Wednesday, December 26, 2007

शिवरायांचे आठवावे रूप

कर्मयोगातला (नोकरी) पंचम अध्याय (पाचवा जॉब) सुरू झाल्यापासून ब्रेक असा काय तो घेतलाच नव्हता. २५ ला मंगळवार..२४ ला एक दिवस रजा घेऊन ४ दिवस भटकंतीचा विचार मनात आला. आपल्या कोकणातला गुहागर-दापोली भाग अजून बघितला नव्हता. तिकडे जायचं ठरलं. कोकण म्हणल्यावर प्रचंड सुंदर ट्रिप हे सांगणे नकोच!
गुहागर जवळ दिड तासाच्या अंतरावर डेरवण नावाचे गाव आहे. तिथे शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग भिंतीवर मूर्तीरुपात (चांगला आणि योग्य शब्द सुचवा) उभे केले आहेत. अतिश्य देखणं काम आहे. परिसर प्रचंड स्वच्छ आणि प्रवेश विनामूल्य आहे. इतर कुठे असे काहि असेल तर रु.२० तिकिट नक्की! तिथले सगळे काम मी माझ्या कॅमेरामध्ये टिपले आहे.

१. शिवबाचा जन्म


२. दादोजींचे धडे


३. राज्याभिषेक


४. अफझलखानाचा वध



५. शाईस्तेखानाची बोटे कापली




६. जिजाईचा आशीर्वाद


७. न्यायनिवाडा



८. प्रजेचा आशीर्वाद



९. रामदास स्वामींचा आशीर्वाद



१०. धार्मिक कार्य


११. बाजीप्रभूंचा शेवट



१२. असे सैनिक



हे सगळे पुतळे इतके जिवंत वाटतात. फार सुरेख बारकावे घेतले आहेत. नऊवारी साडी नेसलेली बाई वाकल्यावर कशी दिसते, मावळे घोड्यावर बसल्यावर त्यांचे पाय कसे असतात (हा फोटो नाहीये इथे) वगैरे. महाराजांचा चेहरा पण सगळीकडे अगदी एकसारखा आहे. मला सगळ्यात जास्त आवडला तो शिवराज्याभिषेकाचा प्रसंग. जवळ जवळ ३० जण आहेत यात...आणि सुबकता तोंडात बोटं घालायला लावणारी!!

असं काम करणं हा एक भाग आहे आणि केलेलं जपणं, परिसर देखणा ठेवणं हा दुसरा भाग आहे. या प्रकल्पासाठी ज्यांचा ज्यांचा सहभाग होता आणि आहे त्या सगळ्यांना माझा सलाम! ऐसा राजा पुन्हा होणे नाही...नि अशा राजाचा जीवनपट अशा रूपात उभा करणे यासारखा दुसरा स्तुत्य उपक्रम नाही.

Monday, December 03, 2007

नको तो गाण्याचा कार्यक्रम!

