Friday, November 20, 2009

अपेक्षित....अनपेक्षित

"ए बाई, नको इतका negative विचार करूस" माझा एक मित्र मला कळकळीने सांगत होता.
"यात negative काहीही नाहिये, I am just preparing myself for the worst" मी त्याला शांतपणे सांगायचा प्रयत्न केला, पण डोळ्यात चुकार थेंब आलेच
"ते बघ...." मित्र
"काही नाही रे, I am OK" मी
"मग तसं मला पण वाटू दे that u r OK" तो

पण हे माझं नेहमीचं असतं. एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी जितका प्रयत्न करते, तयारी करते; तेवढीच तयारी ते नाहीच झालं तर दुसरं काय करता येईल याची. एकाच गोष्टीची अपेक्षित आणि अनपेक्षित शक्यतांची तयारी करायची म्हणजे त्याने होणारा त्रास कमी होतो हा अनुभव. :) जसा त्रास कमी होतो तसाच होणारा आनंद ही कमीच होतो. पण मग ही त्या "preparing myself for the worst" ची किंमत असावी.

कधी कधी बरं वाटतं हे सगळं. जरा मोठे, शहाणे झाल्याचं समाधान(??) मिळतं. वाटतं, कि जमतंय आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यायला. पण मग मनात जे सकारात्मक आहे ते अगदी तस्संच झाल्यावर काही वर्षांपूर्वी जसा निरागस आनंद व्हायचा तसा अनुभव आता फ़ारसा मिळत नाही. तेव्हा म्हणजे मी काहिही विचार न करता जगायचे तेव्हा. आला प्रसंग उत्स्फूर्त पणे जगायचे, न आधी विचार केलेला, न त्या क्षणी करणार आणि एकदा होऊन गेल्यावर तर बातच सोडा :)

अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत आशा लावून धरायचे मी! छोटी म्हणजे किती छोटी असावी.... बाबा काही कामानिमित्त गावात गेलेत तर येताना त्यांनी ढोकळा आणावा. मग कधी विसरून त्यांनी नाही आणला कि मन हिरमुसायचं. "मला हवा होता" हे त्या वयातही मला बोलता आलं नाही, पण मनात धुसफुस व्हायची. असंच आई कधी कधी तिच्या बांगड्यांबरोबर माझ्यसाठी कानातंलं आणायची तेव्हा काय आनंद व्हायचा. चप्पल तुटली कि शिवून आणण्यापेक्षा नवीन घेऊ असं बाबा म्हणाले कि एकदम हवेत गेल्यासारखं व्हायचं. खरेदीला गेले अन पहिल्या १-२ दुकानात मनपसंत काही मिळलं नाही कि खट्टू व्हायचे.
"दिल है छोटासा, छोटीसी आशा..." असं अगदी.

१२ वी नंतर "preparing myself for the worst"(आपण याला PMFTW) ला सुरूवात झाली बहुतेक. मार्क धड ना चांगले, धड ना वाईट. ना आनंद होत होता ना वाईट वाटत होतं. इंजिनीरींग ला free seat मिळत नव्हती. payment ची बाबांची तयारी होती (म्हणजे त्यांना त्रास घेऊन ते करयाला तयार होते) पण "free seat ची लायकी नाही तर payment तरी कशाला" असं मी म्हणत होते. मग यातून च एक पर्याय पुढे आला तो BCS चा. Bachelor of Computer Science. मला admission मिळाली, पुढे MCS पण झाले. आणि खरोखरच कुठून तरी इंजिनीरींग करून त्यामानाने काहीच धड न करता आलेले बरेच जण मी आज बघते त्यापेक्षा आपलं चालू आहे ते बरंय.

