याहि अमृततुल्यामध्ये यात फारसा फरक दिसणार नाही. एक कप चहाचा दर पण जवळ जवळ सारखाच... फ़क्कड चहा चा मात्र दर वेगळा!!! आता हे फक्कड चहा म्हणजे काय तर स्पेशल चहा हो... दूध जरा जास्त, वेलची थोडी हात सोडून...असा customised चहा. फक्कड हा खास अमृततुल्य वाल्यांचा शब्द :)
सकाळी सातला सुरू होणारी हि दुकाने दिवसभर चालू असतात... यांना ना दुपारची जेवणाची सुट्टी ना आराम (पुण्यातली इतर बहुतेक सर्व दुकाने दुपारी १ ते ४ बंद असतात हे जगविख्यात आहेच). सकाळी पहिला चहा करून अर्धा अर्धा कप दुकानाच्या दोन दिशेला ओतून हे दिवसाची सुरूवात करणार!!! चहाच्या प्रत्येक घाण्याची हातावर एक थेंब घेऊन चव बघायची आणि मग च त्यात दूध घालायचे हा रिवाज.... कित्येक पिढ्या असा चहा करत असतील नी कित्येक त्याचा आस्वाद घेत असतील. भर गर्दीच्या रस्त्यांवर, आता जिथे महागडी आणि विदेशी कॉफी शॉप्स आहेत तिथेहि... गरीबाची, एका अस्सल चहाबाजाची तल्लफ पुरी करायला हि अमृततुल्ये आहेत. धो धो पावसात किंवा डोकेदुखीच्या वेळी तुम्हाला ती ७० रुपयाची कडू कॉफी आठवते कि चहा?? रस्त्यात दोन जुने मित्र भेटल्यावर ते "चल, एक एक चहा मारू" म्हणतील कि कॉफी??
मी या अमृततुल्य वाल्यांची ऋणी आहे... कॉलेज मधले इतक्या सुंदर दिवसांच्या आठवणी आहेत यात. दिवसभर कंटाळून दुपारी चार वाजता एक चहा पिऊन practical ला जायचं.. ग्रुप मधली कुठलीहि पैज या चहावर संपायची.... सायकलच्या हवेसाठी चे पैसे हवा भरावी लागली नाहि कि चहा आणि क्रिमरोल पार्टी करायची :)
नंतर नोकरी सुरू झाल्यावर इराण्याचा चहा अनेकदा पिला... तो पण चहा असतो छान पण अमृततुल्य ला पर्याय नाही..
काल च्या TOI मध्ये एक बातमी वाचली(इंटरनेट वर ही बातमी सापडली नाही), अमृततुल्य वाल्यांचा धंदा लक्षणीय कमी झाला आहे.. वाढती महागाई, तरूण पिढीची बदललेली चव या सगळ्याचा त्यावर परिणाम झाला आहे. ते वाचलं आणि सगळ्या आठवणी दाटून आल्या..
देव करो नि हि अमृततुल्ये अशीच चालू राहोत.... बाजारात नवीन काहि येताना जुन्या गोष्टींचा बळी गेलाच (दिलाच) पाहिजे का??

Friday, February 09, 2007

ऐसा मित्र शिरोमणी

तो आणि मी...आमची मैत्री १२ वर्षांपूर्वीची!!!

अगदी पहिल्याच दिवशी मला कॉलेज मध्ये पोचायला उशीर झाला होता... वर्गात पोचले तर तास आधीच सुरू झाला होता... मी excuse me म्हणून आत शिरले... अगदी त्या क्षणाला मला दिसलेला तो हाच!!! सहा फूट दोन इंच उंची, शांत चेहरा...