गाणं हा माझा जिव्हाळ्याचा विषय! मग ते कुठलंही गाणं असो....नवीन, जुनी अशा बंदिस्त आवडी नाहीत.... जे कानाला आवडेल, ज्याचे शब्द स्पष्ट ऐकू येतात असं कुठलही गाणं मला आवडतं. स्वत: गाणं शिकलेले असल्याने काहि काही गोष्टी (बहुतेक) जास्त कळतात (असं मला वाटतं) आणि मग ऐकताना साधं वाटणारं गाणं, विशेष काहि समजल्याने जास्त आनंद देऊन जाते.
पण हल्ली या गाण्याच्या stage shows ने अगदी उत आणला आहे. "अमुक-तमुक" कि "सुनहरी यादें", "अमुक-तमुक" ना "श्रद्धांजली"... वगैरे साच्यातले कार्यक्रम अगदी नकोसे झाले आहेत. जुनी गाणी आणि गायक-वाद्यवृंद नवीन! मग त्या जुन्या गाण्याच्या गीतकार, संगीतकाराची वारेमाप स्तुती करणारे निवेदन! "क्या बात है" टाईप च्या त्याच त्या प्रतिक्रिया...अगदी शक्यच असेल तर "त्यां"च्या बरोबर त्या काळी काम केलेल्या लोकांच्या काही आठवणी, "ते" महान कसे होते वगैरे वगैरे!!! जुनी गाणी अलौकिक सुंदर आहेत, जुने गीतकार, संगीतकाराची अत्यंत प्रतिभाशाली होते...एकदम मान्य!! याविषयी माझं दुमत नाहीच आहे. पण किती वेळा तेच ते ऐकायचं? नवीन गायक आहात ना? मग नवीन गाणी म्हणा ना... लाखो लोकांनी हजारो वेळा ऐकलेलं लठ्ठ तिकिट देउन परत यांच्या तोंडून काय ऐकावं? बरं आजकाल music systems इतक्या सुंदर आहेत कि original track मिळवा आणि गाण्याचा आनंद घ्या!! गाण्यातला छोट्यातला छोटा आवाज स्पष्ट ऐकू येतो! नवीन लोकांनी नवीन काही करून प्रसिद्धी मिळवावी यासारखा आनंद नाही. Live performance ची मजा काही और च असते. पण शक्यतो तेव्हा जेव्हा मूळ गायक तो स्वतः देत असतो.
बरं, जुनेच गायचे तर मग ठरविक चार लोकांभोवतीच का फ़िरतात हे लोक? मराठीत बाबूजी, गदिमा, खळे, हृदयनाथ (क्वचितच) तर हिंदित आर.डी, कि.कु. वगैरे! बाबूजी तर जिवंत असताना जितके प्रसिद्ध होते तितकेच किंबहुना जास्तच प्रसिद्धी त्यांना नि त्यांच्या गाण्यांना मरणोत्तर मिळाली. परत एकदा, त्यांच्या प्रतिभेबद्दल मला अजिबात शंका घ्यायची नाही, पण तेच ते ऐकून कंटाळा येतो!! "सा रे ग म प" च्या पहिल्या पर्वात "खळें"च्या गाण्याचा एक भाग झाला. त्या संपूर्ण भागात स्पर्धक हा जणू गौण भाग होते. संपूर्ण कार्यक्रम "खळे गौरव" होता! देवकी पंडीत ला तर "खळे" म्हणलं कि किल्लीच बसते. कमीतकमी ५-६ वाक्य बोलल्याशिवाय बाई काही थांबत नाही.
बरं, जुनी गाणी म्हणताय ना....मग लता ची तार सप्तकातली गाणी म्हणा, मन्ना डे ची जमताहेत का बघा. तर नाही... एक जण कोणी "तेरे मेरे बीच में", "लग जा गले", "लागा चुनरी में दाग" म्हणायचं धाडस करत नाही. नवीन लोकांना जमणार नाही असं मला challenge नाही करायचं आहे, पण ते का करत नाहीत हे जाणून घ्यायचं आहे!
जुन्या चांगल्या गोष्टी जपल्याच पाहिजेत, त्या नवीन पिढीपर्यंत पोचल्या पाहिजेत, हे खरं आहे. पण त्याच बरोबर, नवीन निर्मिती देखील व्हायला हवी. कुठल्याही सुसंस्क्रुत, अभिरूचीपूर्ण समाजाचे ते लक्षण आहे. जुन्या गोष्टी वारसा आहे, तो जपायचा, पुढे न्यायचा. पण तोच उगाळत बसायचा का?
मला तर या "जुन्या" गाण्यांच्या कार्यक्रमाचा मनस्वी कंटाळा आला आहे. "अति झालं नि हसू आलं" असं झालंय बहुतेक. गाणी ऐकायला प्रचंड आवडणारी मी म्हणूनच हल्ली अशा कार्यक्रमाला जायचं टाळते. वाटतं नकोच तो गाण्याचा कार्यक्रम!