तर जे हवंय ते मिळत नसेल, घडत नसेल तर पर्याय खुले ठेवता आले पाहिजेत आणि त्यातून अनेकदा चांगलच हाती लागतं हे जाणवलं.पुढे कधीतरी एकदा खूप निराश झाले होते, म्हणजे निराशेचं कारण मला बरंच अपेक्षित होतं, पण ते तसं घडलं तर आपण काय करायचं ह्याचा विचारच केला नव्हता. दर वेळी ती नकारत्मक शक्यता मन अमान्य करत राहिलं आणि ज्यादिवशी त्याला तोंड द्यायची वेळ आली तेव्हा गळून गेल्यासारखं झालं. खूप त्रास झाला, मनाने हिंदोळे, हेलकावे झेलले. एक शक्ती असावी कुठेतरी तसं मी अलगद त्या निरशेतून बाहेर आले.आणि तिथे PMFTW चा पहिला धडा मिळाला. नकारात्मक विचार टाळून उपयोग नाही तर त्यावर उपाय/ पर्याय शोधता आला पाहिजे.

आता सवय च झालीये. जवळ-जवळ सगळ्याचा दोन बाजुने विचार केला जातो, दोन दिशा दिसतात आणि मनाची एक तयारी असते कि यातला एक मार्ग आपल्याला घ्यायचा आहे.सकरात्मक असेल तरी मग हुरळून जाता येत नाही, कारण मार्ग चालू करायचा असतो आणि त्यात अडथळे नको म्हणून परत PMFTW ची तयारी :) नकारात्मक तोंड द्यायला तसं कठीण च असतं. दर वेळी जाणवतं, कि मी तयार आहे यासाठी असं आपल्याला फ़क्त वाटतं, पण तशी तयारी असतेच असं नाही. पण पर्यायाचा विचार झालेला असतो आणि तो पर्याय निवडताना निम्मा त्रास तुम्ही सहन केलेला असतो त्यामुळे आता प्रत्यक्ष तोंड देताना थोडा कमी त्रास :)कदाचित होणारा १००% त्रास ३०% आधी आणि ७०% नंतर असा विभागला जातो म्हणून असेल.

कोणाला वाटेल सगलं निरस होत असेल याने... इतका विचार करायची गरज आहे का? मी म्हणेन, तसं निरस नाही होत काहीच. ही सगळी विचार पद्धत इतकं अस्व्स्थ करते की तुम्ही सतत गुंतले जाता. कुठे काही नवीन मिळतंय का याचा शोध घेत रहता. खूप negativity चा विचार केल्यामुळे अगदी छोटी मनासारखी घटना पण मन सुखावून जाते. रोज च २५ -30traffic signal पार करून जाणार्याला एक दिवस अचानक त्यातले १५ traffic signal हिरवे मिळाले तर कसं होत असेल, अगदी तस्स! तयारी सगळ्या ३० signal ची ठेवा, कुठला लाल लागला तर काय करता येईल याचा विचार करून ठेवायचा. सगळेच हिरवे मिळाले तर सटासट पोचून काय करता येईल हे बघा.

अपेक्षित....अनपेक्षित! मस्त मजा आहे यात... जिंकायचं तर आहेच, पण एक पायरी हारले, घसरले तरी कसं जिंकता येईल हे ठरवायचं.

Tuesday, April 21, 2009

झोपी गेलेला...........

"काय करणार weekend ला?" मी काल एका मित्राला विचारलं
"काही नाही गं. झोपणार आहे :)" तो तसा प्रामाणिक च!
"हम्म, बरोबर आहे. office ची सवय अशी घरी मोडवत नसेल."
"अगदी अगदी.... घरी ८ तास, बस मधले २ तास आणि office मधले ४-५ तास..इतकी झोप हवीच ना. शिवाय IT मध्ये सध्या recession मुळे किती ते tension. त्यामुळे तर झोपेची गरज वाढलीच आहे. लोकांची tension मुळे भूक वाढते ना, तशी माझी झोप वाढलीये बघ :)"

लहानपणा पासून एकमेकांना खेचण्याची कला आम्ही अगदी मनापासून जोपासली आहे. आणि आमचा ग्रुप म्हणजे अगदी कुंभकर्णाचे वंशज. तो निदान ६ महिने तरी जागा असायचा (म्हणे)..पण आम्ही तर अगदी निद्रादेवीचे प्रामाणिक भक्त! तिला कधी नाही म्हणायचं नाही.."आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे आमचे नि तिचे संवाद.