नंतर कॉलेज रूटिन चालू झालं.. stats practical ला तो आणि मी एकाच बॅच ला आलो. सकाळी ७ ला practical असायचं, तर हा पठ्ठ्या त्या आधी १० मिनिटे येउन उभा असायचा!!! कॉलेज सुरू होऊन सहा महिने उलटून गेले तरी आम्ही कधीच बोललो हि नव्हतो... तशी ओळख झाली ती पहिल्या ट्रिपला...आणि बघता बघता आज १२ वर्ष हौउन गेली :)

खरं तर आमच्यात खूप कमी साम्य आहे...जवळ जवळ नाहीच म्हणलं तरी चालेल. दिसण्यापासून, खाण्यापासून ते अभ्यास, खेळ सगळंच वेगळं आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की इतके फ़रक असताना तो माझा इतका जवळचा मित्र कसा झाला?? ज्या गोष्टी मी जितक्या सहजपणे याच्याशी बोलू शकते, शकले...जितक्या शांतपणे हा माणूस ऐकतो तसं इतर कोणीच मला भेटलं नाही. म्हणजे ऐकताना फ़ाटे फ़ोडणे, सल्ले देणे हे असं करणारे बरेच आहेत... पण नुसतं ऐकणारा असा हाच!!! (त्याच्या या निर्विकार ऐकण्याच्या स्वभावाचाच त्याच्या बायकोला आता त्रास होते!!!) मध्यंतरी माझ्या आयुष्यात जरा वादळ उठलं होतं, मी एकटी पड्ले होते... पण तरीहि याने साथ सोडली नव्हती. माझ्या नकारत्मक, सकारात्मक सगळ्या आयुष्याचा हा सा़क्षीदार.... आज मी जेव्हा म्हणते कि मी चुकले होते का रे तेव्हा? तर तो नेहमी म्हणतो... "ज्या वेळेस तू तशी वागलीस तेव्हा तुला ते चूक वाटत होतं का?? नाही ना!!! मग? प्रत्येक वेळेची, वयाची विचारांची काहि गणितं असतात... मोठे झाल्यावर ती गणितं चुकिची वाटत असतीलहि पण म्हणून त्या त्या वेळेला तसं च बरोबर वाटतं"... असा धीर दिला कि इतकि उभारी येते.

आमच्याच ग्रुप मधल्या एक मुलगी त्याला आवडू लागली... होकाराची खात्री पटल्यावर साहेबांनी तिला प्रपोझ केलं...आणि अपेक्षित होकार कळल्यावर पहिलं कोणाला सांगितलं असेल तर मला!!! त्या दिवशी त्याच्यापे़क्षा जास्त आनंद मला झाला होता... आता मला जवळचा मित्र आणि तितकीच जवळची मैत्रिण मिळाली होती. तिघे एकत्र सायकल वर कॉलेज ला जायचो... computer assignments पण त्या दोघांनी एक आणि मी एक असा प्रकार असायचा.. पण print outs ३ असायची :) धमाल यायची.....
याच्या घरी शोकेस मध्ये drinks असतात असं कळलं तेव्हा कोण आश्चर्य वाटलं होतं.... drinks घेणारे सगळेच दारुडे असतात असं नाही इतकं कळायला तेव्हा अक्कल कुठे होती?
कॉलेज संपलं.... PG साठी सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी गेलो.. तो C-DAC साठी मुंबाईला... आता भेट कमी होत होती.... नवीन कॉलेज मध्ये नवीन लोक भेटले..पण या सम हाच!!!
नंतर मग जॉब!!! दुर्दैवाने त्याच्या कंपनी मध्ये layoff झाला आणि याचा जॉब गेला.... हे ऐकल्यावर मलाच खूप हादरा बसला होता. त्याला कसा धीर द्यायचा, काय बोलायचं विचार करत करत च त्याला भेटायला गेले तर हा एकदम शांत बसला होता!!! जणू काहि आता काय होणार आहे, काय करायचं आहे हे त्याला स्पष्ट माहित होतं. आणि झालंहि तसंच..... सुरूवातीच्या १-२ वर्षात त्याने जे काहि केलं, तो अनुभव आज त्याला इतका पुढे घेऊन गेला आहे कि मन भरून येतं.
दरम्यान त्याचं लग्न झालं, नवीन फ़्लॅट, गाडी..... settle झाला तो!!! अधून मधून तो परदेशी जात होता..कधी मी पण!!! आता भेटणं म्हणजे प्लॅन करावं लागत होतं....
या वर्षी गण्पतीतली गोष्ट... त्या दोघांचा फोन आला... "आम्ही दोघे germany ला जायचा विचार करतोय..." त्याला कंपनीने चांगली संधी दिली होती. ते पुण्याहून निघायच्या आधी आम्ही भेटलो....
फ़क्त आपण तिघे भेटू, ग्रुप मधलं इतर कोणी नको ही माझी अट!!! कारण जे आम्ही तिघे share करू शकतॊ ते इतर कुणाला कळण्याच्या पलिकडे आहे.... ज्या मित्रा बरोबर मी सायकल ने जायचे...आज त्याच्या कार मध्ये बसताना काय वाटलं असेल मला.... खूप छान....शब्दांच्या पलिकडले!!!
आता ते दोघे germany मध्ये आहेत...चॅट, orkut वर बोलणं चालूच असतं....कितीहि दूर असलो तरी मैत्री अजून तशीच आहे....तशीच राहिल!!!
आज हे सगळं आठवायचं कारण... काल बरेच दिवसांनी त्याला ईमेल केली... आज त्याचा रिप्लाय आला. "तुझी ईमेल सिग्नेचर छान आहे."...
मी ही सिग्नेचर लिहून जवळ जवळ महिना झाला.... कोणी हे नोटिस नाही केलं..आणि एका मेल मध्ये हे कदाचित फक्त तोच बघू शकतो!!!