लहान असताना एक नरक चतुर्दशी सोडली तर मी कधी घड्याळात सकाळचे ५ बघितले नव्हते. ट्रिप वगैरे असेल तरी जास्तीत जास्त उशिरा ऊठायचं नी पटापट आवरायचं, हे ठरलेलं. आणि देव तारी त्याला कोण मारी? पूर्ण शालेय जीवनात माझी फ़क्त ३ च वर्ष सकाळची शाळा होती. प्राथमिक पर्यंत तर मी ९:३० पर्यंत वगैरे झोपायचे...आईने मग ब्रश, आंघोळीचं पाणी सगळं तयार ठेवून मला उठवायचं, दणादण आवरून मी शाळेत परत वेळेत हजर! एकदा ऊठलं कि गाडी जोरात, पण एकदा झोपलं कि मग ज्याचं नाव ते.

"झोप म्हणजे झोप म्हणजे झोप असते, तुमची आमची ती मुळीच सेम नसते" :) तुम्ही घरी झोपलेले आहात आणि बाहेर गेलेले आई बाबा दार वाजवून थकले...इतके कि त्यांनी घरावर दगड फेकून मारावे असं झालंय? बरं, आता त्या दगडाचा आवाज ऐकून झोपेतून बळंच ऊठून दाराऐवजी बाल्कनीचं दार उघडलं असं कधी झालंय?? झोपेचा वारसा आमचा वडिलोपार्जित आहे... माझी आजी झोपाळू. तिला त्या वेळच्या जीवनपद्धतीनुसार बरंच काम करावं लागायचं, पण ती झोप वगैरे कायम तब्येतीत काढायची. मग आमचे बाबा... कोयनेचा भूकंप पुण्यात बराच जाणवला... बाबा त्यावेळी घरात झोपले होते...आणि शेजार्यांनी येऊन ऊठवे पर्यंत बाबांना काहीही पत्ता नव्हता.माझी आत्येबहीण जे.जे ला MBBS करत होती... रात्री जागून परत पहाटे उठून अभ्यास. मग असंच एकदा २ ल झोपून परत ४:३० चा गजर लावून झोपली. २.३० तास पटकन गेले...आणि गजर झाला. इतकी साखरझोप या घड्याळाने मोडली...झालं...झोपेतच ते उचलून तिने खिडकी बाहेर फेकून दिलं. hostel चा watchman वेडाच व्हायचा बाकी राहिला असणार :) तिचाच अजून एक किस्सा.. मुंबई हून रत्नागिरीची गाडी...गाडी पहाटे रत्नागिरीला पोचली, हिने सवयीप्रमाणे ताणून दिली होती. कंडक्टर ने उठवलं..
"ताई, रत्नागिरी आलं"
"५ च मिनिटं झोपू दे" ही अजून झोपेतच :)
परत ५ मिनिटानी "ताई, ऊठा आता... गाडी आत मध्ये लावायची आहे."
"५ मिनिटं झोपू दे ना पण!!!"
"मग झोपा आणि चला परत मुंबईला"
मग एकदम खाडकन उठली. आता तीच ताई सलग ३२-३४ तास काम करते. पण आमचा कोणाचाच प्रश्न जागाण्याचा नाहीच आहे. एकदा झोपलो कि मग मात्र ऊठवणे हा एक project आहे!

माझा दादा :) बाबा त्याला रोज सकाळी ऊठवायचे..संस्कृतचं पाठांतर कर म्हणून... बाबा ६ ला ऊठवायला लागायचे, दादा दर वेळी ५-५ मिनिट्म करून ३०-४० मिनिटं झोपून घ्यायचा. एकदा तर "बाबा, ५ च मिनिटं.. स्वप्न पडतंय" असं म्हणाला होता. बाबांना हसावं कि रागवावं कळ्लं नसणार त्यावेळी. हाच दादा अगदी पेपरला जाताना पण १० मिनिटं झोप काढूनच जायचा..वर तसं केलं तर पेपर बरा जातो हे logic! आईच्या सहनशक्तीचा अगदी अंत पाहिला आमच्या झोपेने. मी तर अजूनही २ मिनिटं आहेत असं बघूनहि परत झोपू शकते. झोपायला (अति) जास्त मिळावं म्हणून मी बाकिचं भराभर आवरायला शिकले...म्हणजे उठले सगळं आवरून मी ३०-३५ मिनिटात बाहेर पडू शकते..आणि याचा onsite ला फ़ार फ़यदा झाला :)

कॉलेग मध्ये चष्मा असलेल्या लोकांचं बरं असं वाटायचं. टयुबचा प्रकाश पडला कि डोळे बंद काय उघडे काय काही कळत नाही. असंच एकाला सरांनी खडू मारून दचकवलं होतं. कंपनीच्या बस मध्ये लोक जबरी मस्त झोपतात.. विप्रो मधला एक almost पडायचा बाकी राहिला होता. मी एकदा बस मध्ये ताणून दिल्याने २-३ stop पुढे उतरले आहे. मग झोप आली कि आता मोबाईल वर गजर लावूनच झोपते. परत earphone, vibrator सगळं चालू ठेवायचं! आत्ताच्या ऑफिस मध्ये एक tester कोपर्यातल्या cubicle मध्ये झोपायचा.. मला जाम हेवा वाटायचा त्याचा. पण मग पुढे त्याच्या manager ने त्याला एकदम highway cubicle मध्येच बसवला. त्यानंतर त्याचं वजन २ महिन्यात ४ किलो ने कमी झालं असं आम्ही त्याला चिडवतो :)

कित्ती प्रयत्न केला तरी मला अजून सकाळी लवकर ऊठायची सवय लागलेली नाही. आई कडून सगळ्यात जास्त मी या बाबतीत रागावून घेतलं असेल... हल्ली तिला रात्री झोप उशीरा लागते म्हणून मग सकाळी जाग येत नाही, तर मी ऊठल्यावर का ऊठवलं नाही म्हणून परत माझ्याच वर चिडते. :) पण मला झोपायला आवडतं त्यामुळे असं छान झोपणार्याला मी सहसा ऊठवत पण नाही. झोप म्हणजे सुख असतं... ते जग तुमचं असतं...तुम्ही वाटेल ती स्वप्न त्या जगात बघू शकता. सुदैवाने झोप उडावी असं भयंकर भीतीदायक किंवा तरल आल्हाददायक दोन्ही कधी फारसं कधी झालं नाहीये... म्हणजे भयंकर भीतीदायक कोणाच्याच बाबतीत नको म्हणा...आणि ठराविक तरल आल्हाददायक चालेल... म्हणजे झोप नाही तर निदान साखरझोप तरी मिळते. :)

अन्न हे पूर्ण्ब्रह्म आहे खरंच... पण अन्नाची चोरी करता येते. झोप पण अन्नाइतकीच गरजेची आहे माणसाला...पण ती चोरता येत नाही. ज्याच्या नशिबात जितकी तितकीच त्याला ती प्रसन्न होणार. आज मी चार तासच झोपणार म्हणलं की ७-८ तास झोप लागते. आणि आज जास्त झोपू म्हणलं की २ तासात जाग येते. आपल्याकडे इतके देव आहेत आणि त्याची आपण अगदी व्यवस्थित पूजा करतो...मग कोणी "निद्रा"देवी ची पूजा का नाही करत? म्हणजे या घरातल्या लोकांना शांत झोप मिळू दे..त्यांना जास्तीत जास्त स्वप्न बघता यावीत असं का कोणी त्या देवीकडे साकडं घालत?

चला...खूप च लिहिलं...झोप आली :) तसही हे पोस्ट मी ३ दिवस लिहिते आहे...लिहायला घेतलं की निद्रादेवी यायच्या, मग आमचं तत्व "आलीस? ये...आल्यासारखी आता जरा शेजारी पण जाऊन ये...आणि ८-१० तास थांबच कशी!!!" वगैरे :))

देवीची कृपा अशीच सगळ्यांवर राहो....