Thursday, February 08, 2007

जागरुक मदत!!!

"स्नेहल, तू त्या xxxxx संस्थेसाठी काहि मदत करतेस का ग?" आज Office मध्ये चहा घेताना एका मैत्रिणीने विचारलं.
"नाही ग. मला जमेल असं वाटत नाही" मी
"त्यात काय न जमण्यासारखं आहे. मी करणार आहे या महिन्यापासून. दर महिना १००० रुपये!!!" ती.
"ओह!! आर्थिक मदत पण घेतात का ते? मला वाटलं कि त्यांना स्वयंसेवक हवे असतात" मी माझे अज्ञान पाजळले.
ही xxxxx संस्था एका मोठ्या कंपनीची चॅरिटी ग्रुप !!! म्हणून मला वाटलं होतं कि आर्थिक बाजू ती कंपनी बघते.
"अग नाही ते लोक पैसे पण घेतात" माझी मैत्रीण
"पण मग तू अशा ठिकाणी पैसे दे जिथे खरंच पैशाची गरज आहे. आणि जिथे तू केलेली मदत मोलाची असेल आणि म्हणूनच कोणच्या लक्षात राहिल. तू ज्या संस्थेला पैसे देत आहेस ते आर्थिक द्रुष्ट्या खूप सबळ आहेत मग त्यांनी स्वत:च्या नावावर लोकांचे पैसे का वापरावेत? आणि श्रेय स्वत:कडे का?? " मी थोडी चिडून बोलले.
"ए बाई, मी इतका विचार केला नव्हता!!! मदत करावीशी वाटली म्हणून केली" ती
यावर मी गप्पच बसले. पण मनात आलं कि किती हा आंधळेपणा !!! आपण ज्या हेतूने मदत करतोय त्याचा योग्य विनीमय होतोय कि नाही, संस्था काय काम करते, पैसे कुठे वापरते या कशाचीच माहिती असणं गरजेचं नाहीये??? कसली मदत ही. आणि अशी मदत करून आपण कसलं समाधान मिळवतो!!! कि अशाच दांडग्या संस्थांना जनतेच्या आंधळेपणाचे पुरावे देतो?? शिक्षणाने केवळ आर्थिक सुबत्त दिली आहे का समाजाला... वैचारिक सुबत्ता कशाने येईल??

"