॥ श्री निद्रादेवी प्रसन्न॥

Wednesday, January 14, 2009

आवाज कि दुनिया

आज नेहमीप्रमाणे बस मध्ये वाचत बसले होते. शेजारचा माणूस मोबाईल वर गाणी ऐकत खिडकीतून बाहेर बघत बसला होता... ’झेन गार्डन’ वाचत होते... मस्त कथा...त्यामुळे मी एकदम तंद्रीमध्ये. अचानक एक विचित्र "हॅलो" ऐकू आला..चमकून बघितलं तर शेजारचा तो फोनवर बोलत होता. तो दिसायला एकदम आडवा माणूस...केस थोडे पांढरे..चेहर्यावर एक गंभीरपणा आणि आवाज एकदम पातळ... मला एकदम हसूच आलं. म्हणलं केवढा माणूस आणि कसा आवाज!!!!

पण हे असं खूप वेळा बघितलं आहे, आवाज आणि दिसणं यातली विसंगती. पण विसंगती कशी? म्हणजे अमूक अमूक आवाजाची व्यक्ती अशीच असेल हे तर मनाचा खेळ झाला. आणि मग तशी ती व्यक्ती नसेल कि मला आलं तसं एकदम हसू येतं, आश्चर्य वाटतं, क्वचित भ्रमनिरास, अपे़क्षाभंग वगैरे.

मला आठवतंय माझ्या दादाचा एक मित्र होता...एकदम गोरा गोमटा, खात्या-पित्या घरचा. तो पहिल्यांदा घरी आला तेव्हा दार मीच उघडलं... आणि त्याचा आवाज ऐकून पळत जाऊन दादा ला सांगितलं कि "मुलीच्या आवाजाचा तुझा मित्र आला आहे". नंतर तो आमच्याकडे खूप वेळा आला, हळूहळू माझी ओळख वाढली तसं माझ्याशीही बोलायला लागला आणि मग त्याच्या त्या आवाजाची सवय झाली. पण माझ्या त्या निरोपामुळे मी त्याला त्याच्या नावाच्या feminine version नेच हाक मारायचे. मग मोठी झाले...आता त्याचं लग्न झालं नि मग कधीतरी मी त्याला त्याच्या मूळ नावाने हाक मारायला सुरूवात केली. :)

शाळेत एक बाई होत्या... मी शाळेत असताना चांगलं(??) गायचे वगैरे..त्यामुळे त्यांचा आनि माझा बराच संबंध आला. तबला सुरेख वाजवायच्या. पण आवाज एकदम फ़ाटलेला. त्या बोलायला लागल्या कि यांनी तबला भाषा शोधून काढावी असं वाटायचं.

आधीच्या कंपनीत माझ्या टीम मध्ये एक IIT fresher होता. डोकं एकदम मस्त. पण आवाज म्हणजे हसू आवरायचं नाही. त्याला ऑफिस मध्ये एकदा एका credit card साठी फोन आला. हे credit card वाले जनरल फोन करत असतात. ते ext. कोणाचं आहे हे त्यांना माहीतच नसतं. तर याने फोन घेतला..
"हॅलो"
"I m xyz from a bank."
"ok"
"mam, आप credit card में interested हो?"
"I m not a mam. My name is Susheel" (name changed here)
बास हे ऐकून आम्ही त्या cubicle मधले सगळे हसून पडायचे बाकी राहिले होतो. कित्येक दिवस आम्ही त्याची या एका dialogue वरून खेचायचो.

अजून एक मित्र आहे त्याचा आवाज एकदम भारदस्त आहे..पण दिसायला अगदी fresh out of college वाटतो. आणि असा त्याला अगदी official feedback मिळाला आहे :)

"स्नेहल, आज च्या बंड्याचा उद्या तुला verification call घ्यावा लागेल" असं मला आमचा HR सांगतो. हे असं पूर्वी पण अनेकदा मी केलंय...आता सवय झालीये. पण पहिल्यांदा असं करायचं होतं तेव्हा झेपलंच नव्हतं कि मी असं न बघितलेल्या माणसाचं कसं काय verification करणार? Telephonic interview नंतर हाच "तो" यासाठी हे सगळे खटाटोप. मग "त्या" चा आवाज, काही उत्तरं पडताळून बघायची आणि verification करायचं..असलं काहीतरी अजब तंत्र. म्हणजे मग मी आधी बोलले आणि verification केलं त्यात मध्ये त्या माणसाचा आवाज बसला असेल तर? पण हे असले प्रश्न मी मनात च ठेवते.

सगळी आवाजाची जादू, मजा आहे. आज च्या "नेट" च्या युगात तर चेहर्याआधी आवाजाची च ओळख होते. मायबोली, blog मुळे तर मी कित्येकांशी आधी फोन वर बोलले मग भेटले आहे. मजा येते कधीकधी. आवाज आणि ती व्यक्ती असं काही अजब सूत्र मनाशी मांडताना.

नोकरीमध्ये काम बदलत गेलं तसतसं आता मला distributed teams बरोबर काम करावं लागतं. तिथे तर अनेकदा फोन वर च बोलणं होतं. Client team तर सगळी आवाजानेच परिचीत असते. अशीच एक business analyst आहे..फोन वर तिचा आवाज कायम तोंडावर कोणी हात ठेवावा तसा येतो. त्यावरून मला वाटलं होतं कि एकदम मोठी, उदास बाई असेल... मग एक दिवस तिचा फोटो बघितला.. कमालच होती...ही बाई माझ्याच वयाची आणि सुंदर म्हणावी अशी आहे. तिचीच सहकारी आवाजावरून तरूण वाटते तर ती निघाली ४५ वर्षाची :)

हे तर झालं माझ्या सारख्या इतर काही लोकांचं. पण जे प्रतिथयश लोक असतात त्यांचा पण आवाज कित्येकदा गमतीशीर असतो. राणी मुखर्जी!!! कायम या बाईला सर्दी झालीये असा आवाज. श्रीदेवी... प्रचंड नकोसा वाटणारा अनुनासिक, अल्लड आवाज...सुनिल शेट्टी..उगाचच घसा बसल्यावर बोलतो तशातला काहीतरी आवाज. हेमामालिनी चा आवाज जरा भारी आहे. त्यात तिचा accent पण दाक्षिणी आहे. अजून च गंमत येते त्यामुळे! सचिन... काय अफ़ाट खेळतो, तोड नाही.. पण आवाजात मार खाल्ला आहेच.

काहीकाही आवाज मात्र वेड लावतात... श्रेया घोशाल, सुरेश वाडकर, लता, आशा, मन्ना डे, जगजित सिंग, हरीश भिमानी, अमिताभ... बरेच जण आहेत. पूर्वी दूरदर्शन वर बातम्या देणारे प्रदीप भिडे यांनी तर संपूर्ण करीअर जाहीराती, निरनिराळे कार्यक्रम यात आपल्या आवाजाचा ठसा उमटवत पुढे नेलं. कमाल असते.

आवाज हि देणगी आहे. आपण फ़ार फ़ार तर तो जपू शकतो...त्यातला fineness थोडा वाढवू शकतो.. पण तो एका मर्यादेपुढे कमावता येत नाही. ती शक्ती माणसाकडे नाही. जसा तुमचा-माझा रंग, उंची देव च ठरवून पाठवतो तसाच आवाजही. तरीही हसू आणणारे आवाज आहेत..वेड लावणारे आहेत तसेच चीड आणणारेही आहेत.

मी कित्येक मित्र-मैत्रीणींना फोन केल्यावर म्हणते... कामामुळे भेटणं होत नाही निदान आवाज तरी ऐकावा म्हणून फोन केला. नुसता त्यांचा आवाज ऐकला तरी जुन्या आठवणी जाग्या होतात..कोणी आसपास आहे असं वाटतं. अशा अनेकांचा आवाज एकमेकांना पोचवणार्या त्या Telecom industry ला खरंच सलाम!!!

नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा..
मेरी आवाज ही पेह्चान है..
गर याद रहे :)

आवाज कि दुनिया में आपका स्वागत है :)